लव रंजन आणि अंकुर गर्ग यांची निर्मिती आणि अनुज सैनी यांचं दिग्दर्शन असलेला ‘पहला प्यार दूसरी बार’ हा रोमँटिक कॉमेडी चित्रपट २३ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला आहे. स्पर्श वालिया, अलीशा चोप्रा, साक्षी वैद्य, कुणाल वैद, सरगुन कौर लुथरा आणि तुषार छिब्बर अशा ६ नव्या कलाकारांनी या चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत. पहिलं प्रेम, शाळेच्या दिवसांच्या आठवणी, हलकेफुलके विनोद आणि भावनिक प्रसंगांची सांगड घालणाऱ्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, आता बॉलिवूडमधील नामवंत कलाकारांनीही नव्या चेहऱ्यांचं कौतुक केलं आहे.
अजय देवगणने सोशल मीडियावर चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया देताना नव्या कलाकारांना शुभेच्छा दिल्या आहेत. या चित्रपटाविषयी चांगलं ऐकायला मिळत असल्याचं सांगत त्याने सर्व नव्या कलाकारांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. अजयच्या या संदेशामुळे चित्रपटातील कलाकारांना प्रोत्साहन मिळालं आहे. नव्या प्रतिभेला मोठ्या कलाकारांकडून मिळणारी दाद या चित्रपटाच्या निमित्ताने पाहायला मिळत आहे.
रकुल प्रीत सिंहनेही चित्रपटातील लेखन, कथानक आणि कलाकारांच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे. ‘पहला प्यार दूसरी बार’ पाहताना शाळेच्या दिवसांच्या आठवणी जाग्या होतात आणि पहिल्या दृश्यापासूनच चित्रपट प्रेक्षकांना गुंतवून ठेवतो, असं तिने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये म्हटलं. नव्या कलाकारांनी सहजपणे आपल्या भूमिका साकारत कथा जिवंत केली असून, त्यांचा अभिनय ताजातवाना अनुभव देतो, अशी प्रतिक्रिया रकुलने दिली. या चित्रपटाला आणि नव्या कलाकारांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम व पाठिंबा द्यावा, असं आवाहनही तिने केलं आहे.
अर्जुन कपूरनेही चित्रपटातील विनोद, धमाल-मस्ती आणि भावनिक कथानकाचं कौतुक केलं. सुरुवातीपासून हसवणारा हा चित्रपट शेवटाकडे जाताना भावनिक प्रवास घडवतो, असं त्याने म्हटलं असून, या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर आलेल्या नव्या कलाकारांचं आणि त्यांच्या ऊर्जेचं अभिनंदन केलं आहे. अजय देवगण, रकुल प्रीत सिंह आणि अर्जुन कपूर यांच्या प्रतिक्रियांमुळे चित्रपटातील कलाकारांना विशेष दाद मिळाली आहे. नव्या कलाकारांना संधी देतानाच पहिल्या प्रेमाच्या आणि तारुण्यातील आठवणींना उजाळा देणारा हा चित्रपट सध्या चर्चेत आला आहे.
