Frame Movie Review : फ्रेम म्हटलं की गोठलेल्या क्षणांचा माहौल असतो…विक्रम पटवर्धनने क्लिकच्या अलीकडचा आणि पल्याडचा विचार करून रोजमर्राच्या जगण्यात गोठत जाणाऱ्या संवेदनांवर अलवारपणे भाष्य करतो… क्लिक करताना लेन्सच्या मागे असणाऱ्या डोळ्यात आणि त्याचवेळी मनात चालणाऱ्या कल्लोळाचा घेतलेला हा वेध आहे.
आजच्या डिजिटल युगात एखादी घटना घडली की, मदतीचा हात पुढे करण्यापेक्षा मोबाईल काढून व्हिडिओ शूट करणाऱ्यांची संख्या वाढताना दिसते. अशा काळात फोटो पत्रकारितेतील नैतिकता, संवेदनशीलता आणि माणुसकीचा वेध घेणारा ‘फ्रेम’ हा चित्रपट अत्यंत महत्त्वाचा ठरतो. दिग्दर्शक विक्रम पटवर्धनने पहिल्याच चित्रपटात अत्यंत परिपक्व विषय हाताळत प्रेक्षकांना अंतर्मुख करणारा अनुभव दिला आहे.
या फिल्मच्या केंद्रस्थानी आहेत दोन फोटो जर्नालिस्ट… अनुभवी फोटो जर्नालिस्ट चंदू पानसरे (नागराज मंजुळे) आणि नवखा छायाचित्रकार सिद्धार्थ देशमुख (अमेय वाघ). दोघेही एकाच व्यवसायात असले तरी त्यांच्या कामाकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे वेगळा आहे.
चंदूसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘परफेक्ट फोटो’. एखादा अपघात असो, आत्महत्या असो किंवा नैसर्गिक आपत्ती… त्याच्यासाठी त्या क्षणातील भावना महत्त्वाच्या नसतात; महत्त्वाची असते ती कॅमेऱ्यात कैद होणारी फ्रेम. त्यामुळे तो आधी छायाचित्रकार आहे आणि नंतर माणूस… कर्तव्य अगोदर आणि माणुसकी नंतर हा त्याचा शिरस्ता आहे… आणि अर्थात नवखा असला तरी स्वतःची विचार बैठक घेऊन आणि आपल्या तत्त्वांची बूज राखणारा सिद्धार्थ तितकाच महत्वाचा वाटतो… हा संघर्ष म्हणून तो मानसिक पातळीवर आहे… तो अधोरेखित करताना कुठेही अतिरंजित होत नाही… त्यातील समतोल विक्रमने अत्यंत हुशारीने राखला आहे.
सिद्धार्थमधील संवेदनशीलता अजूनही जिवंत आहे. एखाद्या मृतदेहाकडे थेट कॅमेरा रोखताना त्याचा जीव कासावीस होतो. एका आत्महत्येच्या घटनास्थळी तो मृतदेहाऐवजी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीवर फोकस करून वेगळ्या पद्धतीने फोटो टिपतो. हा प्रसंग चित्रपटातील सर्वात प्रभावी दृश्यांपैकी एक ठरतो आणि दिग्दर्शकाची संवेदनशील मांडणी अधोरेखित करतो.
दिग्दर्शक विक्रम पटवर्धन यांचे मोठे यश म्हणजे त्यांनी चंदूला खलनायक बनवलेले नाही. तो कर्तव्यनिष्ठ कठोर आहे, असंवेदनशील वाटला तरी प्रॅक्टीकल नाही असे कुठेही वाटत नाही; पण त्यामागे त्याचे वैयक्तिक आयुष्य, तुटलेले नाते आणि व्यवसायाने निर्माण केलेली भावनिक पोकळी आहे. सतत हिंसा, मृत्यू आणि दुर्घटना पाहत राहिल्याने माणूस संवेदनाहीन होतो का? की आधीच असलेली भावनिक दरी त्याच्या कामात उतरते? हा प्रश्न चित्रपट सतत उपस्थित करतो…
उत्तरार्धात महाराष्ट्रातील भूकंपग्रस्त भागात घडणारे प्रसंग चित्रपटाला अधिक व्यापक सामाजिक संदर्भ देतात. जरी या भागात फोटो पत्रकारितेतील नैतिकतेवर आणखी सखोल भाष्य करता आले असते, असे वाटत राहते. हा मुद्दा व्यक्तीसापेक्ष आहे.
तरी चित्रपट आपला मूळ मुद्दा…’चांगला छायाचित्रकार होण्यापेक्षा चांगला माणूस असणं अधिक महत्त्वाचं आहे’…कधीही सोडत नाही.
