Mardaani 3 Movie : यशराज फिल्म्सची सुपरहिट फ्रेंचाइझी ‘मर्दानी’ गेल्या 10 वर्षांपासून प्रेक्षकांचे प्रेम जिंकत आहे. हिंदी सिनेमातील सर्वात मोठी सोलो फीमेल-लीड फ्रेंचाइझी ठरली आहे. या ब्लॉकबस्टर फ्रेंचाइझीला प्रचंड प्रेम मिळाले असून सिनेप्रेमींसाठी एक कल्ट स्टेट्स बनली आहे।
आज, ‘मर्दानी 2’ च्या रिलीजच्या वर्धापनदिनी, यशराज फिल्म्सने अधिकृतरीत्या ‘मर्दानी 3’ ची घोषणा केली.
यामध्ये बॉलीवूड अभिनेत्री राणी मुखर्जी पुन्हा एकदा शिवानी शिवाजी रॉय या धाडसी पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.
मर्दानी 3 चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर राणी मुखर्जीने प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. मला आज खूप आनंद होत आहे. मर्दानी 3 या चित्रपटाची शूटिंग एप्रिल 2025 पासून सुरू होणार आहे. चित्रपटातील धाडसी पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेला पुन्हा न्याय देता येईल याचा मला अभिमान आहे असे राणी यावेळी म्हणाली.
हा चित्रपट त्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांना समर्पित आहे जे निस्वार्थपणे आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी दररोज मेहनत घेतात. जेव्हा आम्ही ‘मर्दानी 3’ बनवण्याचा विचार केला, तेव्हा आमचा उद्देश असा होता की हा चित्रपट प्रेक्षकांसाठी आधीपेक्षा वेगळा अनुभव घेऊन येईल. आपल्याकडे असलेल्या कथेने मला खूप आनंद दिला आहे, आणि प्रेक्षकही ती पाहून तितकेच आनंदी होतील असा विश्वास वाटतो असे राणी मुखर्जी म्हणाली.
राणी पुढे म्हणाली,‘मर्दानी’ आवडती फ्रेंचाइझी आहे आणि त्यामुळे प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करणे आमचं कर्तव्य आहे. आम्ही ही अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू. प्रेक्षक या चित्रपटाला किती प्रेम देतील, हे पाहायला मी उत्सुक आहे.
मर्दानी 3’ मध्ये यशराज फिल्म्सने लेखन आणि दिग्दर्शन विभागातील दोन नवोदित कलाकारांना फ्रेंचाइझी पुढे नेण्याची संधी दिली आहे. ‘द रेलवे मेन’ फेम आयुष गुप्ता यांनी ‘मर्दानी 3’ चे पटकथा लेखन केले आहे. फिल्मचे दिग्दर्शन अभिराज मीनावाला करणार आहेत, ज्यांना यशराज फिल्म्सने तयार केले आहे. अभिराज यांनी आधी ‘बँड बाजा बारात’, ‘गुंडे’, ‘सुलतान’, ‘जब तक है जान’, ‘टायगर 3’ अशा अनेक चित्रपटांमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. सध्या ते ‘वॉर 2’ चे सहायक दिग्दर्शक आहेत आणि आता ‘मर्दानी’ फ्रेंचाइझीची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.