Asambhav : टीझरपासूनच चर्चेत असलेला ‘असंभव’ आता आपल्या नव्या रहस्यमय पोस्टरमुळे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. मराठी चित्रपटसृष्टीत कधीही न पाहिलेला असा भव्य आणि सस्पेन्सने भरलेला थ्रिलर प्रेक्षकांच्या मनात सध्या असंख्य प्रश्न निर्माण करत आहे. गडद लाल आणि काळ्या छटांमध्ये तयार झालेलं पोस्टर पाहाताक्षणीच मनात प्रश्न निर्माण होतो, ही कथा प्रेमाची आहे का सुडाची? सचित पाटील, मुक्ता बर्वे आणि प्रिया बापट यांच्या चेहऱ्यांवर दिसणारी शांतता, त्यांच्या नजरेतील अस्वस्थता आणि ओठांवरील स्मितहास्य हे सगळं एक गूढ गोष्ट सांगतंय. तीन चेहरे, त्यामागचं सत्यं… परंतु नेमकं काय ? या पोस्टरमध्ये प्रेमाचं रहस्यमयी रूप आणि संशयाची तीक्ष्ण धार दोन्ही एकत्र दिसत असून ही अद्भुत कहाणी प्रेक्षकांना एक विलक्षण अनुभव देणार आहे.
दिग्दर्शक, निर्माते सचित पाटील म्हणाले, ” ‘असंभव’ हा चित्रपट सस्पेन्स थ्रिलर असून मानवी भावनांच्या सर्वात खोल थरांना स्पर्श करणारा आहे. या चित्रपटात प्रेम, रहस्य, भीती आणि संघर्ष यांच्या सीमारेषा एकत्र आणल्या आहेत. नैनितालच्या मोहक आणि रहस्यमय वातावरणात चित्रीत झालेला ‘असंभव’ हा पहिला मराठी चित्रपट असून, त्याचं प्रत्येक दृश्य तांत्रिकदृष्ट्या अप्रतिम आणि सिनेमॅटिक अनुभव देणारं आहे.”
निर्माते नितीन प्रकाश वैद्य म्हणाले, ‘’ ‘असंभव’च्या निमित्ताने चित्रपटसृष्टीतील अनेक गुणी कलाकार आणि नामवंत तंत्रज्ञ एकत्र आले आहेत. सर्वांनी मनापासून केलेल्या मेहनतीमुळे हा चित्रपट एका वेगळ्या उंचीवर पोहोचला आहे. या चित्रपटाबद्दल मला अत्यंत उत्सुकता आणि अपेक्षा आहेत. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांतून साकार झालेली ही कलाकृती प्रेक्षकांच्या मनाला नक्कीच भिडेल.”
एरिकॉन टेलिफिल्म्सच्या शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई आणि पी अँड पी एंटरटेनमेंटचे मंगेश परुळेकर म्हणाले, ”पोस्टरमध्ये दिसणारी गूढता ही फक्त एक झलक आहे. ‘असंभव’ प्रेक्षकांना त्यांच्या भावनांशी भिडवणारा प्रवास असून सस्पेन्स आणि थ्रिलरचा थरार या दोन्हींचं परिपूर्ण मिश्रण यात आहे.”
मोठी बातमी, नवीन नावाने ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार ‘मनाचे श्लोक’ चित्रपट
पुष्कर श्रोत्री सहदिग्दर्शक असून सचित पाटील, मुक्ता बर्वे, प्रिया बापट आणि संदीप कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाची निर्मिती मुंबई पुणे फिल्म्स एंटरटेनमेंटच्या सचित पाटील, नितीन प्रकाश वैद्य यांनी केली आहे. तसेच एरिकॉन टेलिफिल्म्सच्या शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई, पी अँड पी एंटरटेनमेंटचे मंगेश परुळेकर आणि संजय पोतदार यांच्या सहनिर्मितीत तयार झाला आहे.