बालमनाचा ठेका धरत ‘चिकीझिंग’चे शीर्षक गीत रसिकांच्या भेटीला…

Chikizing Marathi Movie Title Song: बालपणाचा गोडवा जपणारा ‘चिकीझिंग’ हा चित्रपट येत्या 19 नोव्हेंबरला चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार.

Chikizing Marathi Movie Title Song

Chikizing Marathi Movie Title Song

Chikizing Marathi Movie Title Song: बालपणीच्या निरागस आठवणी, मातीच्या सुगंधात दरवळणारा आनंद आणि भावंडांच्या नात्यातील निखळ प्रेम यांची सुरेल गुंफण अनुभवायला मिळते ती ‘चिकीझिंग’ या आगामी मराठी चित्रपटाच्या शीर्षकगीतामधून! गेल्या काही दिवसांपासून चित्रपटसृष्टीत चर्चेत असलेल्या या चित्रपटाचे मंत्रमुग्ध करणारे शीर्षकगीत नुकतेच व्हिडीओ पॅलेसच्या सहकार्याने प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. खेळकर शब्दरचना, ठेका धरायला लावणारे संगीत आणि ग्रामीण जीवनाचे लोभस चित्रण यांमुळे हे गीत बालपणाच्या रम्य विश्वात घेऊन जाते. बऱ्याच दिवसांनी अशा प्रकारचे बालगीत आल्याने रसिकांचे लक्ष वेधले गेले आहे. बालपणाचा गोडवा आणि नात्यांची ऊब जपणारा ‘चिकीझिंग’ हा चित्रपट येत्या 19 नोव्हेंबरला चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.

“मरिया, तुम मुझसे अनार हो!” शाहरुखच्या भन्नाट संवादामागचा किस्सा; रेणुका शहाणेंनी सांगितला ‘कौन बनेगा करोडपती’च्या मंचावर!

दिपक वाणी आणि जयप्रकाश भांडे प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती ए थीमटीम स्टुडिओ प्रॉडक्शनने कीफ्रेम प्रॉडक्शनच्या सहकार्याने केली आहे. सुप्रिया बगाटे या चित्रपटाच्या निर्मात्या असून शब्बीर साबुवाला, रचना वोरा, हृषिकेश देशमुख, सिड विंचुरकर, करण चव्हाण, उमेश कुलकर्णी सहनिर्माते आहेत. या चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन राजेंद्र बगाटे आणि वैभव कुलकर्णी यांनी केले आहे. ग्रामीण भागातील बालपण, शाळेतील गंमतजंमत, भावंडांमधील जिव्हाळा आणि कौटुंबिक नात्यांचे भावविश्व हा चित्रपट उलगडतो. ‘झिंग चिकी चिकी झिंग’ या शीर्षकगीताला गौरी जोशी आणि पद्मनाभ गायकवाड यांच्या आवाजाची गोड किनार लाभली आहे. वैभव कुलकर्णी यांच्या खट्याळ शब्दांना श्रीनिधी व्यंकट यांनी सुरेल चालीत गुंफले आहे. कृष्णराज वाईंगडे आणि सहकलाकारांवर चित्रित झालेल्या या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन स्नेहा पाटील आणि सेजल कोरे यांनी केले आहे.

मुलांच्या कल्पनाविश्वातील गंमत, निरागस खोड्या आणि छोट्या छोट्या गोष्टींतून आनंद शोधण्याची वृत्ती शब्दांतून आणि सुरांतून खुलते. लाल मातीचे रस्ते, हिरवीगार शेते, कौलारू घरांच्या ओवऱ्या, शाळेतील धमाल आणि वाहत्या पाण्याचे प्रवाह यांतून ग्रामीण जीवनाचे देखणे चित्र उभे राहते. बालकलाकाराच्या चेहऱ्यावरील निरागस भाव, खोडकर हालचाली आणि बहीण-भावाच्या नात्यातील माया गाण्याला भावनिक खोली देतात. जोकरच्या वेशातील व्यक्तिरेखेचा उत्साह आणि मुलांच्या धमाल विश्वातील रंगतही लक्ष वेधून घेते. संगीताचा ठेका आणि छायांकनाची कल्पकता यांमुळे हे गीत केवळ श्रवणीय न राहता दृक्-सुख देणारा अनुभव ठरते.

‘रामायण: राइज ऑफ अ लिजेंड’चे लॉस एंजेलिसमधील प्रतिष्ठित अकॅडमी म्युझियम ऑफ मोशन पिक्चर्स येथे रंगणार भव्य वर्ल्ड प्रीमियर

प्रभाकर मोरे, कृष्णराज वाईंगडे, सेजल कोरे, अमृता सुरेश, गायत्री देशपांडे, आदित्य घनश्याम, राहुल कुलकर्णी आणि डॉ. सोनाली घाटणेकर यांच्या भूमिका चित्रपटाला अधिक समृद्ध करतात. प्रवीण सोनावणे यांचे छायांकन, शेखर गुरव आणि एस. शंकर यांचे संकलन, तसेच श्रीनिधी व्यंकट आणि हृषिकेश कुलकर्णी यांचे संगीत चित्रपटाच्या कलात्मक बाजूला बळ देते. सुरेश कुंभार यांनी कला दिग्दर्शन आणि वेशभूषेची जबाबदारी सांभाळली आहे. येत्या 19 नोव्हेंबरला ‘चिकीझिंग’ हा चित्रपट चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.

Exit mobile version