नागराज मंजुळे यांनी चंदूच्या भूमिकेत कमालीचा संयम आणि ताकद दाखवली आहे. त्यांच्या नजरेतून, देहबोलीतून आणि संवादफेकीतून पात्रातील कठोरपणा प्रभावीपणे समोर येतो. घरी दारू पिताना इतर सहकारी मित्र निघून गेल्यावर नागराज अमीन खाजगी जीवनाबाबत काही प्रश्न विचारल्यावर त्यांचं संयतपणे व्यक्त होणं किंवा ऑफिसमधील ‘एचआर’ सोबतचा वाद, भूकंपग्रस्त भागातून दूरवर अनोळखी माणसासोबत बाईकवर निर्विकारपणे प्रवास करणं… त्यानंतर सिगरेट शांतपणे पिणे… यावेळी त्याचे डोळे ज्या पद्धतीने बोलतात…ते कमाल आहे…किंवा अमेय सोबत फिल्मच्या शेवटच्या टप्प्यातील सिक्वेन्सेस पाहणं हे रंजक आहे…’फँड्री’, ‘सैराट’ आणि ‘झुंड’सारख्या सिनेमांचे दिग्दर्शक असलेल्या नागराज मंजुळे यांना अशा पद्धतीने पाहणं हा एक सोहळा आहे.
अमेय वाघने सिद्धार्थच्या भूमिकेत निरागसपणा, संवेदनशीलता आणि संघर्ष अत्यंत सहजतेने साकारला आहे. त्यांचा अभिनय प्रेक्षकांना पात्राशी जोडून ठेवतो. मुग्धा गोडसे यांनी त्यांच्या वाट्याला आलेल्या मोजक्या सीन्सना न्याय दिला आहे.अक्षया गुरव, विठ्ठल काळे आणि इतर कलाकारांनीही आपल्या भूमिका समर्थपणे निभावल्या आहेत.
दिग्दर्शन आणि तांत्रिक बाजू
विक्रम पटवर्धनचे दिग्दर्शकीय दृष्टिकोन हा चित्रपटाची सर्वात मोठी ताकद आहे. ते अनावश्यक नाट्य निर्माण करत नाहीत. प्रसंगांना वेळ देतात, पात्रांना श्वास घेऊ देतात आणि प्रेक्षकांवर मत लादण्याऐवजी विचार करायला भाग पाडतात… हे या सिनेमाचे शक्तिस्थान आहे. त्याने पहिलीच कलाकृती इतकी समंजसपणे हाताळली आहे..मी त्याबद्दल त्याला स्पेशल ब्राऊनी पॉईंट्स द्यायला पाहिजेत.
मिलिंद जोग यांचे छायांकन चित्रपटाच्या आशयाला न्याय देते. प्रत्येक फ्रेम केवळ सुंदर नाही तर अर्थपूर्णही वाटते. संकलन गतिमान असूनही घाईगडबडीचे वाटत नाही. पार्श्वसंगीत प्रसंगांना भावपरिपोष आहे आणि ती जमेची बाजू. अपूर्व गुप्ते,संदीप रसाळ, सुमेध मराठे यांचे फोटोज आणि अमीर खान पठाण याचे फोटो संपादन यांनी रंग भरलेत. एव्ही प्रफुल्लचंद्र याच्या संगीतात एक अनोखा अंदाज आहे. क्षितिज पटवर्धन आणि शाल्मली खोलगडेचे शब्द वेगळाच भाव घेऊन येतात…
चित्रपटाच्या उत्तरार्धात माध्यमांची भूमिका, संघर्षाचे कव्हरेज आणि नैतिकतेवर अधिक सखोल चर्चा अपेक्षित वाटते. काही ठिकाणी विषय आणखी विस्तारता आला असता. मात्र त्यामुळे चित्रपटाचा प्रभाव कमी होत नाही, हे देखील तितकेच खरं आहे.
‘फ्रेम’ हा केवळ फोटो पत्रकारितेवर आधारित चित्रपट नाही; तो प्रत्येकासाठी आहे ज्याने कधी ना कधी एखादी दुर्घटना पाहून मदतीपेक्षा कॅमेरा उचलला आहे. आजच्या सोशल मीडिया संस्कृतीत हा चित्रपट अत्यंत भावणारा… जवळचा वाटणारा आणि काळाला सुसंगत वाटतो
नागराज मंजुळे आणि अमेय वाघ यांच्या दमदार अभिनयासोबत विक्रम पटवर्धन यांचे परिपक्व दिग्दर्शन ‘फ्रेम’ला विचारी आणि संवेदनशील अनुभव बनवते.
LetsUpp Rating : ⭐⭐⭐1/2⭐ (3.5/5)
अमित भंडारी, समीक्षक
का पाहावा?
विक्रम पटवर्धनचे दिग्दर्शन, नागराज मंजुळे आणि अमेय वाघ यांचा उत्तम अभिनय. संवेदनशील आणि वास्तववादी मांडणी
का टाळावा ?
टिपीकल फिल्मी मनोरंजनाची अपेक्षा असेल तर…उत्तरार्धात काही मुद्दे अधिक ठळक विस्ताराने अपेक्षित होते त्याची उणीव भासते.
थोडक्यात काय ?
फ्रेम’मध्ये गोठलेल्या क्षणांच्या मधलं अन् त्या पलीकडचं… बरंच काही…
फ्रेम
लेखन – दिग्दर्शक – विक्रम पटवर्धन
कलाकार -नागराज मंजुळे, अमेय वाघ, मुग्धा गोडसे, अक्षया गुरव, विठ्ठल काळे,ऋग्वेद फडके
सिनेमॅटोग्राफी – मिलिंद जोग
संकलन -कुतुब इनामदार
संगीत – एव्ही प्रफुल्लचंद्र
गीतकार – क्षितिज पटवर्धन, शाल्मली खोलगडे
