‘कॅन वी अटेंड युअर वेडिंग?’ म्हणत भूषण प्रधान- सायली पाटील पोहोचले चाहत्यांच्या लग्नात!

Swapnasundari : काही दिवसांपूर्वी चित्रपटाच्या टीमने सोशल मीडियावर ‘कॅन व्ही अटेंड युअर वेडिंग?’ हे भन्नाट कॅम्पेन सुरू केलं होतं.

Swapnasundari

Swapnasundari

Swapnasundari : रेडबेल मीडिया आणि पॅनोरमा स्टुडिओज प्रस्तुत आगामी मराठी चित्रपट ‘स्वप्नसुंदरी’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे आणि ही चर्चा जरा वेगळ्याच कारणासाठी रंगली आहे. कारण असं की, सध्या भूषण प्रधान आणि सायली पाटील आपल्या चाहत्यांच्या लग्नात जाऊन त्यांना सरप्राईज आहेत.

काही दिवसांपूर्वी चित्रपटाच्या टीमने सोशल मीडियावर ‘कॅन व्ही अटेंड युअर वेडिंग?’ हे भन्नाट कॅम्पेन सुरू केलं होतं. या हटके संकल्पनेला चाहत्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून असंख्य नवदांपत्यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी भूषण प्रधान आणि सायली पाटील यांना आपल्या लग्नासाठी प्रेमाने निमंत्रण दिलं. या उत्स्फूर्त प्रतिसादातून काही निवडक लग्नसोहळ्यांना भूषण आणि सायलीने उपस्थित राहात नवविवाहितांना आयुष्यभर लक्षात राहील, असं सरप्राईज दिलं.

या अनपेक्षित भेटीमुळे लग्नसोहळ्यातील आनंद द्विगुणित झाला. नवदांपत्यांसोबत गप्पा, फोटो, सेल्फी, शुभेच्छा आणि धमाल मस्ती करत भूषण आणि सायली यांनी प्रत्येक कुटुंबासोबत अविस्मरणीय क्षण अनुभवले. कलाकारांना आपल्या लग्नात पाहून अनेक चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. सोशल मीडियावरही या भेटींचे फोटोज आणि व्हिडिओज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, या अनोख्या कॅम्पेनचं सर्वत्र कौतुक होत आहे.

यावेळी भुषण प्रधान आणि सायली पाटील म्हणाले, ‘’या कॅम्पेनला मिळालेलं प्रेम आमच्यासाठी खरंच खूप खास आहे. खंत एकाच गोष्टीची आहे की, या सगळ्या विवाह सोहळ्यांना आम्हाला उपस्थित राहाणं शक्य नाही. यासाठी आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. परंतु यातील काही निवडक लग्न सोहळ्यात आम्ही उपस्थित राहिलो आणि प्रत्येक लग्नात आम्हाला कुटुंबातील सदस्यांसारखं प्रेम मिळालं. या नवदांपत्यांना तर त्यांच्या आयुष्यातील ‘स्वप्नसुंदरी’ आणि ‘स्वप्नातील जोडीदार’ मिळालाच आहे. त्यांच्या आनंदात सहभागी होत आम्हीही मनापासून धमाल केली. परंतु आमच्या ‘स्वप्नसुंदरी’ चित्रपटातील राघवला त्याच्या आयुष्यातील खरी ‘स्वप्नसुंदरी’ मिळणार का? आणि त्याच्या प्रेमकहाणीत नेमकं कोणतं सरप्राईज दडलं आहे, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना २४ जुलैपासून चित्रपटगृहात यावंच लागेल. आम्हाला खात्री आहे की, प्रत्येकाला या कथेत स्वतःच्या आयुष्यातील एखादा क्षण नक्कीच सापडेल.”

सतीश महादेव गेजगे निर्मित आणि अक्षय जयसिंगराव शिंदे दिग्दर्शित ‘स्वप्नसुंदरी’ ही प्रेमकहाणी म्हणजे मनोरंजन आणि कौटुंबिक कलाकृती आहे. चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन अक्षय जयसिंगराव शिंदे यांनी केलं असून, दर्शना सतीश गेजगे आणि निलेश सुरेश अग्रवाल हे सहनिर्माते आहेत. रोमान्स, कौटुंबिक नाट्य, विनोद आणि एका मोठ्या सरप्राईजने भरलेली ‘स्वप्नसुंदरी’ येत्या २४ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

Exit mobile version