Dhurandhar Review : अदित्य धर यांच्या उरी (2019) नंतरच्या “धुरंधर”कडे अपेक्षांचा मोठा भार होता. रणवीर सिंह अंडरकव्हर गुप्तहेराच्या भूमिकेत आणि त्याला पूरक असा तांत्रिक भव्यपट हे समीकरण प्रभावी ठरायला हवे होते. मात्र, कथानकातील तुटकपणा, अतिदीर्घ मांडणी आणि भावनिक आंदोलनांचा अभाव यांमुळे हा चित्रपट अखेरीस तटस्थ अनुभव देणारा ठरतो. काठावर उभं राहून पाहण्याचा फील देतो. उरी पाहून जे मनात घडलं ते फिलिंग आपल्याला मिळत नाही, याची खंत टोचत राहते.
निर्मितीची भव्यता अन् आशयातील उणीव
गुप्तहेरपटांचे प्रतिमानच फसवणूक, रणनीती आणि नैतिक संघर्षांच्या धाग्यांवर उभे असते. “धुरंधर”मध्ये मात्र हे धागे सुटलेले जाणवतात. बाहेरून पाहता तांत्रिकदृष्ट्या हा एक मोठा प्रोजेक्ट वाटतो; पण आशयाची तुटलेली सांगड कलात्मक अनुभव आणि एकूणच परिणामातील दाहकता कमी करते.
कथा आणि उपकथांचे पाल्हाळ…
कथा 1999 च्या कंदहार विमान अपहरणापासून सुरू होते आणि त्यानंतर 2001 च्या संसद हल्ल्यापर्यंत येते. या घटनांमुळे अधिक सुसंघटित, राजकीय-रणनैतिक नाट्य उभे राहायला हवे होते, पण पटकथेचे लक्ष्य “अनेक गोष्टी दाखवणे” इथेच अडकून पडते. अजय सन्याल (आर. माधवन) दीर्घकालीन मिशन “ऑपरेशन धुरंधर” सुचवतो. हमजा अली (रणवीर सिंह) कराचीतील टोळ्यांमध्ये उतरतो, रहमान डकैत (अक्षय खन्ना) आणि राजकीय घटक यांच्यातील संगनमत उलगडण्याचा प्रयत्न करतो. दृश्ये प्रभावी असूनही, इतक्यांच्या गर्दीत मुख्य कथानक लोप पावते. ही रूपरेषा गुप्तहेरपटापेक्षा गँगस्टर कथेकडे वळते आणि त्या द्वंद्वात “राष्ट्रवादाचा गुप्तहेरपट” हा हेतूच अस्पष्ट होतो.
पात्र रचना : आकर्षक पण अपूर्ण
हमझाच्या पात्राला नाट्यमय गूढता आहे; पण त्याचा संघर्ष, त्याची मानवी भीती, त्याचे नैतिक द्वंद्व… या महत्वाच्या पैलूंची उभारणी चित्रपट सोडून देतो, परिणामी पात्र प्रेक्षकांशी नाळ जोडण्यात अपयशी ठरते. तुलनेने अक्षय खन्ना प्रभावी अनुभव देतो, पण त्याचे पात्र एकसुरी “गुन्हेगार-सेठ” या चौकटीच्या बाहेर येत नाही. पाकिस्तानी बाजूला भरपूर स्क्रीन टाइम असूनही त्यांच्या मानवी गुंतागुंतीला स्थान मिळत नाही. तिथे सिनेमा वरवरचा तवंग असल्याचा फील देतो.
चित्रभाषा आणि प्रयोग
क्वांटिनो टॅरंटिनों शैलीतील इंट्रो, तडाखेबाज अॅक्शन सिक्वेन्स, ताण निर्माण करणारे पार्श्वसंगीत, डबल-कटिंग – या सर्वांद्वारे चित्रपट नजरेला सुख देतो, पण काही वेळानंतर त्याच त्या गोष्टीची पुनरावृत्ती टाळता आली असती तर अधिक परिणामकारक वाटलं असतं हा अतिरेक आशयातील कमतरतेच अअधोरेखित करतो.
भावनिक आधाराचा अभाव
गुप्तहेरपटांचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे “कर्तव्य विरुद्ध भावविश्व” हा नैतिक संघर्ष. येथे मात्र हमझाला एकच भावना रोखते.. देशभक्ती. त्यावर शंका, संकट, अंतर्गत ऊर्मी — काहीही नाही. त्यामुळे कथानकाला खोली प्राप्त होत नाही आणि अपेक्षित वजनही. पटकथा गहिरेपणा दाखवण्यात कमी पडते. पृष्ठभागी, केवळ सिनेमॅटिक सादरीकरणात अडकते.
डायलॉग आणि राजकीय सूचकता
26/11च्या कॉल रिकॉर्डिंगचा वापर, नोटबंदीवर सूचक इशारे, कधीकधी चौथी भिंत तोडणे… हे धाडसी प्रयोग आहेत, पण पटकथेची रचना कमजोर असल्याने, हे प्रयोग परिणामकारक ठरत नाहीत. डायलॉग प्रेक्षकप्रिय ठरावे, या हेतूने लिहिल्यासारखे वाटतात; घायल हूं इसलिए घातक हूं… या पलीकडे ओळ लक्षात राहत नाही…
एकूण पडसाद
214 मिनिटांच्या कालावधीत “धुरंधर” स्वतःला सिद्ध करण्यासाठी अनेक दिशा गाठण्याचा प्रयत्न करतो. पण कोणत्याच दिशेने तो ठाम उभा राहत नाही.
उरी, आर्टिकल 370 , बारामुल्ला यांसारख्या चित्रपटांनी विषय-सत्यता आणि कथन-गंभीरता पकडली. “धुरंधर”मध्ये ती अपेक्षित दृढता जाणवत नाही.
थोडक्यात हा सिनेमा म्हणजे आकाराने मोठ्या चमकदार गिफ्ट पेपर मध्ये गुंडाळलेल्या भेटवस्तूसारखा दिसतो. पाहुण्यांच्या हातातच अधिक आकर्षक वाटतो. आपल्यासमोर आल्यावर आणि ते उघडल्यानंतर जी निराशा पदरी पडेल, तसं फिलिंग आपल्याला धुरंदर बघितल्यावर येतं.
बाहेरून भव्य, पण आतून रिकामा.
का बघावा:
तांत्रिक मांडणी प्रभावी, अभिनय सशक्त
का टाळावा :
पटकथेचा आत्मा हरवलेला.
थोडक्यात काय :
स्टाईल जास्त, भावना आणि थरार कमी.
कालावधी : 3 तास 32 मिनिटे
कलाकार : रणवीर सिंह, आर. माधवन, अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल, संजय दत्त इत्यादी
लेखन-दिग्दर्शन : अदित्य धर
या सिनेमाला मी देतो अडीच स्टार्स.
अमित भंडारी
IndiGo फ्लाइट रद्द झाली तर परतावा कसा मिळेल? जाणून घ्या सर्वकाही
