LetsUpp Special : महाराष्ट्रातील दिग्ग्ज नेते शरद पवार व उद्धव ठाकरे हे पक्षातील बंडामुळे घायाळ झालेले आहेत. दोघांचे आमदार, खासदार हे पक्ष सोडून गेले आहेत. या घडीला दोघेही राजकीयदृष्टा जखमी अवस्थेतील ‘वाघ’ आहेत. राष्ट्रवादी-शिवसेना बंडानंतर आता पुढं काय होणार आहे ? या दोन बंडामधील फरक काय ? दोघांची 2024 साठीची रणनीती कशी असणार आहे. या अनेक मुद्द्यांवर लेट्सअपचे संपादक योगेश कुटे यांनी केलेले विश्लेषण वाचा.. (LetsUpp Special sharad pawar and udhav thackrey poilitical crisis)
ठाकरेंना बंडाचा अनुभव
उद्धव ठाकरे यांना बंड नवे नाही. ते वयाच्या ६३ व्या वर्षी बंडाला सामोरे गेलेले आहेत. तर शरद पवार हे ८३ व्या वर्षी पक्ष टिकविण्यासाठी लढत आहेत. राष्ट्रवादीतील हे पहिले बंड असले तरी शरद पवारांनी अनेक बंड केलेले आहेत. उद्धव ठाकरे यांना तीन बंडांचा सामना करावा लागला आहे. छगन भुजबळ, नारायण राणे, राज ठाकरे व एकनाथ शिंदे यांचे बंड आहेत. शरद पवार यांच्या पक्षातील हे पहिलेच बंड आहे. तसा उद्धव ठाकरे यांना बंडाचा पवारांपेक्षा मोठा अनुभव आहे.
पुतण्याचे बंड, सहकाऱ्यांचे बंड
पवारांची साथ पुतण्याने सोडली आहे. उद्धव ठाकरेंची विश्वासू सहकाऱ्यांनी साथ सोडले आहे. दोघात एक समान धागा म्हणजे दोघांचे पक्ष भाजपने फोडले आहेत. बंडांची वेगवेगळी कारणे आहेत. शरद पवार तुम्ही रिटायर केव्हा होणार, वडिलांच्या भूमिकेत, मार्गदर्शकाच्या भूमिकेत कधी जाणार आहे, असा सवाल करत अजित पवारांनी पक्ष सोडला आहे. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना मातोश्री व फेसबुकवर कारभार करतात, अशी टीका करत एकनाथ शिंदेंनी बंड केले आहे. अजित पवार व एकनाथ शिंदे दोघे हे बंड केलेले नसून, पक्षच आपल्याबरोबर आल्याने पक्षावर दावा सांगत आहेत. यात एकनाथ शिंदे हे निवडणूक आयोगात लढाई जिंकले आहेत. तर अजित पवारांची ही लढाई अद्याप बाकी आहे. तर शरद पवार यांनी शिल्लक राष्ट्रवादीचा नेता म्हणून हिणवले जात आहे. तिच गत उद्धव ठाकरेंची झालेली आहे. त्यांनाही शिल्लक सेनेच्या नेता म्हणून हिणवले जात आहे. दोघेही शिल्लक नेते झाले आहे.
बंड हाताळण्याची शैली
उद्धव ठाकरे व शरद पवारांची बंड हाताळण्याची शैली वेगळी आहे. एकनाथ शिंदे हे आमदार घेऊन सुरत, गुवाहाटी येथे गेले होते. त्यामुळे उद्धव ठाकरे व त्यांच्याबरोबर असलेले नेते आक्रमक झाले होते. कार्यकर्तेही आक्रमक होते. त्यामुळे मुंबईत येतील तेव्हा रक्ताचे पाट वाहतील, अशी भाषा वापरली गेली. परंतु पवारांनी बंड करणाऱ्यांवर आक्रमक भाषा वापरलेली नाही. शरद पवारांना आपले दरवाजे उघडे ठेवल्याचे उदाहरण आपण पाहिले आहेत. मंत्रिपदाची शपथ व मंत्रिपद मिळाल्यानंतर अजित पवार व इतर आठ मंत्रीहे पवारांना भेटायला गेले होते. तर उद्धव ठाकरेंनी बंडखोरांना मातोश्रीचे दरवाजे बंद केले आहेत. बंडखोरांना आपल्यासमोर येण्याची हिंमत नाही, असा ठाकरेंचा दावा आहे. हा दोघांमध्ये फरक असला तरी पक्षामध्येही फरक आहे. शिवसेना रस्त्यावरचा पक्ष आहे. त्यांचे कार्यकर्ते फाटके व आक्रमक आहेत. तर राष्ट्रवादी हा नेत्यांचा पक्ष आहे.
शरद पवार आक्रमक का नाही ?
