Sharad Pawar Vs Prithviraj Chavan : शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यातील भांडण नवीन नाही. शरद पवार यांनी आज चव्हाण यांच्या सातारा जिल्ह्यात जाऊन तो राग पुन्हा व्यक्त केला. चव्हाण हे राष्ट्रवादी काॅंग्रेस संपविण्यासाठीची सुपारी घेऊनच राज्यात २०१० मध्ये सुपारी घेऊन आले होते, असे आजही अनेक राष्ट्रवादीच्या नेत्यांना वाटते. चव्हाण यांनी राष्ट्रवादीला जेवढे धक्के दिले (किंवा डॅमेज) केले तेवढे काॅंग्रेसच्या कोणत्याच नेत्याने केले नाही, असे राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांचे आजही मत आहे. त्यामुळेच राष्ट्रवादीच्या निशाण्यावर ते नेहमीच असतात.
चव्हाण यांनी कर्नाटक विधानसभेच्या प्रचारात बोलताना राष्ट्रवादीला पुन्हा संशयाच्या भोवऱ्यात उभे केले. राष्ट्रवादीची भाजपशी बोलणी सुरू असल्याचा आरोप करत त्यांनी राष्ट्रवादी ही भाजपची बी टिम असल्याचे सूचित केले. त्यावरून हा वाद पेटला.
चव्हाणांची पक्षात काय जागा आहे, ते आधी तपासावं, असा टोला पवार यांनी आज लगावला. त्यांनी त्यांच्या पक्षात काय स्थान आहे. ते ए
आहेत, की बी
आहेत, की सी
आहेत, की डी
आहे ते आधी तपासावं. त्यांच्या पक्षातल्या इतर सहकाऱ्यांना विचारलं की यांची कॅटेगरी कोणती आहे, तर ते तुम्हाला खासगीत सांगतील. जाहीर नाही सांगणार, अशा शब्दात पवारांनी पृथ्वीराज चव्हाणांचा समाचार घेतला.
पवार यांनी चव्हाण यांच्याविषयी आताच असे मत व्यक्त केलेले नाही. चव्हाण हे मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडून काही फायलींवर स्वाक्षऱ्या होत नव्हत्या. त्या वेळी हाताला लकवा मारला आहे का, असा सवाल पुण्यातील बालगंधर्व कार्यक्रमात बोलताना पवारांनी विचारला होता. अनेकांच्या म्हणण्यानुसार लवासा संदर्भातील फाईल या चव्हाण यांनी अडकवून ठेवल्या होता.
अजित पवार यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत चव्हाण यांच्यासोबत उपमुख्यमंत्री म्हणून काम करणे म्हणजे जुलमाचा रामराम होता, असे थेटपणे सांगितले होते. त्या तुलनेत उद्धव ठाकरे यांच्याशी आपले सौहर्दाचे संबंध उपमुख्यमंत्री असल्याचे अजितदादा म्हणाले होते. चव्हाण यांनीच राज्यात मोठ्या प्रमाणात खर्च करूनही सिंचन क्षमता वाढली नसल्याचा मुद्दा काढला होता. त्यात अजित पवार यांनी काही निविदा मंजूर करण्यावरून वाद निर्माण झाला. तो कथित जलसंपदा घोटाळा अजूनही अजित पवारांची पाठ सोडत नाही.
राष्ट्रवादीला हैराण करणारा दुसरा मुद्दा म्हणजे राज्य सहकारी बॅंकेचा. राष्ट्रवादीचे वर्चस्व असलेल्या राज्य सहकारी बॅंकेचे संचालक मंडळ बरखास्त करून चव्हाण यांनी त्या पक्षाला पुरते अडचणीत आणले. राज्य सहकारी बॅंकेतील गैरव्यवहारावरून अजित पवार यांच्यासह अनेक बडे नेते घामाघून झाले आहेत. चव्हाण यांनी कारवाई करून आता दहा वर्षे झाली. पण कोणतेही सरकार तेथे सभासद नियुक्त संचालक मंडळ नेमण्याचे धाडस करू शकलेले नाही.
चव्हाण यांनाही मग राष्ट्रवादीने २०१९ मध्ये दणका दिला. महाविकास आघाडी तयार होत असताना काॅंग्रेसकडे कोणते पद द्यायचे यावर विचार सुरू असताना विधानसभा अध्यक्षपद हे काॅंग्रेसकडे आले. या पदावर चव्हाण यांची चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादीने त्यास जोरदार आक्षेप घेतला होता. त्यामुळे चव्हाण यांना ते पद मिळू शकले नाही.
