Download App

उत्तर भारतात दक्षिणचा व्यूह? काँग्रेसचे दक्षिणेतील ‘मॅचविनर’ राहुल गांधींच्या सोबतीला…

शुक्रवारी राहुल गांधी यांनी रायबरेली मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत पहिल्यांदाच दक्षिण भारतातील नेते दिसले.

Lok Sabha Elections : दक्षिण भारतातील दोन मोठे राज्य कर्नाटक आणि तेलंगणा. दोन्ही राज्यात (Lok Sabha Elections) काँग्रसचे सरकार. या दोन्ही राज्यांत सत्ता मिळवण्यासाठी काँग्रेसने वेगळ्या (Congress Party) स्ट्रॅटेजीवर काम केलं आणि सत्ता खेचून आणली. आता लोकसभेच्या रिंगणात काँग्रेस असाच प्लॅन उत्तर भारतातील राज्यात करण्याची शक्यता नाकारता येत नाही. याची झलक राहुल गांधी यांच्या (Rahul Gandhi) सध्याच्या भाषणांत दिसते.

शुक्रवारी राहुल गांधी यांनी रायबरेली मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत पहिल्यांदाच दक्षिण भारतातील नेते दिसले. हे तेच नेते आहेत ज्यांनी दक्षिण भारतात काँग्रेसला सत्ताधीश बनवलं. यावेळी पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीतून एकही चेहरा दिसला नाही. जे नेते रायबरेली मध्ये आले ते सर्व गांधी परिवाराचे अत्यंत विश्वासू होते. ज्या पद्धतीने दक्षिणेतील नेते यावेळी दिसले त्यावरून दक्षिण भारतातील राज्यात राबवलेली रणनीती लोकसभा निवडणुकीत आजमावली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

‘सूरत’, ‘इंदूर’नंतर ‘पुरी’तही काँग्रेसवर नामुष्की; पैसे नाहीत म्हणून उमेदवाराची माघार

रायबरेलीतील निवडणूक यंदा अनेक अर्थाने महत्वाची ठरणार आहे. राहुल गांधी प्रथमच या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. रायबरेलीतून गांधी परिवारातील सदस्यानेच निवडणूक लढावी अशी मागणी सर्वात आधी दक्षिण भारतातील काँग्रेस नेत्यांनी केली होती. यानंतर येथील रणनीतीकार सक्रिय झाले. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी सगळ्यात आधी रायबरेलीमधून गांधी कुटुंबातील सदस्याने निवडणूक लढावी अशी मागणी केली होती. पक्षाचे महासचिव केसी वेणुगोपाल यांनी समर्थन केले होते.

यानंतर ज्यावेळी राहुल गांधी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघाले त्यावेळी त्यांच्याबरोबर राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, पोल एक्स्पर्ट सुनील कानुगोलू, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत उपस्थित होते. तसेच तेलंगणा काँग्रेस कमिटीतील काही पदाधिकारी सुद्धा उपस्थित राहिले.

“भाजपला मोठ्या मार्जिनने विजयी करा”; समाजवादी पार्टीच्या नेत्याची भरसभेत फजिती

यामागे वेगळं राजकारण आहे. उत्तर प्रदेशात काँग्रेस पक्षाचं संपलेलं अस्तित्व पुन्हा मिळवण्याचा उद्देश आहे. मागील वीस वर्षांत उत्तर प्रदेशच्या राजकारणात काँग्रेसने जितके प्रयोग केले सगळे अपयशी ठरले. याला फक्त २००४ मधील निवडणुका अपवाद राहिल्या. या निवडणुकांमध्ये काँग्रेसने २० पेक्षा जास्त जागा जिंकल्या होत्या. मागील वर्षांत पक्षाने दक्षिणेतील निवडणूक मॉडेलवर काम करत तेलंगणामध्ये यश मिळवले.

या विजयानंतर पक्षात दक्षिणेतील नेत्यांचं वजन वाढलं. यामागे प्रियांका गांधी आणि त्यांच्या सुपर ग्रुपमधील रणनीतीकारांची भूमिका महत्त्वपूर्ण राहिली. आता असं मानलं जात आहे की या रणनीतीकारांनी दक्षिण भारतातील मॉडेलचा विचार करत तशा पद्धतीने रायबरेलीत व्यूहरचना करण्याचा प्लॅन रेडी केला आहे. जर हा डाव यशस्वी ठरला तर पुढील निवडणुकांतही अमलात आणला जाऊ शकतो.

follow us