Download App

दहाव्या अजिंठा वेरूळ आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या मानद अध्यक्षपदी आशुतोष गोवारीकर; महोत्सव संचालकपदी सुकथनकर

नाथ ग्रुप, महात्मा गांधी मिशन व यशवंतराव चव्हाण सेंटर जिल्हा केंद्र छत्रपती संभाजीनगर प्रस्तुत व मराठवाडा आर्ट कल्चर व फिल्म फाउंडेशनच्या वतीने हा महोत्सव होतो.

  • Written By: Last Updated:

Ashutosh Gowariker has been appointed as the Honorary President of the 10th Ajanta Ellora International Film Festival:
मुंबई : ऑस्कर नामांकित लगान, स्वदेस, जोधा अकबर, पानिपत यांसारख्या अनेक महत्वपूर्ण चित्रपटांचे दिग्दर्शक व निर्माते आशुतोष गोवारीकर (Ashutosh Gowariker) यांची दहाव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या ( 10th Ajanta Ellora International Film Festival) मानद अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे.

नाथ ग्रुप, महात्मा गांधी मिशन व यशवंतराव चव्हाण सेंटर जिल्हा केंद्र छत्रपती संभाजीनगर प्रस्तुत व मराठवाडा आर्ट कल्चर व फिल्म फाउंडेशनच्या वतीने सदरील महोत्सव केंद्र सरकारचे सूचना व प्रसारण मंत्रालय, एनएफडीसी व महाराष्ट्र शासनाच्या विशेष सहकार्याने संपन्न होतो. यावर्षी महोत्सवाचे दहावे वर्ष आहे. छत्रपती संभाजीनगर येथे 15 ते 19 जानेवारी 2025 दरम्यान महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. याअनुषंगाने मानद अध्यक्षपदी आशुतोष गोवारीकर व महोत्सव संचालकपदी (फेस्टिवल डायरेक्टर) प्रसिध्द चित्रपट दिग्दर्शक सुनिल सुकथनकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.महोत्सवाच्या नव्या संयोजन समितीची घोषणा महोत्सवाचे संस्थापक अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल व प्रमुख मार्गदर्शक अंकुशराव कदम यांनी या पत्रकाद्वारे करीत असल्याचे जाहीर केले आहे.

महोत्सवाच्या संयोजन समितीच्या मानद अध्यक्षपदी भारतीय सिनेमा ऑस्करपर्यंत पोहचविणारे प्रसिध्द चित्रपट दिग्दर्शक व निर्माते आशुतोष गोवारीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीयुत गोवारीकर यांनी आपल्या अभिनय, दिग्दर्शन व निर्मिती प्रक्रियेद्वारे भारतीय सिनेजगतात मागील तीन दशकांहून अधिक काळापासून उल्लेखनीय योगदान दिले आहे. जगभरातील सर्वच महत्वाच्या चित्रपट महोत्सवांमध्ये त्यांचा विशेष सहभाग राहिलेला आहे. तसेच अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्टस् अ‍ॅण्ड सायन्स यांच्या वतीने दिल्या जाणाऱ्या ऑस्कर पुरस्कारांकरीता मतदान सदस्य म्हणून देखील ते कार्यरत आहेत. गोवारीकरांच्या विशेष मार्गदर्शनाखाली महोत्सवाच्या दशकपूर्तीची व्यापक वाटचाल आगामी काळात अतिशय महत्वपूर्ण ठरणार आहे.

“अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या मानद अध्यक्षपदाची जबाबदारी मी माझ्यासाठी एक बहुमान समजतो. ज्येष्ठ दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, फेस्टिवल डायरेक्टर सुनील सुकथनकर, जयप्रद देसाई, ज्ञानेश झोटिंग या सर्व सृजनशील दिग्दर्शकांच्या जोडीने एक अत्यंत चांगली कलात्मक प्रक्रिया यानिमित्ताने घडवता येईल याचा मला विशेष आनंद आहे. एक अतिशय उल्लेखनीय बाब म्हणजे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक लौकिक असलेल्या छत्रपती संभाजीनगर येथे या महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. अतिशय सकस उर्जेने भारलेला हा संपूर्ण प्रदेश आहे. अशा ठिकाणी दर्जेदार जागतिक चित्रपट रसिकांसमोर आणल्याने नव्या प्रतिभेला जन्म देण्यास मदत होईल व त्यांच्या सृजनाला जगासमोर आणता येईल. यानिमित्ताने अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या माध्यमातून मला योगदान देता येईल याचा मला विशेष आनंद आहे”, असे आयोजन समितीचे मानद अध्यक्ष आशुतोष गोवारीकर यांनी आपल्या नियुक्तीनंतर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे.

दहाव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या संचालकपदी (फेस्टिव्हल डायरेक्टर) राष्ट्रीय पुरस्कार विजेते प्रसिध्द चित्रपट दिग्दर्शक सुनील सुकथनकर यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. माजी संचालक श्री. अशोक राणे यांचा कार्यकाळ नुकताच पूर्ण झाल्याने सुनील सुकथनकर यांची निवड करण्यात आलेली आहे. श्रीयुत सुकथनकर यांनी मागील तीन दशकांपासून मराठी सिनेसृष्टीत अतिशय उल्लेखनीय योगदान त्यांच्या सिनेमांच्या माध्यमातून दिलेले असून दिवंगत दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांच्यासोबत त्यांनी दिग्दर्शित केलेल्या अनेक सिनेमांना राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहे. देशभरातील अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये सुकथनकर यांनी ज्युरी अध्यक्ष व ज्युरी सदस्य या नात्याने काम केलेले आहे.

आयोजन समितीच्या या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे विशेष अभिनंदन प्रसिध्द नाट्य चित्रपट दिग्दर्शक व महोत्सवाचे कार्यकारी संचालक चंद्रकांत कुलकर्णी, नीलेश राऊत, जयप्रद देसाई, ज्ञानेश झोटींग, शिव कदम, दीपिका सुशीलन यांच्यासह सर्व संयोजन समितीने केले आहे.

follow us