चव्हाण यांनी जाहीरपणे राष्ट्रवादीच्या नेत्यांविषयी थेट भाष्ये केली नाहीत. पण मुख्यमंत्री असताना कागदावर असे काही शेरे मारले की अनेक नेत्यांना आजही घाम पुसावा लागतो. राष्ट्रवादीच नव्हे तर स्वपक्षातील अनेक नेत्यांनाही चव्हाण यांनी अडचणीत आणले होते. मी खरोखरीच कारवाई केली असती तर राज्याचे अनेकम मुख्यमंत्री तुरुंगात असते, असे त्यांनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी एका मुलाखतीत सांगितले होते. हे सारे मुख्यमंत्री काॅंग्रेसचे होते. त्यामुळे काॅंग्रेसमधील नेतेही त्यांच्यावर संतप्त झाले होते. चव्हाण यांना स्वपक्षातही कोणी मित्र नसल्याचे त्यामुळेच बोलले जाते. चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली २०१४ ची विधानसभा निवडणूक लढण्यास ऐनवेळी नकार देऊन राष्ट्रवादीने चव्हाण यांच्यावर सूड उगवला. या निवडणुकीत राज्यातील प्रमुख चारही पक्ष स्वतंंत्रपणे लढले. इकडे शिवसेना-भाजप युती तुटताच राष्ट्रवादीने चव्हाण सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. काॅंग्रेस या धक्क्यासाठी तयार नव्हती. त्या निवडणुकीत काॅंग्रेसचे पानिपत झाले.
Video : लफंग्या नेत्यांचे बुरखे टराटरा फाडणार…
चव्हाणांना झोंबणारा पराभव
राज्याच्या राजकारणात गांधी कुटुंबाचे निष्ठावंत ही चव्हाण कुटुंबियांची ओळख आहे. आधी यशवंतराव चव्हाण आणि नंतर शरद पवार यांच्या विरोधात भूमिका मांडणारे म्हणून आनंदराव चव्हाण (पृथ्वीराज यांचे वडिल), प्रेमलाकाकी (काॅंग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षा आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या मातोश्री) आणि स्वतः पृथ्वीराज यांची भूमिका राहिली. त्यामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची स्थापना १९९९ मध्ये झाल्यानंतर चव्हाण हे पवारांसोबत न जाता काॅंग्रेससोबतच राहिले.त्यातून लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या श्रीनिवास पाटील यांनी त्यांचा पराभव केला.हा पराभव चव्हाण यांना झोंबणार होता.
पवारांच्या बैठकीला गेले आणि चव्हाणांचे केंद्रीय मंत्रीपद हुकले…
पृथ्वीराज चव्हाण यांचे पहिले केंद्रीय मंत्रीपद कसे हुकले, याचाही किस्सा या निमित्ताने वाचायला हवा. चव्हाण हे पहिल्यांदा १९९१ मध्ये कराडमधून खासदार झाले. त्या वेळी राजीव गांधी यांचे नुकतेच निधन झाले होते. काॅंग्रेसचे अध्यक्षपद पी. व्ही. नरसिंहराव यांच्याकडे आले होते. पंतप्रधान कोण होणार, यावर राव, शरद पवार आणि अर्जुनसिंह यांच्यात चुरस होती. पवार यांच्यासाठी जुळवाजुळव करण्यासाठी तत्कालीन खासदार आणि पवार यांचे निकटवर्तीय सुरेश कलमाडी यांनी पुढाकार घेतला होता. त्यासाठी एका बैठकीचे आयोजन करणण्यात आले होते. या बैठकीला चव्हाण उपस्थित होते. हे नरसिंहराव यांना कळताच त्यांनी नाराजी व्यक्त केली.
चव्हाण यांना हे कळताच रदबदली करण्यासाठी विदर्भातील काॅंग्रेसचे नेते भाऊसाहेब मुळूक यांना घेऊन ते राव यांच्याकडे गेले. हा पोरगा आपलाचा आहे, अशा शब्दांत मुळूक यांनी राव यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. पण राव यांनी चव्हाण यांच्या मंत्रीपदावर काट मारली ते मारलीच. त्या बैठकीला गेल्यामुळे ही काट मारल्याचे सांगत पुन्हा कधीतरी विचार करू, असे राव यांनी स्पष्टपणे सांगितले. ती नंतरची वेळ थेट २००४ मध्ये आली. मनमोहनसिंग यांच्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीत पीएमओची सूत्रे राज्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे होती. पण तेथेही चव्हाण हे पवार यांच्या विरोधात बातम्या दिल्लीतील वर्तुळात पेरत असल्याचा संशय पवार समर्थकांना होता.