Awarapan 2: इमरान हाश्मी स्टारर (Emraan Hashmi) ‘आवारापन 2’ ने बॉक्स ऑफिसवर धमाकेदार सुरुवात केलीय. ब्लॉकबस्टर ओपनिंग वीकेंडची नोंद केली आहे. या चित्रपटाने भारतात 84.31 कोटींची कमाई केलीय. तर जगभरात अंदाजे 120.86 कोटींची कमाई केलीय.
स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी चित्रपटाने 23.40 कोटींची कमाई केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 34.09 कोटी आणि तिसऱ्या दिवशी 26.82 कोटींची कमाई केलीय.
या दमदार कमाईसह ‘आवारापन 2’ हा 2026 मधील सर्वाधिक ओपनिंग वीकेंड कमाई करणारा तिसरा चित्रपट ठरला आहे. अलीकडे प्रदर्शित झालेल्या अनेक चित्रपटांना मागे टाकत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपली ताकद दाखवून दिली आहे. परदेशातील अंदाजे 1.9 दशलक्ष डॉलर (सुमारे 18 कोटी) कमाईमुळे चित्रपटाचा जगभरातील ग्रॉस व्यवसाय ₹120.86 कोटींवर पोहोचला आहे. त्यामुळे ‘अवारापन 2’ ग्लोबल हिट ठरला आहे. विशेष म्हणजे, गेल्या दशकातील म्हणजेच 2015 ते 2025 या कालावधीतील स्वातंत्र्यदिनाच्या वीकेंडमध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत ‘अवारापन 2’ चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. विविध बाजारपेठांमध्ये चित्रपटाला मिळालेला प्रचंड प्रतिसाद त्यातून स्पष्ट होतो.
शिवम पंडितच्या भूमिकेत इमरान हाश्मीचे दमदार कमबॅक
‘आवारापन 2’ मधील शिवम पंडितच्या भूमिकेत इमरान हाश्मीच्या पुनरागमनाचे प्रेक्षकांनी जोरदार स्वागत केले आहे. ‘आवारापन’च्या जगाशी आणि कथानकाशी प्रेक्षक पुन्हा जोडले गेलेत. या चित्रपटाला मिळालेला प्रतिसाद फ्रँचायझीची लोकप्रियता अधोरेखित करणारा आहे. विशेष फिल्म्सच्या निर्मितीखाली तयार झालेल्या या चित्रपटाने लोकप्रिय ‘आवारापन’ फ्रँचायझीचा वारसा पुढे नेण्यात यश मिळवले आहे. ‘आवारापन 2’च्या स्टारकास्टमध्ये इमरान हाश्मी, दिशा पटानी, शबाना आझमी, पूरन गब्बी, सुविंदर विक्की आणि अनिरुद्ध रावल यांचा समावेश आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन नितीन कक्कर यांनी केले आहे. पटकथा बिलाल सिद्दीकी आणि विशाल भट्ट यांनी लिहिली आहे. मुकेश भट्ट आणि विशेष फिल्म्स यांच्या प्रस्तुतीखाली आणि विशेष भट्ट यांच्या निर्मितीत हा चित्रपट तयार झाला आहे. दीपेश शाह आणि सुनामन सूद हे सहनिर्माते आहेत. ‘अवारापन 2’ सध्या जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित आहेत. भारतातील थिएट्रिकल वितरणाची जबाबदारी पेन मरुधर यांच्याकडे आहे.
