Nitin Chandrakant Desai : सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कर्जतमधील एन.डी. स्टुडिओमध्ये त्यांनी गळफास घेत जीवन संपवलं. देसाई यांच्या आत्महत्येनं हिंदी आणि मराठी सिनेमासृष्टीवर शोककळा पसरली आहे. उरणचे अपक्ष आमदार महेश बालदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, देसाई मागील काही दिवसांपासून आर्थिक अडचणीत होते. यातूनच त्यांनी आत्महत्या केली.
नितीन चंद्रकांत देसाई यांना सन २००० मध्ये ‘हम दिल दे चुके सनम’साठी तर २००३ मध्ये ‘देवदास’साठी उत्कृष्ट कला दिग्दर्शक म्हणून राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले होते. मराठीतील ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ या सिनेमासाठी उत्कृष्ट कला दिग्दर्शक म्हणून ‘महाराष्ट्र राज्य सिनेमा पुरस्कार’ देखील त्यांना सन्मानित केले होते. प्रोडक्शन डिझायनर म्हणून ‘लगान’, जोधा-अकबर, ‘हम दिल दे छुके सनम’, ‘मिशन काश्मीर’, ‘देवदास’, ‘खाकी’, ‘स्वदेस’, प्रेम रतन धन पायोया यासारख्या सिनेमाच्या लोकप्रियतेत नितीन देसाई यांच्या कला दिग्दर्शनचा मोठा वाटा होता.
नितीन देसाई यांच्या कार्याची व्याप्ती प्रचंड आहे. मुंबईतील कर्जत जवळ त्यांनी एक भव्य स्टुडीओ उभा केला होता. ज्याद्वारे अनेक सिनेमांचे चित्रीकरण करण्यात आले आहे. त्यांच्या कलेच्या जोरावर त्यांनी संपूर्ण देशात नाव कमावले. खास करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमांसाठी त्यांनी अनेक वेळा सेट उभारले आहेत.
आर्थिक विवंचनेतून आत्महत्या :
दरम्यान, उरणचे अपक्ष आमदार महेश बालदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी ४ वाजता कला कलादिग्दर्शक यांनी आत्महत्या केली. ते आर्थिक अडचणीत होते अशी माहिती मिळत आहे. ‘स्टुडिओ हा फ्लिमवर चालतो. मात्र, स्टुडिओ चालत नसल्यामुळे ही घटना घडली आहे. गेल्या 2 महिन्यांपूर्वी त्यांच्याशी बातचीत झाली होती. तेव्हा देखील त्यांनी आर्थिक विवंचना सुरू आहे असं सांगितलं होतं.
नितीन देसाई यांनी ८०च्या दशकात आपल्या करिअरला सुरुवात केली होती. ‘१९४२ अ लव्ह स्टोरी’ या हटक्या सिनेमाने नितीन देसाई यांना खऱ्या अर्थाने ब्रेक मिळाला होता. तसेच त्यांनी अनेक लोकप्रिय दिग्दर्शकांबरोबर काम केलं आहे. नितीन देसाई यांनी शुन्यातून स्वर्ग निर्माण केला आहे. त्यांनी त्यांचं स्वप्न साकार केलं होतं. कला दिग्दर्शन सारख्या वेगळ्या क्षेत्रात नितीन देसाई यांनी मोलाचं काम केलं आहे. गेल्या 30 वर्षांतल्या अनेक सिनेमांच्या कलादिग्दर्शनाची धुरा नितीन देसाई यांनी सांभाळली आहे.