Download App

Balasaheb Thackeray : “शाखा प्रमुख ते मुख्यमंत्री, हा प्रवास फक्त बाळासाहेबांमुळे” Narayan Rane यांच भावनिक पत्र

  • Written By: Last Updated:

बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या जयंतीनिमित्त केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनीही पत्र लिहित बाळासाहेबांप्रती असलेल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच बाळासाहेबांच्या शेवटच्या दिवसांमध्ये त्यांना भेटू शकलो नाही, याची खंत असल्याचेही त्यांनी पत्रात लिहले आहे.

काय लिहले आहे पत्रात ?

आदरणीय बाळासाहेबांच्या निधनाचं वृत्त मी टेलिव्हिजनवर पाहिलं. माझ्या हृदयात भावनांचा कल्लोळ उसळला होता आणि त्यांच्यासोबत घालवलेल्या कितीतरी क्षणांच्या आठवणीनं माझे डोळे ओलावले होते. माझ्या आत उचंबळून येणाऱ्या भावनांना मी कागदावर शब्दांतून मांडण्याचा प्रयत्न केला.

सेना सत्तेवर आहे की नाही या गोष्टीचा त्यांच्यार कधी परिणामच झाला नाही. ते नेहमीच आपली बोलण्यावागण्याची राजेशाही शैली तशीच राखून असत. त्यांच्यासारखे खरोखर तेच एकमेव होते. आपल्या काम करण्याच्या खास पद्धतीमुळे त्यांना राष्ट्रीय पातळीवर प्रतिष्ठा मिळालेली होती. असं व्यक्तिमत्त्व माझ्या गुरूस्थानी आहे हे सांगताना मलाही अभिमान वाटत असे. साहेब, आपल्या शेवटच्या दिवसांत मला आपल्याला भेटता आलं नाही याची मला आयुष्यभर खंत राहणार आहे.

साहेब अतिशय दयाळू स्वभावाचे होते. ते पक्के राजकारणी कधीच नव्हते. आपलं माणूसपण त्यांनी शेवटपर्यंत जपलं. आपल्या तीक्ष्ण बुद्धीनं आणि परोपकारी स्वभावामुळे त्यांना समाजाच्या सगळ्या थरांमधून मित्र आणि अनुयायी लाभले होते. १९६६ मध्ये मराठी माणसाची एकमेव आशा म्हणून त्यांनी शिवसेनेची स्थापना केली आणि नंतर त्यांनी कडव्या हिंदुत्वाचा पुरस्कार केला. त्यामुळेच मराठी माणूस आणि माझ्यासारखे तरूण त्यांच्याकडे चुंबकासारखे आकर्षित झाले होते. पक्ष चालवताना आपल्या पक्षाच्या माणसांवर ते प्रेमाचा जो वर्षाव करीत आणि जो विश्‍वास दाखवीत, त्यामुळे ती माणसं त्यांच्यासाठी जिवावर उदार व्हायलाही मागेपुढे पहात नसत. ते आपल्या माणसांची नेहमीच काळजी घेत आले होते. दुःखाच्या प्रसंगी ते विचारपूस करायला ते कधीही विसरले नाहीत. अशा वागणुकीमुळेच ते आपल्या पक्षाचेच नाही तर अवघ्या महाराष्ट्राचे लाडके नेते होते.

मला स्वतःला साहेबांचं खूप प्रेम मिळालं. त्यांनी माझ्यावर खूप विश्‍वास ठेवला होता. मी आज जो आहे तो त्यांच्यामुळे आहे हे कबूल करण्यात मला कसलाही कमीपणा वाटत नाही. माझ्या राजकीय यशात साहेबांचा सिंहाचा वाटा आहे. ‘माणसानं विचारानं श्रीमंत असावं आणि ही श्रीमंती त्यानं वाटत राहिली पाहिजे’ हा त्यांचा विचार माझी नेहमी पाठराखण करत राहील. शाखा प्रमुख ते मुख्यमंत्री ते विरोधी पक्ष नेता असा माझा जो अविश्वसनीय प्रवास झाला आहे तो केवळ साहेबांच्यामुळेच शक्य झाला आहे. त्यांनी आपला भक्‍कम पाठिंबा दिला. म्हणूनच मी माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या उण्यापुऱ्या नऊ महिन्यांच्या कारकीर्दीत
लक्षात राहील असं काम करू शकलो.

त्यांचं धैर्य जेवढं जबरदस्त होतं तेवढंच माणसं ओळखण्याचं कौशल्यदेखील कोतुकास्पद होतं. त्याच्याही पलिकडे जाऊन ते जगातल्या अव्वल दर्जाच्या प्रतिभावंत व्यंगचित्रकारांपैकी एक होते. लेखक आणि संपादक म्हणून ते किती उच्च दर्जाचे होते ते त्यांनी आपल्या सामना आणि मार्मिक या प्रकाशनांमधून दाखवलंच आहे. आपल्या जबर इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी सेनेला कोणत्याही संकटातून सहीसलामत बाहेर काढलं आहे.

त्यांनी कधीही धर्माबाबत किंवा राष्ट्रीय हिताबाबत कसलीच तडजोड स्वीकारली नाही. घायाळ करणारं वक्तृत्व आणि रोखठोक स्वभाव असूनही त्यांना सगळ्या क्षेत्रात मित्र लाभले आणि अवघ्या भारतात त्यांना नेता म्हणून लोकप्रियता मिळाली. 39 वर्षे मला लाभलेल्या त्यांच्या सहवासातल्या आठवणी आणि त्यांनी मला दिल्रेलं प्रेम याबद्दल लिहिता लिहिता कागद संपून जाईल पण आठवणी संपणार नाहीत.

आपल्या शेवटच्या दिवसात त्यांची मृत्यूशी झुंज सुरू होती. मला वाटलं ते याही वेळेस मृत्यूला चकवून बरे होतील. पण ते आपल्यातून निघून गेले. मी घेतलेल्या निर्णयानं त्यांना खूप यातना झाल्या असणार आणि त्याबद्दल मला आजन्म दुःख राहणार आहे. पण त्या परिस्थितीत माझा नाईलाज होता. काही लोकांच्या मुळं मला तो निर्णय घेणं भाग पडलं. असो. आता त्याबद्दल बोलून काही फायदा नाही.

साहेब, तुम्ही माझ्या आई-वडिलांपेक्षा जास्त प्रेम मला दिलंत. सेना सोडून बाहेर पडल्यावरदेखील तुम्ही मत्रा दोनदा फोन केलेत. तुमच्या हृदयाच्या मोठेपणाचा आणखी कोणता पुरावा दयावा?

त्यांची प्रकृती बरी नसताना मला त्यांना भेटायचं होतं. ते करता येत नसल्यामुळे मी प्रचंड अस्वस्थ होतो. त्यांना शेवटचं पहाण्याची संधी मला मिळू शकली नाही आणि ते आपल्यातून निघून गेले. साहेब! मी आपल्याला शेवटचा नमस्कारही करू शकलो नाही. मला क्षमा करा!

Tags

follow us