Download App

अजितदादांनी डावललं, फडणवीस-शाहंनी गोंजारलं… भुजबळांचा भाजप प्रवेशाचा मुहूर्त जवळ आलाय?

नागपूरचे हिवाळी अधिवेशन संपले. त्यानंतर लगेचच राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची सागर बंगल्यावर भेट झाली. दोघांमध्ये अर्धा तास चर्चा झाली. फडणवीस यांनी नाराज भुजबळ यांची समजूत काढण्यासाठी महायुतीचे नेते एकत्र बसून निर्णय घेतील, असे सांगितले. आता महिन्याभरानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) महाराष्ट्रात आले. मालेगावमधील कार्यक्रमाला गेले. शहा व्यासपीठावर येताच सगळे उठून उभे राहिले, शाहंनी मागच्या रांगेत बसलेल्या भुजबळांना बघितले अन् त्यांना आपल्या जवळ बोलवून घेत शेजारी बसवले. दोघांमध्ये दहा मिनिटे संवादही झाला. यानंतर भाषणात शहा यांनी भुजबळांना महा युतीमधील मोठे नेते असं म्हणत आणखी सन्मानित केले. तर भुजबळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या कामाचे जाहीर कौतुक केले. (NCP leader Chhagan Bhujbal is upset and is likely to join the BJP soon)

छगन भुजबळ मंत्रि‍पदावरून डावलल्याने नाराज आहेत. याबद्दल त्यांनी स्वतः अनेकदा जाहिररित्या भाष्य केले आहे. पण मागच्या दीड महिन्यांपासून उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रमुख अजित पवार यांनी छगन भुजबळ यांच्या नाराजीची साधी दखलही घेतलेली नाही. ना दोघांमध्ये भेट झाली ना दोघांमध्ये काही संवाद झाला. उलट भुजबळांचे खूप लाड झाले आहेत, त्यांना कुठे जायचं आहे तिकडे जाऊ द्या, असे म्हणणाऱ्या मंत्री माणिकराव कोकाटे यांनाही अजितदादांनी थांबवलं नाही. त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भुजबळ यांच्या नाराजीची घेतलेली दखल, त्यांना भेटीसाठी आणि चर्चेसाठी दिलेला वेळ, त्यांना जाहिररित्या दिलेला विशेष सन्मान गोष्टींनी सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

याच घडामोडींमुळे भुजबळ राष्ट्रवादीपासून लांब जाऊन भाजपच्या जवळ जात असल्याचे दिसून येते. राष्ट्रवादीसाठी भुजबळांची उपयुक्तता संपली असे वाटत असले तरी भाजपला मात्र भुजबळांची उपयुक्तता वाटत आहे. त्याचमुळे येत्या काही भुजबळ भाजपमध्ये प्रवेश करू शकतात अशा चर्चा आहेत. भुजबळ यांनी या चर्चांचे खंडन केले असले तरी राज्याच्या राजकीय वर्तुळात या चर्चा थांबताना दिसत नाहीत. राजकीय जाणकार तर येत्या काही दिवसात भुजबळांचा 100 टक्के भाजप प्रवेश होईल असा दावा करत आहेत. भुजबळांचा भाजप प्रवेश हा त्यांच्या आणि भाजपसाठीही फायद्याचे असल्याचे सांगितले जात आहे.

याच पार्श्वभूमीवर पाहुया भुजबळ राष्ट्रवादी सोडून जाऊ शकतात का? गेल्यास भुजबळ आणि भाजपला कसा फायदा होईल?

भुजबळ यांच्या नाराजीचे पहिले कारण आहे ते ओबीसी आरक्षण मुद्द्यावर राष्ट्रवादीतून न मिळालेली साथ. मागचे वर्षभर राज्यात मराठा विरूद्ध ओबीसी हा आरक्षणाचा वाद सुरू होता. मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या या मागणीवर ठाम होते, तर भुजबळ ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी लढत होते. पण या मुद्द्यावर त्यांना त्यांच्या पक्षातून म्हणावी तशी साथ मिळाली नसल्याचे सांगितले जाते. अजित पवार यांनी पद्धतशीरपणे आरक्षण या विषयापासून चार हात अंतर राखले. या संपूर्ण लढाईत भुजबळ राष्ट्रवादीमध्ये एकांड्या शिलेदारासारखे लढत होते. उलट आमचा डीएनएच ओबीसींचा आहे, असे म्हणत या लढ्यात भुजबळ यांना भाजपची साथ मिळाली. पण भाजपने कोणताही नेता या लढाईत उतरवला नाही. पंकजा मुंडे यांनाही जालन्यामधील ओबीसी मेळाव्यात जाण्यापासून रोखण्यात आले. संपूर्ण फोकस भुजबळांवर राहील आणि आपल्यावर मराठा समाज नाराज होणार अशी दुहेरी खबरदारी भाजपने घेतली.

