Haryana Elections 2024 : हरियाणा विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीबरोबर (Haryana Elections 2024) आघाडी करता येऊ शकेल का? याची किती शक्यता आहे याबाबत चाचपणी करण्यास काँग्रेसने सुरुवात (Congress Party) केली आहे. राहुल गांधी यांनी याबाबत (Rahul Gandhi) पक्षातील नेत्यांना काय वाटतं हे सांगण्याचा सूचना दिल्या आहेत. काँग्रेस पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत हरियाणातील नेत्यांशी संवाद साधताना राहुल गांधी आप आणि काँग्रेस आघाडीबाबत सकारात्मक दिसले. याआधी झालेल्या लोकसभा निवडणुकीत हरियाणा, गुजरात, गोवा, दिल्ली आणि चंदिगढमध्ये दोन्ही पक्षात आघाडी झाली होती. परंतु या आघाडीला अपेक्षित यश मिळालं नाही. आघाडी केल्यानेच पराभव झाला असे दोन्ही पक्षांच्या नेत्यांना वाटत आहे. त्यामुळे आता दोन्ही पक्षांचे स्थानिक नेते आघाडी करण्याच्या मूडमध्ये नाहीत. परंतु तरीही राहुल गांधी आपबरोबर आघाडी करण्याच्या विचारात दिसत आहेत. राहुल गांधी आपबरोबर निवडणूक पूर्व आघाडी करण्यास इतके इच्छुक का आहेत याची कारणे जाणून घेऊ या..
सध्या राहुल गांधी दूरचा विचार करताना दिसत आहेत. भविष्यात जर भाजप कमजोर झाली तर काँग्रेसला सरकार स्थापन करण्याची शक्यता राहील असे राहुल गांधींना वाटत आहे. सध्याच्या परिस्थितीत केंद्रात सरकार स्थापन करणे काँग्रेससाठी अशक्य कोटीतील गोष्ट आहे. याची जाणीव राहुल गांधींना आहे. तसेच जर कदाचित इंडिया आघाडी सत्तेत आली (याची शक्यता जवळपास नाही) तर या आघाडीत पंतप्रधान पदासाठी खूप दावेदार असू शकतात. त्यामुळेच राहुल गांधी विचार करून आघडीच्या राजकारणाला पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत.
अशावेळी काही ठिकाणी काँग्रेसला नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु त्यांच्या नजरेत एनडीएची रणनीती दिसून येत आहे. भाजपने महाराष्ट्र आणि बिहारमध्ये जास्त आमदार असतानाही नमती भूमिका घेतली आहे. आता हीच गोष्ट राहुल गांधींच्याही लक्षात आली आहे. आघाडीचा धर्म पाळायचा असेल तर भाजपसारखा त्याग करावाच लागणार आहे. तसं पाहिलं तर हरियाणात आपबरोबर आघाडी करणे काँग्रेससाठी फार फायद्याचे राहणार नाही. परंतु राष्ट्रीय पातळीवर एनडीएच्या विरोधात इंडिया आघाडीला (INDIA Alliance) मजबुतीने उभे करण्याचे राहुल गांधींचे उद्दिष्ट आहे.
आमदारांनो, पक्ष बदलताय मग पेन्शन विसराच; ‘या’ राज्यात सरकारने विधेयकच आणलं
आम आदमी पक्षाचा प्रभाव राजधानी दिल्लीच्या तुलनेत हरियाणात कमी आहे. परंतु लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections) राज्यातील चार विधानसभा मतदारसंघात पक्षाला चांगले परिणाम दिसून आले. त्यामुळे आगामी निवडणुकीत हरियाणाच्या निकालावर आम आदमी काही प्रमाणात प्रभाव टाकू शकतो असे राजकीय जाणकारांना वाटत आहे. जर असं घडलं तर काँग्रेस (Congress Party) आणि भाजप दोघांनाही याचा फटका बसू शकतो. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे विश्लेषण केले तर एक गोष्ट लक्षात येते की जर आगामी विधानसभा निवडणुकीत आप आणि काँग्रेस वेगळे लढले तर त्याचा फायदा भाजपला (BJP) होण्याची शक्यता आहे.
बूथ पातळीवरील डेटावरून लक्षात येते की राज्यातील ९० मतदारसंघापैकी ४४ मतदारसंघांत भाजपने आघाडी घेतली होती. काँग्रेसने ४२ तर आम आदमी पार्टीने ४ मतदारसंघात आघाडी घेतली होती. जर लोकसभा निवडणुकीच्या वेळेसच लोकसभा निवडणुका झाल्या असत्या तर काँग्रेस आणि आप आघाडीने एकूण ४६ मतदारसंघात आघाडी घेतली असती. म्हणजेच सरकार स्थापन करण्यासाठी बहुमत मिळवले असते. स्पष्टच आहे की जर लोकसभा निवडणुकीला आधार मानून जर दोन्ही पक्षांनी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला तर फायदा भाजपला होण्याची शक्यता आहे.
हरियाणात भूकंप! पहिल्या यादीनंतर राजीनाम्यांचं सत्र; ‘या’ दिग्गजांची भाजपाला सोडचिठ्ठी
हरियाणात आम आदमी पार्टी सध्या मजबूत नाही. तरीही पक्षाची जागांची मागणी जास्त आहे. याउलट हरियाणा काँग्रेसच्या नेत्यांचे मत आहे. त्यांच्या मते हरियाणात आम आदमी पार्टी फक्त तीन ते चार जागा मागण्याच्या स्थितीत आहे. मग यापेक्षा जास्त जागा देण्याची गरजच काय? सोमवारी काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक पार पडली. या बैठकीत राहुल गांधींनी स्थानिक नेत्यांना विचारले की हरियाणात स्वतंत्र लढल्याने पक्षाला नुकसान होणार नाही का, आघाडी करण्याची काही परिस्थिती राज्यात तयार होऊ शकते का..काँग्रसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुडा यांनी या प्रश्नांची उत्तरे दिली. आम् आदमी पार्टी जास्त जागांची मागणी करत आहे त्यामुळे त्यांच्या बरोबर आघाडी करणे कठीण आहे असे हुडा या बैठकीत म्हणाले. त्यांना फक्त तीन ते चार जागा दिल्या जाऊ शकतात पण त्यांची स्वप्ने फार मोठी आहेत.
तसं पाहिलं तर हरियाणात लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि आप यांच्यात आघाडी होऊनही काहीच फायदा झाला नव्हता. कुरुक्षेत्र मतदारसंघ आपल्या वाट्याला आला असता तर कदाचित ही जागा काँग्रेसला जिंकता आली असती असे काँग्रेस नेत्याना वाटत आहे. या मतदारसंघात पराभव झाल्यानंतर आम् आदमी पार्टीचे प्रदेश वरिष्ठ उपाध्यक्ष अनुराग धांडा यांनी पत्रकार परिषदेत काँग्रेसवर गंभीर आरोप केले होते. काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला आणि अशोक अरोडा यांच्यावर त्यांनी विश्वासघात केल्याचा संशय व्यक्त केला होता. कुरुक्षेत्र मतदारसंघात आम् आदमी पार्टीचा पराभव व्हावा यासाठी काही शक्ती काम करत होत्या असा आरोप त्यांनी केला होता.