२००९ मध्ये ‘अवतार’ पहिल्यांदा आला तेव्हा या चित्रपटाने प्रचंड धुमाकूळ घातला होता. आता तेरा वर्षांनंतर पुन्हा एकदा दिग्दर्शक जेम्स कॅमेरून यांच्या ‘अवतार’चा सिक्वेल सिनेमागृहात अवतरलाय. ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ चित्रपटात पाणी आणि पाण्याखालील अनोखं विश्व आपल्यासमोर मांडलंय. अद्भूत व्हिएफएक्स, रिअल साऊंड इफेक्टस आणि नेत्रदीपक दृश्ये पाहण्याचा हा एक विलक्षण अनुभव आहे. ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ बघण्याचा विचार करत असाल तर त्यापूर्वी हा रिव्हू वाचा..
कथानक
या भागातील कथानक १० वर्षे पुढे सरकलंय. पँडोरामध्ये नावी समुदायातील जॅक सली आणि त्याची प्रेमिका नेतिरी चार मुलांसोबत आनंदानं राहत असतात. पँडोरातील लोकांना स्काय पीपल म्हणजे पृथ्वीवरील लोक कर्नल क्वारिचला सलीचा सूड घेण्याच्या मोहिमेवर पाठवतात. अशा परिस्थितीत आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी सली आणि त्याचं कुटुंब आपलं जंगल सोडून मेटकायना बेटाकडे निघून जातात. तिथे टोनोवारी आणि त्याची पत्नी रोनाल त्यांना आश्रय देतात. येथूनच त्यांचा जलप्रवास सुरू होतो. पँडोरा बेट सोडावं लागलेला सली आणि त्याची प्रेमिका नेतिरी कुटुंबाला वाचवण्यासाठी पुढं काय काय करतात हे सिनेमात पहायला मिळतं.
लेखन-दिग्दर्शन
पहिल्या ‘अवतार’च्या वेळी तंत्राचं नाविन्य होतं, त्यामुळे तो अधिक रोमांचक वाटला होता. आता त्यातल्या नाविन्याचा भाग कमी झालाय. तरीही दिग्दर्शक कॅमेरून यांनी पँडोरा आणि मेटकायनाचं एक अफलातून जग आपल्यासमोर उभं केलंय. चित्रपटाच्या कथेत ‘अतिशय धक्कादायक’ असे काही नाही. पण एका नवीन पद्धतीने रचना केल्याने वेगवेगळे पैलू उलगडत जातात. काही संवाद जीवनाचं तत्त्वज्ञान शिकवणारे आहेत. तसंच माणसाचं आणि प्राण्यांचं भावनिक नातं अधिक घट्ट करण्यात आलंय.
तंत्रज्ञान
मध्यंतरापूर्वीचा भाग थोडा लांबलाय. एडिंटींगमध्ये थोडी कात्री लावून लांबी कमी करता आली असती. मध्यंतरानंतर खऱ्या अर्थानं चित्रपट खिळवून ठेवतो. तांत्रिकदृष्ट्याही हा चित्रपट अफलातून झालाय. एक अविश्वसनीय दुनिया विश्वसनीय वाटावी अशा पद्धतीनं दृश्यं उभा केलेत. धडाकेबाज साऊंड इफेक्ट थिएटर हादरवून टाकतो. सर्वच कलाकारांनी आपापल्या कॅरेक्टरला अचूक न्याय दिलाय. सिनेमात मानव आणि निसर्ग यांच्यातील संघर्ष दिसून येतो. युद्धाचे परिणाम, वातावरण बदलानं होणारं भविष्यातील स्थलांतरित यावर थेट भाष्य केलंय. सिनेमाची लांबी अनावश्यक वाटू शकते तरी पण अविश्वसनीय जगाचा अनुभव घ्यायला काहीच हरकत नाही.
चित्रपटाला लेट्सअप मराठीकडून 4 स्टार….