मराठी चित्रपटसृष्टीसाठी हे वर्ष खरोखरच खास ठरत आहे. आगामी मराठी चित्रपट ‘बाप्या’ याची पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (पिफ्फ) २०२६ च्या ‘मराठी सिनेमा कॉम्पिटिशन’ या विभागात अधिकृत निवड झाली आहे. पिफ्फ २०२६ मधील ही निवड ‘बाप्या’साठी महत्त्वाचा टप्पा असून, आशयघन आणि संवेदनशील विषय हाताळणाऱ्या मराठी चित्रपटांना मिळणाऱ्या आंतरराष्ट्रीय ओळखीच्या दृष्टीने हे यश महत्त्वाचे मानले जात आहे.
जिथे धुरंधर 1 थांबला, तिथून धुरंधर 2 बोलेल; रणवीर सिंगचे दमदार संवाद
समीर तिवारी दिग्दर्शित ‘बाप्या’ची कथा दापोली येथील एका लहान मासेमार कुटुंबाभोवती फिरणारी आहे. कुटुंबातील नातेसंबंध, समाजातील दृष्टीकोन आणि वैयक्तिक संघर्ष यांचा हळुवार वेध घेणारी ही गोष्ट आहे. भावनिक संवेदनशीलता, विनोद आणि सामाजिक भाष्य यांचा समतोल साधत हा चित्रपट प्रेक्षकांना एका वेगळ्या भावविश्वात घेऊन जातो.
या चित्रपटाची निर्मिती मुक्तल तेलंग आणि समीर तेवारी यांनी केली असून गिरीश कुलकर्णी, राजश्री देशपांडे, देविका दफ्तरदार, श्रीकांत यादव आणि आर्यन मेंगजी यांच्या ‘बाप्या’ मध्ये प्रमुख भूमिका आहेत. दिग्दर्शक समीर तिवारी म्हणतात, “ ‘बाप्या’ ही माणुसकी, स्वीकार आणि नात्यांची गोष्ट आहे. ‘पिफ्फ’ सारख्या प्रतिष्ठित व्यासपीठावर आमच्या चित्रपटाची निवड होणे, हे संपूर्ण टीमसाठी मोठे प्रोत्साहन आहे. मराठी चित्रपटाच्या संवेदनशील कथा आता जागतिक स्तरावर पोहोचत आहेत, याचा आम्हाला अभिमान आहे.”