मागच्या वर्षापासून सतत डावलल्याचे दु:ख भुजबळांना आता असह्य होत आहे. आधी भुजबळ यांना भाजपने नाशिकमधून लोकसभा निवडणूक लढण्यासाठी गळ घातली होती. भुजबळ उभे राहणार असतील तर नाशिकची जागा राष्ट्रवादीला सोडू असा प्रस्तावही अजित पवार यांना देण्यात आला होता. मग भुजबळ यांनीही लोकसभेची तयारी सुरू केली. त्यातून शिवसेना विरूद्ध भुजबळ अस संघर्षही पाहायला मिळाला. पण इथेही राष्ट्रवादी काँग्रेसकडून भुजबळांना म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. शेवटापर्यंत भुजबळ यांचे तिकीटच जाहीर झाले नाही. शेवटी जागा शिवसेनेलाच सुटली. त्यानंतर भुजबळांनी राज्यसभेवर खासदार होण्याची इच्छा व्यक्त केली. पण इथेही राष्ट्रवादीने सुनेत्रा पवार आणि नितीन पाटील यांना संधी दिली.

मोठी बातमी : शरद पवारांची तब्येत बिघडली; कोल्हापुरातही बोलताना होत होता त्रास, सर्व दौरे रद्द

मग भुजबळांना मंत्रि‍पदावरून डावलण्यात आले. हे त्यांचे दुसरे मोठे दु:ख आहे. राष्ट्रवादीत आज घडीला अजित पवार यांच्यापेक्षाही वयाने आणि अनुभवाने सर्वात वरिष्ठ कोण असेल तर ते भुजबळच आहेत. अशावेळीही डावलल्याने भुजबळ नाराज झाले. त्यांनी नागपूर अधिवेशनाकडे पाठ फिरवली. नाराजी जाहीरपणे बोलून दाखविली. राष्ट्रवादीच्या शिर्डीतील मेळाव्यात उपस्थित राहण्यासाठी नकार दिला. सुनिल तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी आग्रह केल्यानंतर ते काही वेळासाठी मेळाव्यात आले. पण इथे कोणत्याही नेत्यासाठी आलेलो नाही, आपली नाराजी अजूनही कायम आहे, असे सांगितले.

भुजबळ यांना आणखी गोष्ट डसतीय ती म्हणजे माणिकराव कोकाटे यांना दिलेले मंत्रीपद. दोघंही एकाच पक्षात शिवाय भुजबळांचा येवला आणि कोकाटेंचा सिन्नर हे मतदारसंघही एकमेकांना लागून. पण दोघांचे अजिबात जमत नाही. एकाच पक्षात असूनही शह-काटशहाच राजकराण रंगत असते. आता कोकाटे सत्तेत आहेत, पदावर आहेत. त्यामुळे कार्यकर्ते कोकाटे यांच्या मागे जाऊ शकतात. 2014 पूर्वी पर्यंत नाशिक म्हणजे भुजबळ असे समीकरण फिक्स होते. अशात आपल्याला न दिल्याने, कोकाटेंना संधी दिल्याने आणि आपल्या नाराजीची दखलही न घेतल्याने भुजबळ आतून दुखावले आहेत. आता हा वर्चस्वाचा केंद्रबिंदु कोकाटेंच्या दिशेने सरकू शकतो, याची भीती भुजबळांना आहे.

