Ashwatthama from the novel comes to the stage : महाभारतातील ‘अश्वत्थामा’ या व्यक्तिरेखेविषयी आजही अनेकांना आकर्षण आहे. त्याचे चिरंजीवित्व हा कायम औत्सुक्याचा विषय राहिला आहे. कादंबरीकार, नाटककार, दिग्दर्शक व अभिनेते अशोक समेळ यांनी ‘अश्वत्थामा’ हा विषय घेऊन ‘मी अश्वत्थामा चिरंजीव’ ही महाकादंबरी लिहिली आणि गेल्या 11 वर्षांत तिच्या 9 आवृत्त्या निघाल्या आहेत. याच गाजलेल्या कादंबरीवर आता अशोक समेळ यांनी ‘मी अश्वत्थामा चिरंजीव’ हे नाटक लिहिले असून, ते आता रंगभूमीवर आले आहे. कादंबरीतून हा अश्वत्थामा आता रंगमंचावर अवतरला आहे.
अश्वत्थामा कोण होता, त्याचा तो नीलमणी कसा होता, तो आजही तेल मागत फिरत असतो; असे अनेक प्रश्न त्याच्याभोवती फिरत असतात. त्याच्याशी संबंधित अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आता रंगभूमीवर मिळत आहेत. विशेष म्हणजे, वयाच्या 84 व्या वर्षी स्वतः अशोक समेळ या नाटकात अश्वत्थाम्याची भूमिका रंगवत आहेत. त्यांच्यासह धनश्री दामले या नाटकात विविध भूमिका साकारत आहेत.
171 धार्मिक लिंक्स, प्रार्थना आणि पोशाख बदलण्याचा दबाव; नाशिक धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासे
या नाटकाविषयी अशोक समेळ म्हणतात, “या विषयावर मी गेली 25 वर्षे सखोल अभ्यास आणि संशोधन केले आहे. माझी ही महाकादंबरी 2015 या वर्षी आली, तिच्या 9 आवृत्त्या निघाल्या आणि आता मी त्यावर नाटक लिहिले आहे. माझ्या अनेक बंधूभगिनींना आणि चाहत्यांना काही कारणास्तव ही महाकादंबरी वाचणे शक्य होत नाही. त्यांना हा अश्वत्थामा रंगमंचावर पाहता यावा, ही या नाटकाच्या मागची इच्छा आहे. तसेच माझ्या अनेक मित्र-मैत्रिणींचाही हे नाटक करण्याबाबत आग्रह होता आणि म्हणून मी हे नाटक करत आहे”.
