Download App

Chief Minister of Karnataka : वकील ते मुख्यमंत्री! जाणून घेऊया सिद्धरामय्यांची राजकीय कारकीर्द

Karnataka CM Siddaramaiah : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत (Karnataka Assembly Elections)काँग्रेसनं (Congress)दणदणीत विजय मिळवला आहे. विधानसभेच्या 224 जागा असलेल्या कर्नाटकमध्ये पक्षाने 135 जागा जिंकल्या आहेत. 2018 मध्ये 104 जागा जिंकणाऱ्या भाजपची (BJP)संख्या 66 पर्यंत घसरली आहे. या निवडणुकीत जेडीएसला (JDS)19 जागा मिळाल्या. कॉंग्रेसला बहुमत मिळाल्यानंतर पक्षात मुख्यमंत्रिपदासाठी काही दिवसांपासून रस्सीखेच सुरु आहे. यामध्ये मुख्यमंत्रिपदासाठी दोन प्रबळ दावेदार होते. त्यात पहिले माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि दुसरे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष डी.के. शिवकुमार(D.K. Shivakumar). काही दिवसांच्या मंथनानंतर कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ टाकण्यात आली आहे. त्यानिमित्ताने आज आपण त्यांच्या राजकीय जीवनाची ओळख करुन घेऊया…

सत्यजीत तांबेंच्या आमदारकीला 100 दिवस पूर्ण; असे बनवले काँग्रेस, भाजपाला ‘मामा’

काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांपैकी एक असलेले सिद्धरामय्या यांचा जन्म म्हैसूरमध्ये (Mysore)3 ऑगस्ट 1947 रोजी देशाच्या स्वातंत्र्यापूर्वी झाला होता. त्यानंतर इंग्रजांचे राज्य होते. सिद्धरामय्या यांचे वडील सिद्धरामय गौडा (Siddaramaiah Gowda)म्हैसूर जिल्ह्यातील टी. नरसीपुराजवळील वरुणा होबळी येथे शेती करायचे. त्यांच्या आई बोरम्मा गृहिणी होत्या. वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत त्यांचे कोणतेही औपचारिक शिक्षण नव्हते. त्यानंतर त्यांनी गावातील शाळेत शिक्षण घेतले. नंतर त्यांनी म्हैसूर विद्यापीठातून बीएससी आणि नंतर एलएलबी केले.

सिद्धरामय्या हे पाच भावंडांपैकी दुसरे होते. ते कुरुबा गौडा समाजाचे आहेत. सिद्धरामय्या हे म्हैसूरचे प्रसिद्ध वकील चिक्काबोरैया यांच्या अंतर्गत कनिष्ठ होते आणि नंतर त्यांनी काही काळ कायदा शिकवला. सिद्धरामय्या हे पहिल्यांदा 1983 मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून कर्नाटक विधानसभेवर निवडून आले होते. 1994 मध्ये जनता दल सरकारमध्ये असताना ते कर्नाटकचे उपमुख्यमंत्री झाले. एचडी देवेगौडा यांच्याशी झालेल्या वादानंतर जनता दल सेक्युलर सोडले आणि 2008 मध्ये काँग्रेसशी हातमिळवणी केली.

2013 ते 2018 पर्यंत ते राज्याचे मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यांनी आत्तापर्यंत 12 निवडणुका लढवल्या आहेत. त्यापैकी नऊ निवडणुका त्यांनी जिंकल्या आहेत. मुख्यमंत्री या नात्याने, वलण्णा भाग्य योजनेत सात किलो तांदूळ, शालेय विद्यार्थ्यांना 150 ग्रॅम दूध आणि इंदिरा कॅन्टीन यासह गरिबांसाठीच्या अनेक योजनांबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक झाले आहे.

सिद्धरामय्या यांचे नावही वाद-विवादात सापडले होते. त्यांच्या कार्यकाळात म्हैसूरचे शासक टिपू सुलतान यांची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली. याशिवाय पीएफआय (PFI)आणि एसडीपीआयच्या (SDPI)अनेक कार्यकर्त्यांना सोडण्याचे आदेशही त्यांनी दिले.

सिद्धरामय्या यांच्या पत्नीचे नाव पार्वती आहे. दोघांना दोन मुलं होते. त्यांचा मोठा मुलगा राकेश, त्याला राजकारणात त्यांच्या वडिलांचे उत्तराधिकारी म्हणून पाहिले जात होते. पण पुढे 2016 मध्ये वयाच्या 38 व्या वर्षी त्यांचं निधन झालं. अनेक अवयव निकामी झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरा मुलगा यतिंद्र 2018 मध्ये आमदार म्हणून निवडून आला आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मात्र यतींद्र यांना तिकीट मिळाले नाही.

Tags

follow us