पुतण्याच फुटल्याने शरद पवार हे आक्रमक होऊ शकत नाही. ही त्यांची अडचण आहे. याउलट उद्धव ठाकरे यांच्या घरातील कुणी फुटलेले नाहीत. त्यामुळे ते फुटणाऱ्यांविरोधात गद्दार, खुंजीर खुपणे, नालायक ही भाषा वापरत आहेत. अद्याप तरी पवारांनी पुतण्याविरोधात चुकीचा शब्द वापरलेला नाही.
शरद पवारांची खेळी ?
अजित पवारांचे बंड म्हणजे शरद पवार यांची खेळी असल्याचा समज अद्याप दूर झालेले नाही. अजित पवार व शरद पवार हे एकत्र येतील. अजित पवारांना शरद पवारांनीच भाजपमध्ये पाठविल्याचे राजकीय चर्चाही संपलेली नाही. याउलट उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदेंबाबात असे समज नाही. उद्धव ठाकरे हे शिंदेंची जुळवून घेणार अशी परिस्थिती सध्या तरी नाही. हा फरक आहे.
राजकीय वारसा कुणाकडे ?
शरद पवारांचा राजकीय वारस कोण आहे हे अद्याप निश्चित नाही. एका पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी राष्ट्रवादीचा आश्वासक मीच असल्याचे म्हटले आहेत. तर उद्धव ठाकरे यांच्या राजकीय वारसा आदित्य ठाकरे यांच्याकडे येणार आहे.
कुणाकडे कोणते नेते ?
शरद पवारांकडे सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार, जयंत पाटील हे असे फायरब्रॅण्ड नेते आहेत. उद्धव ठाकरेंकडे खासदार विनायक राऊत, संजय राऊत, अरविंद सावंत, ओमराजे निंबाळकर, भास्कर जाधव, सुषमा अंधारे हे फायरब्रॅण्ड नेते आहेत.
कुणाची कुठे ताकद ?
राष्ट्रवादीला मानणारे मतदार हे ग्रामीण भागातील आहेत. तर मुंबई-ठाणेतील मतदार उद्धव ठाकरेंची ताकद आहे. तर मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रात दोघांची समसमान ताकद आहे. परंतु विदर्भात मात्र दोघेही कमकूवत आहेत. पक्ष फुटल्यानंतर शरद पवार हे कामाला लागले आहेत. त्यांनी लगेच नाशिक दौऱ्या केला. फुटलेल्या गटाला नामोहरम कसं करता येईल, याची रणनीती शरद पवारांनी आखली आहे. सध्या तरी उद्धव ठाकरेंची रणनीती दिसून येत नाही. शरद पवार हे भाजपमधील नाराजांना आपल्याकडे घेण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी ते लोकांमध्ये जात आहेत. उद्धव ठाकरे हे जनतेत गेलेले नाहीत. सहानुभूतीचा फायदा त्यांना घेता आलेला नाही. सुषमा अंधारे, आदित्य ठाकरे यांनी राज्यात यात्रा काढल्या आहेत. बहुतेक उद्धव ठाकरे हे पावसाळ्यानंतर तयारीला लागतील.
भावनिक राजकारणाचा फायदा उठवतील का ?
या दोन्ही नेत्यांची मदारही 2024 साठी असणार आहे. ते भाविनक राजकारण खेळतील. कारण बंड, फुटीनंतर भारतीय मतदार हे मूळ नेत्यांना मदत करतात. भाजपचा हिंदुत्वाचा नारा आहे. त्यामुळे मुस्लिम मतदारांना आपल्याकडे वळविण्याची रणनिती पवार व ठाकरेंची असेल. त्याचबरोबर एसटी, एससी मतेही वळविली जातील. विरोधांच्या इंडियामध्ये शरद पवार, उद्धव ठाकरे हे महत्त्वाचे नेते आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात पवार, ठाकरे व काँग्रेस विरुध्द एकनाथ शिंदे-अजित पवार व भाजप असा सामना 2024 मध्ये रंगणार आहे.
व्होट बँक
मराठा व्होट बँक शरद पवारांच्या पाठीमागे उभी राहिली आहे. तो अभ्यास शरद पवार हे करतील. मुंबईत उद्धव ठाकरेंचा करिश्मा चालला तर त्यांना ते लाभदायक ठरेल. उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यात दोघांची समान ताकद आहे. तर विदर्भात दोघांची ताकद कमी आहे. तेथे काँग्रेसची ताकद चांगली आहे. इकडे भाजप त्याच पद्धतीने टक्कर देईल. ठाण्यात शिंदे, तर पश्चिम महाराष्ट्र व पुण्यात अजित पवारांची ताकद आहे. 2024 ची निवडणूक ही उद्धव ठाकरे व शरद पवारांसाठी जीवन मरण्याची लढाई आहे. सत्तेत येण्यापेक्षा आपला पक्ष टिकवणे ही सगळ्यात मोठी जबाबदारी दोघांची आहे. सत्तेत आले तर हा मोठा चमत्कार ठरेल. हे घडेल की नाही त्यासाठी 2024 ची वाट पाहावी लागणार आहे.