शिमला : राज्यसभेच्या एका जागेवरील निवडणुकीत पराभव झाल्यानंतर हिमाचल प्रदेशमध्ये (Himachal Pradesh) हायव्होल्टेज पॉलिटिकल ड्रामा पाहायला मिळत आहे. या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग केलेल्या काँग्रेसच्या (Congress) सहा बंडखोर आणि तीन अपक्ष आमदारांनी आता भाजपसोबत जाण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यानंतर मुख्यमंत्री सुखविंदरसिंह सुख्खू (Sukhvinder Singh Sukhu) यांनी राजीनामा दिला आहे. मात्र त्याचवेळी विधानसभा अध्यक्ष कुलदीप सिंह पथानिया यांनी भाजपच्या 15 आमदारांना निलंबित केले आहे. त्यामुळे राज्यात सध्या राजकीय पेच तयार झाल्याचे चित्र उभे राहिले आहे.
आता बहुमत चाचणी घेतल्यास बहुमताचा आकडा 27 पर्यत खाली येण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपकडे स्वतःते दहा, काँग्रेसचे सहा बंडखोर आणि तीन अपक्ष असे 19 आमदार आहेत. तर काँग्रेसकडे 34 आमदार आहेत. विधानसभा अध्यक्षांनी काँग्रेसच्या सहा बंडखोर आमदारांना नोटीस पाठविली असून त्यांना एक वाजेपर्यंत उत्तर देण्याची मुदत देण्यात आली होती. या सर्व राजकीय पेच परिस्थितीत निर्णय घेण्याचे अधिकार राज्यपाल शिवप्रताप शुक्ला यांच्याकडे आले आहेत. (Himachal Pradesh, six Congress rebels and three independent MLAs have now announced their decision to join the BJP.)
68 विधानसभा सदस्य असलेल्या हिमाचल प्रदेशमध्ये 34 हा बहुमताचा आकडा आहे. दीड वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 40 जागा जिंकत दणदणीत बहुमत मिळविले होते. तर भाजपला 25 जागांवर समाधान मानावे लागले होते. यानंतर तीन अपक्ष आमदारांनी देखील काँग्रेससोबतच जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे काँग्रेसचे सरकार स्थिर मानले जात होते.
मात्र काल राज्यसभेच्या एका जागेसाठी राज्यात मतदान पार पडले. यात पूर्ण बहुमत असूनही काँग्रेसचे उमेदवार अभिषेक मनू सिंघवी यांचा पराभव झाला, तर भाजपच्या हर्ष महाजन यांच विजय झाला होता. मतदानावेळी सुधीर शर्मा, राजेंद्र राणा, रवि ठाकुर, इंद्रदत्त लखनपाल, चैतन्य शर्मा, देवेंद्र भुट्टो या काँग्रेसच्या सहा आमदारांनी आणि अपक्ष तीन आमदारांनी भाजपला मतदान केल्याचे समोर आले होते. त्यानंतर या सहा बंडखोर आमदारांना हरियाणातील पंचकुला येथे नेण्यात आले होते.
आज सकाळी शिमलामध्ये परतल्यानंतर काँग्रेसच्या सहा आमदारांनी आपण भाजपसोबत जाणार असल्याचे घोषित केले आहे. त्यानंतर भाजपने विधानसभेत बहुमत चाचणी घेण्याची मागणी केली. त्याचवेळी विधानसभा अध्यक्षांनी भाजपच्या 15 आमदारांचे निलंबन केले. त्याचवेळी काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री वीरभद्रसिंह यांचे चिरंजीव आणि सुख्खू सरकारमधील मंत्री विक्रमादित्य यांनी मंत्रीपदाचा राजीनामा देत सुख्खू यांच्यावर गंभीर आरोप केले.
विक्रमादित्य यांच्या राजीनाम्यानंतर सुख्खू यांनीही आपला राजीनामा पर्यवेक्षकांकडे दिला. मात्र अद्याप हा राजीनामा स्वीकारण्यात आलेला नाही. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आणि हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भुपिंदरसिंह हुड्डा यांना पर्यवेक्षक म्हणून पाठविण्यात आले आहे. सध्या काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी या देखील हिमाचल प्रदेशमधील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.