‘Awarapan 2’ delivers a strong performance at the box office : विशेष भट्ट यांच्या ‘आवारापन 2’ने अवघ्या 15 दिवसांत जगभरात 220.49 कोटी रुपयांची दमदार कमाई केली आहे. भारतासह आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही चित्रपटाची यशस्वी घोडदौड सुरू आहे. चित्रपटाने भारतात 151.09 कोटी रुपयांचे नेट बॉक्स ऑफिस कलेक्शन (NBOC) केले असून, देशांतर्गत ग्रॉस कलेक्शन 184.25 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. दुसऱ्या आठवड्यातही चित्रपटाची कमाई कायम राहिल्याने प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद आणि चित्रपट पुन्हा पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या याचा फायदा होत असल्याचे दिसून येत आहे. सध्याच्या कामगिरीनुसार ‘आवारापन 2’ हा 2026 मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप-5 हिंदी चित्रपटांपैकी एक होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.
परदेशातही ‘आवारापन 2’ला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चित्रपटाने 3.856 मिलियन अमेरिकन डॉलर म्हणजेच सुमारे 36.24 कोटी रुपयांची कमाई केली आहे. यामध्ये मध्य पूर्वेतून सर्वाधिक 1.65 मिलियन डॉलरची कमाई झाली आहे. त्यानंतर अमेरिका आणि कॅनडामधून 8 लाख 60 हजार डॉलर, ब्रिटनमधून 7 लाख 80 हजार डॉलर, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधून 3 लाख 36 हजार डॉलर, तर उर्वरित आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून 2 लाख 30 हजार डॉलरची कमाई झाली आहे.
‘आवारापन 2’च्या थिएटरमधील यशाचे सर्वात मोठे श्रेय प्रेक्षकांना जाते. शिवम पंडित या व्यक्तिरेखेच्या पुनरागमनाची अनेक वर्षांपासून वाट पाहणाऱ्या चाहत्यांपासून ते ही व्यक्तिरेखा आणि फ्रँचायझी पहिल्यांदाच अनुभवणाऱ्या नव्या प्रेक्षकांपर्यंत सर्वांकडून चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. याचा परिणाम चित्रपटगृहांतील चांगल्या प्रेक्षकसंख्येत आणि विविध बाजारपेठांमधील चित्रपटाच्या सातत्यपूर्ण कामगिरीत दिसून येत आहे.
‘आमचे मंत्री आताही जरांगे पाटलांशी चर्चा करत आहेत’; एकनाथ शिंदेंनी परभणीत स्पष्ट केली सरकारची भूमिका
चित्रपटातील संगीत, व्यक्तिरेखा आणि भावनिक विश्व प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे. भारतासह परदेशातील प्रेक्षकांनाही चित्रपटाने भावनिकदृष्ट्या जोडले असून, ‘आवारापन’च्या पुनरागमनाला चाहत्यांनी एका उत्सवासारखा प्रतिसाद दिला आहे.
‘आवारापन 2’चे दिग्दर्शन नितीन कक्कर यांनी केले असून बिलाल सिद्दीकी आणि विशेष भट्ट यांनी चित्रपटाचे लेखन केले आहे. चित्रपटात इमरान हाश्मी, दिशा पटानी, शबाना आझमी, पुरण गब्बी, सुविंदर विक्की आणि अनिरुद्ध रावल यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
मुकेश भट्ट आणि विशेष फिल्म्स प्रस्तुत ‘आवारापन 2’ची निर्मिती विशेष भट्ट यांनी केली आहे, तर दीपेश शाह आणि सुनमन सूद हे सहनिर्माते आहेत. चित्रपट सध्या जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत असून भारतातील थिएट्रिकल वितरणाची जबाबदारी पेन मरुधरकडे आहे.
