Download App

सीएसआरडीमध्ये सदाशिव अमरापूरकर यांच्या स्मृतींना देणार उजाळा

  • Written By: Last Updated:

चित्रपट सृष्टीतील प्रतिभावान व चतुरस्त्र कलाकार स्वर्गीय सदाशिव अमरापूरकर यांच्या जन्मदिनानिमित्ताने अहमदनगर येथील बीपीएचई सोसायटीचे सीएसआरडी समाजकार्य व संशोधन संस्था, रोटरी क्लब ऑफ अहमदनगर इंटिग्रीटी व सदाशिव अमरापूरकर मेमोरियल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. गुरुवारी ११ मे रोजी सायंकाळी पाच वाजता सीएसआरडी संस्थेत आठवणीतील अमरापूरकर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सीएसआरडीचे संचालक डॉ.सुरेश पठारे यांनी दिली.

ते म्हणाले की, चित्रपट सृष्टीतील प्रतिभावान व चतुरस्त्र कलाकार म्हणून नावलौकिक असलेले स्वर्गीय सदाशिव अमरापूरकर यांनी ५ भाषा व ३०० हून अधिक चित्रपटात वेगवेगळ्या भूमिका साकारून आपल्या अभिनयाने असंख्य चाहत्यांच्या मनावर अधिराज्य केले आहे. विशेष म्हणजे आपल्या अभिनयासोबतच नेहमी समाजभानही अखेरच्या श्वासापर्यंत जपले. जिथे अन्याय असेल तेथे आवाज उठवायचा हा त्याच्या व्यक्तिमत्वाचा सर्वात प्रभावित करणारा पैलू होता.

मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील असलेले अमरापूरकर सर यांनी महाराष्ट्रील सामाजिक चळवळीशी हयात असेपर्यंत नाते जपले तसेच एक नट म्हणून यशाची उत्तुंग शिखरे गाठून देखील आपल्या अहमदनगर जिल्ह्याशी कधीही नाळ तुटू दिली नाही. त्यामुळेच अहमदनगर जिल्ह्यातील असंख्य लोक आजची स्व. सदाशिव अमरापूरकर यांच्यावर मनापासून प्रेम करत असून त्यांचा आदर्श व प्रेरणा घेवून त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेत आहेत. त्यामुळे त्यांच्या जन्मदिनानिमित्ताने त्यांच्या नजीकच्या लोकांकडून त्यांच्या आठवणींना उजाळा मिळावा या उद्देशाने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमा अंतर्गत सुनंदा अमरापुरकर, मकरंद खेर, स्नेहालयाचे गिरीश कुलकर्णी, राजाभाऊ अमरापूरकर हे स्व. सदाशिव अमरापूरकर यांच्या स्मृतींना उजाळा देणार आहे. रीमा अमरापूरकर या मुलाखतीच्या माध्यमातून या मान्यवरांशी संवाद साधणार आहेत.

यासोबतच या कार्यक्रमामध्ये स्व. सदाशिव अमरापूरकर यांच्या सेवा कार्याला अभिवादन म्हणून जून महिन्यात घेण्यात येणार असणाऱ्या स्वर्गीय सदाशिव अमरापूरकर डॉक्युमेंटरी व शॉट फिल्म फेस्टिवलची उद्घोषणा देखील करण्यात येणार आहे.

त्यामुळे कलाक्षेत्राची आवड असणाऱ्या व सदाशिव अमरापूरकर यांच्यावर प्रेम करणाऱ्या अहमदनगरकरांसाठी मोठी पर्वणी असणार आहे. जास्तीत जास्त अहमदनगरकरांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन रोटरी क्लब ऑफ अहमदनगर इंटिग्रीटीचे रवी डिक्रुझ, निखिल कुलकर्णी व चंदना गांधी यांनी केले आहे.

Tags

follow us