Aali Mothi Shahani Phulpakharu Song: स्वच्छंदी जगणं, मनमुराद आनंद आणि आपल्या मनाप्रमाणे आयुष्य जगण्याची इच्छा… याच भावनांना सुरेल आणि देखणं रूप देणारं ‘फुलपाखरू’ हे गाणं ‘आली मोठी शहाणी’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्यात हृता दुर्गुळे (Hruta Durgule) फुलपाखरासारखी बंधनमुक्त, उत्साही आणि आयुष्याचा प्रत्येक क्षण मनसोक्त अनुभवताना दिसते. गोव्याच्या निसर्गरम्य वातावरणात चित्रित झालेल्या या गाण्याचा ताजातवाना अंदाज मनाला सुखावणारा आहे. फुलपाखरू’ या गाण्याचे सुंदर बोल गुरू ठाकूर यांनी लिहिले असून या गाण्याला पंकज पडघण यांचे संगीत लाभले आहे. तर अपूर्वा निषाद यांनी हे गाणं आपल्या मनमोहक आवाजात गायलं असून उमेश जाधव यांचे नृत्यदिग्दर्शन लाभले आहे.
गौतमी पाटीलच्या ठसकेबाज अदांनी रंगणार ‘देवघर ऑन रेंट’चं ‘अगं आई गं’
गोव्याच्या सुंदर गल्ल्या, आजूबाजूचा हिरवागार निसर्ग, अथांग समुद्र आणि मोकळं आकाश या सगळ्याची सुंदर सांगड ‘फुलपाखरू’मध्ये घालण्यात आली आहे. कधी बाईकवरून गोव्याच्या रस्त्यांवर बिनधास्त भटकताना, तर कधी समुद्राच्या सान्निध्यात निवांत क्षण अनुभवताना हृता दिसते. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि जगण्याकडे पाहाण्याचा मोकळा दृष्टिकोन गाण्याला एक वेगळीच ऊर्जा देतो. जणू काही स्वप्नात पाहिलेलं आयुष्य ती प्रत्यक्षात जगत आहे, असाच अनुभव हे गाणं देतं.
‘फुलपाखरू’ हे केवळ ऐकायला गोड वाटणारं गाणं नसून पाहातानाही तितकंच सुंदर वाटतं. गोव्याच्या निसर्गाची मोहक दृश्यं, समुद्राची सोबत, बाइक राईड आणि हृता दुर्गुळेचा स्वच्छंदी अंदाज यामुळे गाण्याची प्रत्येक फ्रेम लक्षवेधी ठरते. त्यामुळे हे गाणं एकदा ऐकण्यासोबतच पुन्हा पुन्हा पाहावंसं वाटतं.
द फिक्समधील पहिल्या हॉलिवूड मुख्य भूमिकेसाठी एलनाझ नोरौझीचे अमेरिकन समीक्षकांकडून कौतुक !
संगीत दिग्दर्शक पंकज पडघण म्हणतात,, ” ‘फुलपाखरू’ या गाण्यात एक वेगळाच मोकळेपणा आहे. गाण्याच्या शब्दांमधून आणि चालीतूनही आयुष्याकडे मनमुरादपणे पाहाण्याची भावना उमटावी, असा आमचा प्रयत्न होता. गोव्याचा निसर्ग आणि हृताचा स्वच्छंदी अंदाज यामुळे गाण्याला एक सुंदर ऊर्जा मिळाली आहे. हे गाणं ऐकताना आणि पाहाताना प्रेक्षकांनाही त्या मुक्त वातावरणाचा अनुभव यावा, हीच इच्छा होती.”
लेखक-दिग्दर्शक आनंद दिलीप गोखले म्हणतात, ” ‘फुलपाखरू’ हे गाणं चित्रपटातील व्यक्तिरेखेचा एक सुंदर पैलू समोर आणतं. आपल्या आजूबाजूचं जग अनुभवताना, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधताना आणि स्वतःच्या मर्जीने जगताना हृता या गाण्यात दिसते. गोव्याच्या निसर्गाच्या पार्श्वभूमीवर हे सगळं पडद्यावर आणताना खूप मजा आली. गाणं प्रेक्षकांना नक्कीच प्रसन्न अनुभव देईल.”
‘हनुमान अंश’चा जागतिक दबदबा कायम; 12 दिवसांत ओव्हरसीजमध्ये $3.5 मिलियन+ची विक्रमी कमाई
निर्मात्या ईशा मुठे आणि श्रुती साठे म्हणतात, ” ‘फुलपाखरू’मध्ये एक सकारात्मक आणि मोकळी वाईब आहे. गाणं पाहाताना गोव्याच्या वातावरणात आपणही त्या प्रवासाचा भाग झाल्यासारखं वाटावं, असं त्याचं सादरीकरण आहे. गोव्याच्या निसर्गरम्य लोकेशन्सपासून हृताच्या बाईक राईडपर्यंत प्रत्येक गोष्टीत एक स्वच्छंदीपणा जाणवतो. गाणं पाहाताना चेहऱ्यावर हसू यावं आणि ऐकताना मन प्रसन्न व्हावं, असा त्याचा मूड आहे. प्रेक्षकांनीही हे गाणं मनापासून अनुभवावं, हीच अपेक्षा आहे.”
आनंद दिलीप गोखले लिखित-दिग्दर्शित ‘आली मोठी शहाणी’ या चित्रपटाची निर्मिती फाईन ब्रू प्रोडक्शन्स आणि ट्रू होप फिल्म्स वर्क यांच्या वतीने करण्यात आली आहे. जयकुमार मुनोत, ईशा मुठे आणि श्रुती साठे यांनी निर्मितीची धुरा सांभाळली आहे. हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट 2 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
