45 हजार सभासद होणार अ वर्ग; मराठी चित्रपट महामंडळाच्या पहिल्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय

Akhil bharatiya Chitrapat Mahamadal -सन 2015 पासून सदस्य असलेल्या आणि किमान तीन वर्षे सक्रिय काम केलेल्या ‘ब’ वर्ग सभासद आता ‘अ’ वर्ग सभासद.

Akhil Bharatiya Chitrapat Mahamadal

Akhil Bharatiya Chitrapat Mahamadal

Akhil bharatiya Chitrapat Mahamadal : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या कार्यकारिणीची पहिली बैठक पुण्यात पार पडली. या बैठकीमध्ये अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले गेल्याचे माहिती महामंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी दिली आहे.

यावेळी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष मेघराज राजेभोसले, उपाध्यक्ष धनाजी यमकर, प्रमुख कार्यवाह सुशांत शेलार, खजिनदार सुनील महाजन, सहकार्यवाह दीपक कदम, सहकार्यवाह प्रवीण पाटील ऊर्फ वासू पाटील, सहखजिनदार शरद चव्हाण, विजय खोचीकर, चैत्राली डोंगरे, रवींद्र गावडे, सुभाष नकाशे, राज काझी, वर्षा उसगावकर, अजित शिरोळे, गणेश गारगोटे, विकास तोरणे आदी संचालक व मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना राजेभोसले यांनी सांगितले की, सन 2015 पासून सदस्य असलेल्या आणि किमान तीन वर्षे सक्रिय काम केलेल्या ‘ब’ वर्ग सभासदांना ‘अ’ वर्ग सभासद म्हणून मान्यता देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. याचा लाभ सुमारे 45 हजार सभासदांना होणार आहे.

मराठी चित्रपट क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी ‘पहिले मराठी चित्रपट संमेलन’ फेब्रुवारी 2027 मध्ये आयोजित करण्यात येणार आहे. त्यासाठी पुणे आणि रत्नागिरी या ठिकाणांचा विचार सुरू आहे. चित्रपट क्षेत्रातील सुमारे 60 हजार कलाकार व तंत्रज्ञांचा पुढील तीन महिन्यांत आरोग्य विमा उतरविण्याचा संकल्प महामंडळाने केला आहे. तसेच सर्व सदस्यांचे डिजिटलायझेशन करून त्यांना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी दिली.

सोबतच मुंबई व पुणे येथे महामंडळाचे स्वतःचे गेस्ट हाऊस उभारण्याचा निर्णय देखील या बैठकीत घेण्यात आला आहेत. कंटेनर थिएटरची संकल्पनाही राबविण्यात येणार असल्याची दिली. राज्यभर नवीन शाखा व संपर्क कार्यालये देखील सुरू करण्यात येणार आहेत. चित्रपट क्षेत्रातील कामगारांच्या हितासाठी 2025 च्या वेतन कराराच्या धर्तीवर 20 टक्के वेतनवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच मालिकेच्या कलाकारांना सद्यस्थितीत किमान 90 दिवसानंतर मानधन मिळते. ते दर महिन्याला मानधन मिळावे यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

वृद्ध कलाकारांच्या सन्मानासाठी विशेष मानधन योजना राबविण्यात येणार आहे. ज्येष्ठ कलाकारांसाठी वृद्धाश्रम उभारण्याचा आराखडा तयार करण्यात येणार असून हा प्रकल्प सीएसआर निधीच्या माध्यमातून उभारण्याचा मानस असल्याची माहिती त्यांनी दिली.

महामंडळाच्या 17 संचालकांमार्फत राज्यातील 36 जिल्ह्यांचे पालकत्व स्वीकारले जाणार असून प्रत्येक जिल्ह्यातील कलाकार व तंत्रज्ञांच्या समस्या सोडविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.

पुण्यात स्वतंत्र चित्रनगरी उभारण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचेही अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी स्पष्ट केले. तसेच भविष्यात महामंडळाचे सभासदत्व पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून संपूर्ण प्रणालीचे डिजिटायझेशन होणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. मुख्य कायदेशीर सल्लागार म्हणून पूर्वीप्रमाणेच ॲड. प्रशांत पाटील काम पाहणार असून पुण्यासाठी ॲड. मंदार जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या सर्व निर्णयांमुळे मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार, तंत्रज्ञ, कामगार आणि सभासदांच्या कल्याणाला मोठी चालना मिळणार असल्याचा विश्वास महामंडळाने व्यक्त केला आहे.

Exit mobile version