‘Avengers: Doomsday’ generates massive buzz in India even before its release : हॉलिवूडमधील बहुप्रतीक्षित मार्व्हल्स अॅव्हेंजर्स : डूम्सडे या चित्रपटाची भारतात रिलीज होण्यापूर्वीच जोरदार चर्चा सुरू झाली आहे. चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून, मागणी वाढल्याने अनेक चित्रपटगृहांनी मध्यरात्री, पहाटे आणि अगदी रात्री उशिराचे शो सुरू केले आहेत. मात्र, या सगळ्यात सर्वाधिक चर्चा रंगली आहे ती नवी मुंबईतील एका शोच्या तब्बल 4 हजार रुपयांच्या तिकिटाची!
नवी मुंबईतील नेक्सस सीवूड्स मॉलमधील सिनेपोलिस चित्रपटगृहात पहिल्या शोसाठी 4 हजार रुपयांपर्यंत तिकीट दर ठेवण्यात आला आहे. हा शो 17 डिसेंबरच्या मध्यरात्रीनंतर काही वेळातच सुरू होणार असून, तो 4DX 3D स्वरूपात दाखवला जाणार आहे. यावर बुकिंग शुल्काची भर पडल्यास ग्राहकांना प्रत्यक्षात सुमारे 4 हजार 70 रुपये मोजावे लागू शकतात.
मुंबईतील चित्रपटांच्या तिकिटांमध्ये हा दर आतापर्यंतचा सर्वाधिक असल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वी द ओडिसीसाठी 3 हजार 400 रुपये, ओपनहायमरसाठी 2 हजार 450 रुपये, तर धुरंधर 2 साठी 3 हजार 200 रुपयांपर्यंत तिकीट दर होते. ‘रामायण’ चित्रपटाच्या प्रीमियम IMAX शोसाठीही 2 हजार 770 रुपये तिकीट आकारण्यात आले होते.
राजस्थान पंचायत निवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय; भाजपला मोठा धक्का, जयपूरमध्येही काँग्रेसची बाजी!
मात्र, 4 हजार रुपयांचा हा दर चित्रपटाच्या सर्व शोसाठी नसून, विशिष्ट प्रीमियम 4DX 3D शोसाठी आहे. चित्रपटगृह, आसनव्यवस्था आणि स्क्रीनिंगच्या स्वरूपानुसार तिकिटांचे दर वेगवेगळे आहेत. त्यामुळे सामान्य सीट्स आणि प्रीमियम रिक्लायनर सीट्ससाठी कमी-जास्त दर आकारले जात आहेत. अॅव्हेंजर्स : डूम्सडेच्या अॅडव्हान्स बुकिंगला मिळणारा प्रतिसादही लक्षवेधी ठरत आहे. बुकिंग सुरू झाल्यानंतर अवघ्या 19 तासांत PVR INOX आणि Cinepolis या दोन प्रमुख चित्रपटगृह साखळ्यांमध्ये मिळून सुमारे एक लाख तिकिटांची विक्री झाली. या विक्रीतून पहिल्या दिवसाच्या अॅडव्हान्स बुकिंगचे कलेक्शन 10 कोटी रुपयांच्या पुढे गेल्याचे वृत्त आहे.
Sacnilk च्या माहितीनुसार, देशातील काही चित्रपटगृहांमध्ये बुकिंग सुरू होणे बाकी असतानाच या चित्रपटाची 70 हजारांहून अधिक तिकिटे विकली गेली होती. BookMyShow वरही पहिल्या 24 तासांत एक लाखांहून अधिक तिकिटांची विक्री झाल्याचे सांगितले जात आहे. काही वेळा या प्लॅटफॉर्मवर तासाला 10 हजारांहून अधिक तिकिटांची विक्री नोंदवण्यात आली.
विशेष म्हणजे, चित्रपटाच्या प्रदर्शनाला जवळपास 30 दिवस बाकी असतानाच मध्यरात्री 12, पहाटे 3 आणि सकाळी 6 वाजताचे शो जाहीर करण्यात आले आहेत. मार्व्हलच्या याआधीच्या अनेक चित्रपटांच्या तुलनेत यावेळी अॅडव्हान्स बुकिंग खूप आधी सुरू झाले आहे. पहिल्या दिवसाच्या अॅडव्हान्स बुकिंगमध्ये अॅव्हेंजर्स : डूम्सडेने मार्व्हलच्या काही मोठ्या चित्रपटांच्या पहिल्या 24 तासांतील कमाईलाही मागे टाकल्याचे Sacnilk च्या आकडेवारीतून समोर आले आहे.
राज्यात रब्बीची पेरणी इतिहासातील सर्वात नीचांकी पातळीवर; 1972 च्या दुष्काळापेक्षाही यंदाची स्थिती गंभीर!
2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या अॅव्हेंजर्स : एंडगेमने पहिल्या 24 तासांत सुमारे 8.27 कोटी रुपयांचे अॅडव्हान्स बुकिंग केले होते. तर 2021 मधील स्पायडर-मॅन : नो वे होमने 6.56 कोटी रुपये आणि 2018 मधील अॅव्हेंजर्स : इन्फिनिटी वॉरने 5.02 कोटी रुपयांची कमाई केली होती. अॅव्हेंजर्स : एंडगेमने BookMyShow वर अॅडव्हान्स बुकिंगच्या पहिल्या 24 तासांत 10 लाखांहून अधिक तिकिटांची विक्री केली होती. डूम्सडेने अद्याप हा आकडा गाठलेला नसला, तरी त्याची सुरुवात दमदार झाली आहे.
या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण होण्यामागचे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे अभिनेता रॉबर्ट डाउनी ज्युनियर याचे मार्व्हल विश्वात पुनरागमन. यावेळी तो सुपरव्हिलन डॉक्टर डूमच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटात ख्रिस इव्हान्स, ख्रिस हेम्सवर्थ, पेड्रो पास्कल, अँथनी मॅकी आणि फ्लॉरेन्स प्यू यांच्यासह अनेक प्रसिद्ध कलाकारांची मोठी फौज पाहायला मिळणार आहे.
अँथनी आणि जो रुसो या दिग्दर्शकांच्या जोडीने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. अॅव्हेंजर्स : डूम्सडे हा चित्रपट भारतात 17 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार असून, अमेरिकेत तो 18 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. भारतातील विक्रमी अॅडव्हान्स बुकिंग, पहाटेच्या शोना मिळणारा प्रतिसाद आणि एका तिकिटासाठी आकारली जाणारी 4 हजार रुपयांची किंमत पाहता, अॅव्हेंजर्स : डूम्सडेच्या प्रदर्शनापूर्वीच बॉक्स ऑफिसवर मोठे वातावरण निर्माण झाले आहे.
