Rana Jagjitsingh Patil : विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhansabha Election) उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस होता. सायंकाळी सर्वच लढतीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर आता बहुतेक राजकीय पक्षांकडून आणि नेत्यांकडून प्रचारफेरी आणि पदयात्रेच्या माध्यमातून मतदारांशी संवाद साधला जातोय. आता महायुतीचे उमेदवार राणा जगजितसिंह पाटील (Rana Jagjitsingh Patil) यांनीही प्रचाराला सुरुवात केली.
बापूसाहेब पठारेंचा विजयाचा महानिर्धार, प्रचाराला सुरुवात; नागरिकांचा मोठा सहभाग
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ केशेगाव, येवती येथे बैठक घेऊन राणा जगजितसिंह पाटील यांनी मतदारांशी संवाद साधला. यावेळी तुळजापूर मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी, प्रत्येकाला विकास प्रवाहात आणण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असं ते म्हणाले.
अनेक महत्वपूर्ण प्रकल्प पूर्णत्वाच्या दिशेने
यावेळी बोलतांना पाटील म्हणाले की, मागील २४ महिन्यांच्या कालावधीत सतत पाठपुरावा करून जिल्ह्याचा कायापालट करण्याची क्षमता असलेले अनेक महत्वपूर्ण प्रकल्प आणि योजना आपण पूर्णत्वाच्या दिशेने पुढे नेल्या आहेत. विकासाची दृष्टी ठेवून लोकहिताच्या कृतीने केलेल्या प्रयत्नांना महायुती सरकारने मोठे बळ दिले. जिल्ह्यातील सगळे प्रकल्प आणि योजना आता मोठ्या वेगात पूर्णत्वाकडे जात असल्याने त्याचे मोठे समाधान आहे.
12 हजार नोकर्या तयार होणार
तामलवाडी येथे 370 एकर क्षेत्रावर एमआयडीसी उभारण्यात येणार आहे. त्याला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. राज्यातील 150 पेक्षा अधिक उद्योजकांनी तामलवाडी एमआयडीसीत गुंतवणूक करण्यासाठी उत्स्फूर्तपणे तयारी दाखवली आहे. या एमआयडीसीत 12 हजार नोकर्या तयार होणार आहेत, असंही ते म्हणाले.
मताधिक्याने निवडून द्या…
पुढं ते म्हणाले की, आपल्या जिल्ह्यातील युवकांना जिल्ह्यातच हक्काचा रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी हाती घेतलेले प्रकल्प लवकरच पूर्ण होणार आहेत आणि उर्वरित प्रकल्पांना पूर्ण करण्यासाठी आपल्या सर्वांचे सहकार्य आणि सोबतीची आवश्यकता आहे. त्यामुळेच महायुतीच्या ‘कमळ’ या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मताधिक्क्याने निवडून द्यावे, अशी विनंती देखील राणा जगजितसिंह पाटील यांनी केली.