सात दशकं आकाशवाणीवर स्वरांची जादू; ज्येष्ठ गायक-संगीतकार गोविंद पोवळे काळाच्या पडद्याआड

गोविंद पोवळे यांनी आपल्या मधुर आणि भावपूर्ण आवाजाच्या जोरावर ही संधी मिळवली आणि त्यानंतर तब्बल 70 वर्षे त्यांनी आकाशवाणीशी अखंड नाळ जपली.

Untitled Design 4 1

Untitled Design 4 1

Govind Povale passes away : मराठी भावसंगीत विश्वावर आज शोककळा पसरली आहे. ज्येष्ठ गायक, संगीतकार आणि आकाशवाणीवरील सुवर्णकंठ म्हणून ओळखले जाणारे गोविंद पोवळे यांचे रविवारी सकाळी निधन झाले. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने मराठी संगीतसृष्टीने एक संवेदनशील, सुरेल आणि संस्कारी कलाकार गमावला आहे. गेली सात दशके आपल्या आवाजाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा हा स्वर आज कायमचा शांत झाला.

30 ऑक्टोबर 1931 रोजी जन्मलेल्या गोविंद पोवळे यांनी अत्यंत्य सध्या कुटुंबातून संगीताचा प्रवास सुरू केला. त्यांचे मूळ गाव पनवेलजवळील चिरनेर. त्यांच्या वडिलांचे नाव त्रिंबक पोवळे असून ते प्रसिद्ध कीर्तनकार होते. आई पार्वतीबाई यांना देखील संगीताची विशेष आवड होती. त्यामुळे घरातच भक्ती, अभंग, कीर्तन आणि सुरांचे वातावरण असल्याने लहानपणापासूनच गोविंद पोवळे यांच्या मनात संगीताची गोडी निर्माण झाली. घरातूनच मिळालेल्या या सांगीतिक संस्कारांनी पुढे त्यांना मराठी भावसंगीत क्षेत्रातील मानाचे स्थान मिळवून दिले.

वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी त्यांनी आकाशवाणीवर गाण्याची सुरूवात झाली. 1946-47 च्या सुमारास त्यांनी आकाशवाणी मुंबई केंद्रासाठी ऑडिशन दिली होती. त्या काळात रेडिओ हेच मनोरंजनाचे प्रमुख माध्यम होते आणि आकाशवाणीवर गाण्याची संधी मिळणे हे मोठे यश मानले जात होते. गोविंद पोवळे यांनी आपल्या मधुर आणि भावपूर्ण आवाजाच्या जोरावर ही संधी मिळवली आणि त्यानंतर तब्बल 70 वर्षे त्यांनी आकाशवाणीशी अखंड नाळ जपली. त्यांच्या आवाजातील साधेपणा, शब्दांमधील भाव आणि सुरांमधील आत्मीयता यामुळे त्यांची गाणी थेट श्रोत्यांच्या मनाला भिडत असत.

मोठी बातमी ! ‘विजय थलपती’ तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री

मराठी भावसंगीतातील अनेक अजरामर गीतांना त्यांनी आपला स्वर दिला. ‘माती सांगे कुंभाराला’, ‘रात्र काळी घागर काळी’, तसेच ‘संथ वाहते कृष्णामाई’ चित्रपटातील ‘गंगा आली रे अंगणी’ ही त्यांची गीते आजही रसिकांच्या ओठांवर कायम आहेत. त्यांच्या गायकीत ग्रामीण संस्कृतीचा सुगंध, भावगीतांची कोमलता आणि लोकसंगीताची सहजता अनुभवायला मिळत असे. त्यामुळेच त्यांची गाणी काळाच्या पलीकडे जाऊन आजही तितकीच लोकप्रिय आहेत.

गोविंद पोवळे यांनी केवळ गायक म्हणूनच नव्हे, तर संगीतकार म्हणूनही मोठे योगदान दिले. त्यांनी शंभरहून अधिक गीतांना संगीत दिले, तर स्वतः 25 ते 30 पेक्षा अधिक गाणी गायली. त्यांच्या संगीतामध्ये शब्दप्रधानता, सुरेलपणा आणि मराठी संस्कृतीची मातीशी जोडलेली ओळख कायम दिसून येत होती. त्यांनी अनेक नवोदित कलाकारांना मार्गदर्शनही केले. त्यांच्या सहवासात राहिलेल्या कलाकारांच्या मते, ते अत्यंत साधे, शांत आणि संगीताशी प्रामाणिक राहणारे व्यक्तिमत्त्व होते.

गोविंद पोवळे यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर मराठी संगीतविश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे. विविध कलाकार, गायक, संगीतकार आणि रसिकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांच्या निधनाने भावसंगीताचा एक सुवर्णअध्याय संपल्याची भावना व्यक्त होत आहे. आज गोविंद पोवळे यांचा आवाज जरी थांबला असला, तरी त्यांच्या सुरांची जादू कायम जिवंत राहणार आहे. मराठी संगीतविश्वातील त्यांचे योगदान, त्यांची अजरामर गीते आणि संगीतासाठीची त्यांची साधना पुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

Exit mobile version