अहमदनगर : बाळासाहेब थोरात व राधाकृष्ण विखे या दोन दिग्गज नेत्यांमधील राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. दोघे एकाच पक्षात असताना पक्षस्तरावर हा वाद डोकेदुखी ठरत होता. दोघे कायमच एकमेंकावर कुरघोड्या करत होते. त्यात काही वर्षांत सत्यजित तांबेंवरून दोन्ही नेत्यांमध्ये संघर्ष निर्माण होत होता. तांबे यांच्यासाठी त्यांचे मामा बाळासाहेब थोरात हेच आधार म्हणून होते. विखे व थोरात संघर्षात तांबे यांनाही फटका बसला. आता मात्र हेच विखे सत्यजीत यांच्या विधान परिषदेच्या उमेदवारीच्या स्वागतासाठी आघाडीवर असल्याचे दिसून आले.
या दोघांमधील राजकीय समीकरणांचा धांडोळा घेतला तर अनेकदा विखेंनी तांबेंना धोबीपछाडच केले आहे. तांबेंनी विखेंच्या शिर्डी-राहता विधानसभा मतदारसंघात लक्ष घालण्याचा प्रयत्न केला. तो विखेंनी त्यांच्या पद्धतीने हाणून पाडला होता.
या दोघांमधील पहिला थेट संघर्ष हा २००७ च्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या वेळी घडला. राधाकृष्ण विखे यांची पत्नी शालिनी विखे यांचा या निवडणुकीच्या निमित्ताने राजकारणात प्रवेश झाला होता. तर तांबेही जिल्हा परिषदेत निवडून आले होते. अध्यक्षपद हे खुले होते. थोरात यांना आपले भाचे सत्यजीत यांना अध्यक्षपदी बसवायचे होते. तर विखे हे पत्नी शालिनी विखे यांच्यासाठी आग्रही होते. दोघांतील वाद पक्षश्रेष्ठींकडे गेला होता. दोघांना सव्वा-सव्वा वर्षे पद देण्याचा ठरले होते. मात्र शालिनी विखे संपूर्ण अडीच वर्षे हे पद भूषविले. सत्यजीत यांना हात चोळत बसावे लागले.
त्यानंतर २००९ च्या विधानसभा निवडणुकीत शिर्डी मतदारसंघातून राधाकृष्ण विखे हे अवघ्या काही हजार मतांच्या आघाडीने निवडून आले होते. ही आघाडी कमी होण्यावरून विखे यांनी थोरातांवरच आरोप तर केलाच होता, त्यात सत्यजित तांबेंचा सहभाग असल्याचा दावा केला होता. शिर्डी मतदारसंघात तांबे लक्ष घालतात, विरोधी उमेदवाराला मदत करतात, असा आरोप विखेंनी केला होता. त्यावरून हा संघर्ष वाढला. त्यामुळे २००७ ते २०१२ या जिल्हा परिषदेच्या कार्यकाळात शालिनी विखे या पाच वर्षे अध्यक्ष राहिल्या. त्यामुळे तांबेंना पाच वर्षे कोणतेच पद जिल्हा परिषदेसाठी मिळू शकले नाही.
त्यानंतर २०१२ मध्ये सत्यजीत यांना झेडपीचे उपाध्यक्षपदाची संधी होती. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांना शब्द दिला. मात्र चव्हाण यांनी त्यांना विखेंना भेटून वाद मिटवून घेण्यास सांगितले. या सूचनेनुसार तांबे हे राधाकृष्ण विखे यांना भेटले होते. दोघांमधील वाद मिटले होते. तांबे यांनीही उपाध्यक्षपदाचा अर्जही विखे यांच्या उपस्थित भरला होता. तर काँग्रेसचे सदस्य सांभाळण्याची जबाबदारी विखे यांनी पार पडली होती. विखेंनी इतकी मनापासून मदत केली की, तांबे यांच्या पाठिंब्यासाठी काॅंग्रेसचे सर्व सदस्य राहुरी कृषी विद्यापीठाच्या गेस्ट हाऊसवर ठेवण्याची त्यांनी जबाबदारी सांभाळली. पण ऐनवेळी राष्ट्रवादीने मदत केली नाही. त्यामुळे तांबेंची ही पण संधी हुकली होती.
तांबे हे २०१४ मध्ये काँग्रेसच्या तिकीटावरून नगरमध्ये विधानसभा निवडणूक लढले होते. त्याचवेळी विखेही त्यांना पाठिंबा देण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना हजर होते. विखे हे २०१९ मध्ये भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांच्याविरोधात सुधीर तांबे किंवा सत्यजित तांबे हे उमेदवार असतील, अशी चर्चा होती. परंतु तांबे ही निवडणूक लढले नाहीत. त्यामुळे तेथील संघर्ष कमीच झाल्याचे बोलले होते. पण शिर्डी विधानसभा मतदारसंघात असलेल्या संगमनेर तालुक्यातील २८ गावांमध्ये ग्रामपंचायत, सेवा सोसायटीच्या निवडणुकीवरून थोरात, विखे यांच्यात संघर्ष सुरूच असतो.
परंतु, आता सत्यजित तांबे यांची भाजपशी जवळीक वाढली आहे. त्यातून भाजपने नाशिक पदवीधर मतदारसंघातून तांबेविरोधात उमेदवार दिला नाही. विखे यांचे भाऊ डॉ. राजेंद्र विखे हे ही इच्छूक होते. परंतु त्यांना उमेदवारी मिळाली की घेतली नाही, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. सत्यजित तांबे यांना आम्ही पाठिंबा देऊ, असे सांगून विखे पाटील यांनी तांबेंना विरोध नसल्याचे स्पष्टपणे दाखवून दिले. त्यामुळे सध्या तरी या दोघांमधील संबंध आता मधुर झाले आहेत.
याबाबत ज्येष्ठ पत्रकार ताराचंद म्हस्के म्हणाले, खरं तर थोरात-विखे कुटुंबात राजकीय संघर्ष राहिला आहे. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात, माजी खासदार बाळासाहेब विखे यांच्यात राजकीय वैर होते. ते पुढे दोघांची मुले राधाकृष्ण विखे व बाळासाहेब थोरात यांच्यामध्ये राहिला आहे. एका पक्षात असताना त्यांचा जोरदार संघर्ष होत होता. त्यात थोरातांचे भाचे सत्यजीत तांबे हे ही राजकारणात सक्रीय झाले. त्यामुळे वाद आणखी वाढत गेला होता. परंतु विखे व थोरात या दोघांनीही विधानसभेला मात्र एकमेंकाविरोधात कधीच तगडा उमेदवार दिला नाही. विखे विरुद्धचे उट्टे काढण्याचे थोरातांना गेल्या विधानसभेत संधी होती. त्यांचे मेहुणे सुधीर तांबे किंवा सत्यजित तांबे हे विखेंविरोधात उमेदवार असू शकले असते. पण त्यांनी संघर्ष टाळला आहे. तांबेंना भाजपचे सहकार्य मिळणे म्हणजे थोरात व विखेंचा संघर्षही आगामी काळात टळेल आणि वेगळे राजकारणही होऊ शकते.