BJP News : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी पुन्हा विरोधकांच्या घराणेशाहीवर जोरदार प्रहार केला आहे. काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांवर घराणेशाहीच्या राजकारणाची टीका करत मोदींनी आगामी निवडणुकीतील भाजपचा (BJP) अजेंडाही सेट केला. आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांत भाजपकडून समान नागरी कायदा, राम मंदिरासह घराणेशाही आणि वंशवादाच्या मुद्द्यांवर विरोधकांना घेरले जाईल हे आता स्पष्ट होत आहे.
भाजपकडून आगामी निवडणुकीत हे मुद्दे उचलले जाणार असले तरी भाजपसाठी ही तारेवरची कसरत ठरणार आहे. कारण, बिहार आणि उत्तर प्रदेशात ज्या प्रादेशिक पक्षांशी भाजपने युती केली आहे ते सर्वच पक्ष घराणेशाहीचेच राजकारण करतात. या दोन्ही राज्यात भाजपाचे सहकारी पक्ष त्यांच्या परिवारापर्यंतच मर्यादीत आहेत. जाती आधारीत या पक्षांकडे त्यांची स्वतःची व्होट बँक आहे त्यामुळे भाजप त्यांच्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही.
मोदी-केजरीवाल यांच्यातील वाद विकोपाला, केंद्राच्या ‘त्या’ अध्यादेशाची प्रत जाळणार
पार्टी विद द डिफरेन्स या टॅगलाइनसह भाजपने आपल्या राजकीय पारीला सुरुवात केली. तेव्हापासून घराणेशाही आणि जातीवादाला विरोध पक्षाच्या अजेंड्यात सामील झाले. अटल-अडवाणी युगानंतर 2000 नंतर ज्यावेळी पक्षात नवीन पिढीने एन्ट्री घेतली तेव्हा भाजपवरही वंशवादाचे आरोप झाले. काँग्रेससह सर्व विरोधी पक्ष वसुंधरा राजे, दुष्यंत सिंह, राजनाथ सिंह यांचा मुलगा पंकज सिंह, कल्याण सिंह यांचा मुलगा राजवीर सिंह, प्रमोद महाजनांची कन्या पूनम महाजन यांची नावे घेत भाजपवर टीका करत असतात.
इतकेच नाही तर राजकीय काळात अन्य परिवारवादी पक्षांशी निवडणुकीत तडजोडी करण्यासही भाजपने मागेपुढे पाहिले नाही. याची सुरुवात महाराष्ट्र आणि पंजाबपासून सुरू झाली. या राज्यांत भाजपने शिवसेना आणि पंजाबात शिरोमणी अकाली दल यांच्याबरोबर युती केली.
आता अशी परिस्थिती आहे की बिहारात लोकजनशक्ती पार्टी, हिंदुस्तानी आवाम मोर्चा (हम) तसेच उत्तर प्रदेशातील अपना दल, निषाद पार्टी हे सगळे पक्ष त्यांच्या कुटुंबांच्या जीवावरच निवडणुकीत उतरणार आहेत. पण या पक्षांना बरोबर घ्यावेच लागणार आहे. कारण, बिहार आणि उत्तर प्रदेशातील या पक्षांकडे मजबूत व्होट बँक आहे. जाती आधारीत पक्ष जिंकण्याची गॅरंटी देत नसले तरी मतांचे विभाजन करून प्रतिस्पर्धी पक्षाला हरवण्याची ताकद ठेवतात.
बिहारमध्ये 16 टक्के दलित आणि 14 टक्क अन्य जातींचे मतदार आहेत. 2020 मधील बिहारच्या निवडणुकीत लोजपाला विजय मिळवता आला नाही. या पक्षाला 5.69 टक्के मते मिळाली होती. भाजपला 19.46 टक्के मते मिळाली होती. जेडीयूला 15.39 टक्के आणि राष्ट्रीय जनता दलाला 23.11 टक्के मते मिळाली होती. हिंदुस्तानी आवाम मोर्चाला एक टक्क्यांपेक्षाही कमी मते मिळाली होती पण चार जागांवर विजय मिळाला होता. 2019 मधील लोकसभा निवडणुकांच्या तुलनेत या निवडणुकीत भाजपाच्या मतांची टक्केवारी कमी झाली होती. पण जागा वाढल्या होत्या.
म्हणून भाजपला दुर्लक्ष करणे शक्य नाही
उत्तर प्रदेशात अपना दल आणि निषाद पार्टीने भाजपाच्या विजयात मोठे योगदान दिले. 2022 मधील निवडणुकीत अपना दल आणि निषाद पार्टीने पूर्वांचल भागात भाजपला आघाडी मिळवून दिली. या दोन्ही पक्षांनाही त्याचा फायदा झाला. निषाद पार्टी 10 जागांवर लढली आणि पाच जागा जिंकल्या. मात्र, पक्षाला फक्त 0.91 टक्का मते मिळाली. अपना दलाने 17 जागांवर उमेदवार दिले होते. यातील 12 जागांवर विजय मिळाला. 1.62 टक्के मते मिळाली. उत्तर प्रदेशात 6 टक्के पटेल मतदार आहेत. ओबीसींच्या लोकसंख्येत निषाद जातीची लोकसंख्या 18 टक्के आहे. 13 लोकसभा मतदारसंघात त्यांचा प्रभाव आहे. राजकारणात जात हा असा फॅक्टर आहे ज्यामुळे भाजपाला अन्य घराणेशाहीचे राजकारण करणाऱ्या पक्षांशी युती किंवा आघाडी करणे भाग पडते.