Download App

Chandrayan 3 : ‘आम्ही या क्षणाची खूप दिवसांपासून वाट पाहतोय’, यशस्वी लॅंडिंगनंतर के सिवान यांची यांची प्रतिक्रिया

  • Written By: Last Updated:

Chandrayan 3 : भारताने आज ऐतिहासिक कामगिरी केली आहे. चांद्रयान 3 मोहीम यशस्वी झाली असून इस्रोने पाठवलेले हे यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरले आहे. विक्रम लँडरने संध्याकाळी 6:05 वाजता चंद्रावर चांद्रयानचे यशस्वी सॉफ्ट लँडिंग केले. इस्रोने १४ जुलै रोजी हे यान अवकाशात पाठवलं होतं. हे अंतराळयान श्रीहरिकोटा येथून चंद्राच्या दिशेने झेपावलं आणि ४१ दिवसांच्या प्रवासानंतर चंद्रावर उतरले. दरम्यान, यानंतर संपूर्ण देशभरात एकाच जल्लोष होत आहे. मात्र, यामध्ये एका व्यक्तीला झालेला आनंद हा अनन्यसाधारण आहे. त्याचं नाव आहे के सिवान (K Sivan ).

‘चांद्रयान-2’ मोहिमेदरम्यान सिवान हे इस्रोचे प्रमुख होते. ही भारताची दुसरी चंद्र मोहीम होती. मात्र, चांद्रयानचे सॉफ्ट लँडिंग करण्यात ते अपयशी ठरले होते. यावेळी सिवान यांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले होते. पंतप्रधान मोदींनीही शिवान यांची गळाभेट घेत त्यांचे सांत्वन केले होते. अखेर आज ‘चांद्रयान-3’ ने चंद्रावर लॅंडिंग करून दाखवत नवा इतिहास रचला. यानंतर सिवान यांनी आपलं मत व्यक्त करत मला खूप आनंद होत असल्याचं सांगितलं.

ते म्हणाले, गेल्या चार वर्षांपासून आम्ही या यशाची वाट पाहत आहोत. संपूर्ण देशासाठी हा ऐतिहासिक क्षण आहे. चांद्रयानच्या यशस्वी लँडिंगमुळे मी अत्यंत आनंदी आहे. मी संपूर्ण देशाचे अभिनंदन करतो, असं ते म्हणाले.

चांद्रयान-3 जो डेटा गोळा करेल तो केवळ भारतासाठीच नसेल. याचा फायदा जगभरातील शास्त्रज्ञांना होणार आहे. या यशाने मी खूप खूश असल्याचेही सिवान यांनी सांगितले.

‘चांद्रयान-3’च्या प्रक्षेपणप्रसंगी के. सिवान उपस्थित होते. यावेळी त्यांच्या गंभीर चेहऱ्याची सोशल मीडियावर चर्चा सुरू होती. केवळ या व्यक्तीला हसताना पाहण्यासाठी तरी चांद्रयान-3 मोहीम यशस्वी झालीच पाहिजे, असे मत अनेक नेटकऱ्यांनी व्यक्त केलं होतं.

Chandrayaan 3 : चंद्रावरील फोटो चांद्रयान-3 ने मिशन कंट्रोलला पाठवले; इस्त्रोने केले शेअर 

दरम्यान, चांद्रयान आणि रोव्हर आता त्यांचे पुढील काम चांगल्या प्रकारे करेल, असा विश्वास इस्रोच्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, चांद्रयान 3 ने यशस्वी लँडिंग केल्यानंतर इस्रोला विशेष संदेश पाठवला आहे. इस्रोने हा संदेश ट्विटरवर शेअर केला आहे. “मी माझ्या नियोजित ठिकाणी पोहोचलो आहे आणि तुम्हीही!”, असा मेसेज चांद्रयानाने पाठवला. तसंच भारताचंही अभिनंदन करण्यात आलं आहे.

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आपला ध्वज फडकवणारा भारत हा जगातील पहिला देश आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अंतराळयान उतरवणे सर्वात कठीण आहे. सपाट पृष्ठभाग नसल्यामुळे येथील तापमान उणे २३० अंश सेल्सिअसच्या इतकं आहे. दक्षिण ध्रुवावर पाणी आणि प्रमुख खनिजे असल्याचा दावा केला जातो. त्यामुळेच इस्रोने आपले अंतराळ यान दक्षिण ध्रुवावर उतरवले आहे.

 

 

Tags

follow us