Download App

भव्यदिव्य सेटवर चित्रीत होणार रहस्यमय ‘घबाडकुंड’; दिसणार चमत्कारीक गोष्टी

Ghabadkund : जीवनात शिखरावर पोहोचण्यासाठी कितीही मेहनत घेतली, कष्ट उपसले, खस्ता खाल्ल्या तरी आयुष्यात एकदा तरी एखादं घबाड मिळावं

  • Written By: Last Updated:

Ghabadkund : जीवनात शिखरावर पोहोचण्यासाठी कितीही मेहनत घेतली, कष्ट उपसले, खस्ता खाल्ल्या तरी आयुष्यात एकदा तरी एखादं घबाड मिळावं आणि चुटकीसरशी श्रीमंत होता यावं असे प्रत्येकालाच वाटत असतं. अशाच प्रकारच्या घबाडाची आणि त्याचा शोध घेणाऱ्यांची गोष्ट ‘घबाडकुंड’ या (Ghabadkund) आगामी मराठी चित्रपटात पहायला मिळणार आहे. ‘घबाड’ म्हणजे अचानक धनप्राप्ती होणे, एखादी लॅाटरी लागणे, नशीबच पालटणे असा घबाडचा अर्थ आहे. ‘कुंड’ म्हणजे विहीर किंवा पाणी जमा होणारी एखादी खोलगट जागा. या दोन्हींचे मिळून ‘घबाडकुंड’ असे सिनेमाचे लक्षवेधी शीर्षक ठेवले आहे. विशेष म्हणजे या चित्रपटासाठी भव्यदिव्य, अत्यंत खर्चिक, नेत्रदीपक सेट तयार करण्यात आला आहे. मोठ्या पडद्यावर हा सेट प्रेक्षकांची नजर खिळवून ठेवणारा ठरणार आहे.

‘अल्याड पल्याड’ चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर दिग्दर्शक प्रीतम एस. के. पाटील, निर्माते रसिक कदम आणि सह निर्मात्या स्मिता पायगुडे -अंजुटे यांच्या साथीने सस्पेन्स थ्रिलर जॉनर प्रेक्षकांसाठी घेऊन आले आहेत. अ‍ॅक्शन, विनोद, रहस्य असा सगळा भरगच्च मसाला असलेला ‘घबाडकुंड’ चित्रपट सादरीकरणाच्या दृष्टीने प्रेक्षकांसाठी ट्रीट असणार आहे. ‘घबाडकुंड’ या चित्रपटाची कथा रहस्यमय असून, यात बऱ्याच चमत्कारीक गोष्टी घडताना दिसणार आहेत. दिग्दर्शक प्रीतम पाटील ‘घबाडकुंड’च्या रूपात आणखी एक उत्कंठावर्धक कथानक असलेला बिगबजेट चित्रपट प्रेक्षकांसमोर घेऊन येणार आहेत. या चित्रपटासाठी पुण्याजवळील खेड-शिवापूर येथे सिनेमाचा सेट उभारला आहे. १० ते १२ हजार स्क्वेअर फुटांच्या जागेवर भव्य सेट उभारण्यात आला आहे. या सेटवर पाण्याची कुंड, खोलवर गेलेल्या विहिरी, पुरातन मंदिरे, गुहा, त्यातून जाण्या-येण्याचे मार्ग यांचा वापर गूढ निर्माण करणारी रहस्यमय दृश्ये चित्रीत करण्यासाठी केला जाणार आहे. या चित्रपटात देवदत्त नागे, कुशल बद्रिके, संदीप पाठक, शशांक शेंडे प्राजक्ता हनमघर, स्मिता पायगुडे-अंजुटे, वैष्णवी कल्याणकर, रॉकी देशमुख, आरोही भोईर, साहिल अनलदेवर आदि कलाकारांची फौज मनोरंजनासाठी सज्ज झाली आहे.

मराठीत प्रथमच अशाप्रकारे भव्य-दिव्य सेट तयार करण्यात आला असून, विविध माध्यमांद्वारे रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे कलाकार या चित्रपटात विविधांगी व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहेत. या चित्रपटात रहस्य, थरार, विनोदाच्या जोडीला नात्यांची गुंतागुंतही पाहायला मिळणार आहे. घबाडाचा शोध घेताना अनाहूतपणे एकमेकांवर दाखवला जाणारा अविश्वास आणि त्यातून निर्माण होणारे संशयी वातावरण उत्सुकता वाढवणार आहे. ‘घबाडकुंड’च्या रूपात शीर्षकापासून सादरीकरणापर्यंत एक दर्जेदार बिगबजेट चित्रपट नवीन वर्षाच्या सुरुवातीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एकूणच चित्रपट पाहताना प्रेक्षकांना ‘लार्जर दॅन लाईफ’ असा अनुभव घेता यावा यासाठी ‘घबाडकुंड’ची कलाकार-तंत्रज्ञांची टिम कठोर परिश्रम घेत आहे.

याविषयी दिग्दर्शक प्रीतम एस. के. पाटील म्हणाले की, ‘मराठीतही प्रचंड, भव्य कॅनव्हास असू शकतो हे ‘घबाडकुंड’च्या निमित्ताने दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे. अप्रतिम सेट डिझाइन, संगीत, छायालेखन, संकलन, अभिनय, कम्प्युटर ग्राफिक्स अशा सर्व तांत्रिक बाजू उत्तम असलेला ‘घबाडकुंड’ गोष्ट आणि सादरीकरण या जोरावर कमालीचा यशस्वी ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सिनेमा अर्थातच खूप खर्चिक असला तरीही सिनेमाचा मूळ मुद्दा गोष्ट आवडण्याचा आणि ती तशी सादर करण्याचा असतो. इथं त्या आघाडीवर आम्हाला कुठेही कमी पडायचं नव्हतं. वेगवेगळ्या सेक्टर मध्ये काम करणारी ‘आयकॉन दी स्टाईल’ ही आमची कंपनी आता ‘घबाडकुंड’ चित्रपटाच्या माध्यमातून मनोरंजन क्षेत्रात पाऊल टाकत असून आमच्या या वेगळ्या प्रयत्नांचे स्वागत होईल, याची खात्री निर्माते रसिक कदम आणि सह निर्मात्या स्मिता पायगुडे-अंजुटे यांनी बोलून दाखविली.

व्हेलेंटिना इंडस्ट्री्ज लि. चे विशेष सहकार्य लाभलेला ‘घबाडकुंड’ चित्रपट मराठी, हिंदी, तेलगू अशा तीन भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे लेखन संजय नवगिरे, अक्षय धरमपाल यांचे आहे. कलादिग्दर्शन योगेश इंगळे, छायांकन योगेश कोळी तर संकलन सौमित्र धाराशिवकर यांचे आहे. कार्यकारी निर्माता आकाश जाधव आहेत. साऊथचे प्रसिद्ध फाईट मास्टर कार्तिक यांनी या चित्रपटासाठी साहसदृश्याची जबाबदारी सांभाळली आहे. रंगभूषा अभिषेक याची आहे. प्रोडक्शन मॅनेजर सिद्धार्थ आहेत.

follow us

संबंधित बातम्या