भुजबळ यांच्या येण्याने भाजपलाही मोठा फायदा होऊ शकतो. भाजपच्या माधव पॅटर्नमध्ये फीट बसणारा चेहरा म्हणून भुजबळांकडे पाहिले जात आहे. सुरुवातीच्या काळात भाजपची ओळख ‘शेटजी-भटजीं’चा पक्ष अशीच होती. मात्र, सत्तर-ऐंशीच्या दशकात वसंतराव भागवत यांच्यासारख्या जनसंघाच्या नेत्यांनी भाजपला इतर मागासवर्गीयांमध्ये पोहोचवण्याचे प्रयत्न केले. त्यातूनच माळी-धनगर-वंजारी अर्थाच माधव फॉर्म्युला आला. यातून गोपीनाथ मुंडे, पांडुरंग फुंडकर, एकनाथ खडसे, माधवराव शिवणकर यांसारखे नेते तयार झाले. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात ओबीसी समाजात भाजपला चांगला जनाधार मिळाला.

भाजपच्या याच माधव पॅटर्नमध्ये भुजबळ परफेक्ट बसू शकतात. या पॅटर्ननुसार वंजारी समाजाचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या पंकजा मुंडे मंत्रिमंडळात आहेत. तर धनगर समाजाचे राम शिंदे विधान परिषदेचे सभापती आहेत. तर अतुल सावे आणि जयकुमार गोरे यांच्या रुपाने माळी समाजाला प्रतिनिधीत्व दिले आहे. पण महाराष्ट्रात माळी समाजाचा नेता अशी ओळख या नेत्यांना निर्माण करता आलेली नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यातूनच भुजबळ यांच्यासारखा नेता पक्षात असावा असे भाजपला वाटत असावे. त्यामुळेच भुजबळांबाबत भाजप नेत्यांना ममत्व दिसून येते आहे.

नाराज भुजबळ BJPमध्ये प्रवेश करणार का? भाजपचा बडा नेता म्हणाला, ‘त्यात काय गैर…’

भुजबळ भाजपमध्ये आल्यास पंकजा मुंडे, राम शिंदे किंवा चंद्रशेखर बावनकुळे या नेत्यांपेक्षा ओबीसींचे नेतृत्व त्यांच्याकडे दिले जाऊ शकते. यातून पंकजा मुंडे यांचीही ताकद मर्यादित राखता येऊ शकते. शिवाय लवकरच बिहारची विधानसभा निवडणूक आहे, समता परिषदेच्या माध्यमातून भुजबळ यांचे बिहारमध्ये चांगले काम आहे. तिथल्या ओबीसी मतदारांमध्ये भुजबळ यांना बऱ्यापैकी मान्यता आहे, त्याचाही फायदा भाजपला होऊ शकतो. भुजबळ सध्या जामीनावर आहेत. त्यामुळे आपले हात अजून तरी दगडाखाली आहेत, याची भुजबळ यांना कल्पना आहे. त्यामुळे भाजप आणि फडणवीस यांच्याकडून त्यांचा पुरेपुर वापर केला जाऊ शकतो.

त्याचवेळी भुजबळ भाजपमध्ये आले तर त्यांचे राजकीय पुनर्वसन कसे करणार, हा प्रश्नही भाजपपुढे असणार आहे. भुजबळ सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर विधानसभेचे सदस्य आहेत, ते भाजपवासी झाल्यास त्यांना राजीनामा देऊन पुन्हा लढून जिंकावे लागेल. त्यानंतर फडणवीस सरकारमध्ये भाजपच्या कोट्यातील एक मंत्रिपद रिक्त आहे. ते भुजबळ यांना दिले जावू शकते. दुसरा पर्याय म्हणजे राज्यात मंत्री न करता केंद्रात मंत्री करणे वा राज्यसभेवर पाठविणे हादेखील एक पर्याय असेल.

याच सगळ्या समीकरणांमुळे भुजबळ आणि फडणवीस यांच्यातील सख्य वाढल्याचे दिसून येते आहे. अमित शाह त्यांना विशेष सन्मान देत असल्याचे बोलले जाते. थोडक्यात “कभी डर ना लगा… मुझे फासला देख कर… मैं बढ़ता गया रास्ता देखकर… खुद ही खुद नजदीक आती गयी मंजिल… मेरा बुलंद हौसला देखकर” असे म्हणत भुजबळ लवकरच राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजप प्रवेश करू शकतात, असे म्हंटल्यास वावगे ठरणार नाही.

follow us