Haiwaan Movie Review : अंधारात जगणाऱ्या एका सामान्य माणसाची लढाई एका कुख्यात गुन्हेगाराशी झाली तर? आणि त्या लढाईत डोळ्यांपेक्षा इतर इंद्रियांवर विश्वास ठेवणारा नायक समोरच्या शत्रूला कसा चकवतो? या भन्नाट कल्पनेतून ‘हैवान’ची (Haiwaan) कथा उभी राहते. मात्र, कल्पना दमदार असूनही तिची मांडणी अपेक्षित उंची गाठत नाही. प्रियदर्शन दिग्दर्शित ‘हैवान’ हा 2016 मध्ये आलेल्या मल्याळम ‘Oppam’चा हिंदी रिमेक आहे. सैफ अली खान आणि अक्षय कुमार (Akshay Kumar-Saif Ali Khan) यांची जोडी, बोमन इराणींची उपस्थिती आणि एका अंध व्यक्तीभोवती फिरणारा थरार…या सगळ्यामुळे चित्रपटाकडून अपेक्षा निर्माण होतात. काही प्रसंग या अपेक्षा पूर्ण करतातही; पण विस्कळीत पटकथा, अनेक उपकथानकं आणि अनावश्यक लांबी यामुळे चित्रपटाचा प्रभाव कमी होतो.
काय आहे ‘हैवान’ची कथा ?
शाम (सैफ अली खान) हा दृष्टिहीन तरुण. मुंबईतील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये तो मेंटेनन्स मॅनेजर म्हणून काम करतो. देवगडमध्ये राहणाऱ्या बहिणीच्या लग्नासाठी त्याला पैसे उभे करायचे आहेत. त्याचबरोबर कर्जाची परतफेड करण्याचीही जबाबदारी त्याच्यावर आहे.
याच सोसायटीत राहणारे निवृत्त सरन्यायाधीश आणि भारताचे माजी मुख्य न्यायाधीश जज प्रधान (बोमन इराणी) यांच्याशी शामचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. प्रधान आपल्या मनात वर्षानुवर्षे दडवून ठेवलेलं एक गुपित शामसमोर उघड करतात. या गुपिताचा संबंध आहे परशुराम (अक्षय कुमार) नावाच्या एका धोकादायक व्यक्तीशी. प्रधान परशुरामचा शोध घेत असताना, दुसरीकडे परशुरामनेच प्रधान यांना लक्ष्य केलेलं असतं. आणि मग सुरू होते एका दृष्टीहीन माणसाची अत्यंत धोकादायक व्यक्तीविरुद्धची लढाई आहे. डोळे नसले तरी संकटाला पाहण्याची आणि शत्रूला ओळखण्याची शामची क्षमता हा चित्रपटाचा सर्वात मोठा प्लस पॉइंट आहे.
कथा उत्तम, पण पटकथा कमकुवत
प्रियदर्शन, अभिलाष नायर आणि रोहन शंकर यांनी पटकथा लिहिली आहे. मूळ कथेची संकल्पना निश्चितच प्रभावी आहे. मात्र, हिंदी आवृत्तीत पटकथेचा प्रवाह अनेकदा तुटतो. खंडित होतो…विशेषतः पहिल्या भागात अनेक पात्रं आणि त्यांचे परस्पर संबंध समजून घेण्यासाठी प्रेक्षकाला वेळ लागतो. कथा एका दिशेने जात असताना अचानक दुसऱ्या उपकथानकाकडे वळते आणि त्यामुळे मुख्य थराराची पकड सैल होते. चित्रपटात अनेक सबप्लॉट्स आहेत; मात्र त्यातील अनेकांचा समाधानकारक शेवट होत नाही. देवगडचा ट्रॅक तर अचानक संपल्यासारखा वाटतो. महिला पात्रांनाही कथेत अपेक्षित महत्त्व मिळत नाही. शाम हा सोसायटीत काम करणारा कर्मचारी आहे, तरी तो जज प्रधान यांच्यासोबत वारंवार बाहेर कसा जातो, त्याच्या नोकरीवर त्याचा परिणाम का होत नाही, यासारखे काही प्रश्नही अनुत्तरित राहतात. परशुरामने एवढी प्रचंड संपत्ती कशी कमावली, याचंही समाधानकारक स्पष्टीकरण मिळत नाही.
चित्रपटाला किमान 30 मिनिटांची कात्री लावली असती, तर त्याचा वेग आणि थरार निश्चितच वाढला असता.
जरांगे पाटलांचा मुंबईत जाण्याचा निर्धार; मागण्यांचा पाढा वाचताना अश्रू अनावर
सैफ-अक्षयची टक्कर म्हणजे चित्रपटाचा जीव
‘हैवान’मध्ये सगळ्यात जास्त भावतो तो सैफ अली खान आणि अक्षय कुमार यांच्यातील संघर्ष. सैफने दृष्टिहीन व्यक्तीची देहबोली, हालचाली आणि परिस्थितीचा अंदाज घेण्याची पद्धत प्रभावीपणे साकारली आहे. अॅक्शन सीक्वेन्समध्येही त्याचा आत्मविश्वास दिसतो. त्याच्या व्यक्तिरेखेला मिळालेला सर्वाधिक स्क्रीन टाइम तो समर्थपणे पेलतो. अक्षय कुमारची व्यक्तिरेखा तुलनेने कमी वेळासाठी पडद्यावर येते, विशेषतः पहिल्या भागात. मात्र, त्याची शांतता आणि नजरेतून व्यक्त होणारी धोकादायक वृत्ती प्रभावी ठरते. त्याचा डायलॉग डिलिव्हरी काही ठिकाणी ओव्हर-द-टॉप वाटतो, पण परशुरामच्या भूमिकेत तो वेगळा रंग दाखवतो. दोघे जेव्हा आमनेसामने येतात, तेव्हा चित्रपटाची ऊर्जा अचानक वाढते. बोमन इराणी नेहमीप्रमाणेच विश्वासार्ह. संयमी खेरची इन्स्पेक्टर वर्षा ही व्यक्तिरेखा ठीकठाक आहे, मात्र तिच्यात फारसं नावीन्य जाणवत नाही. श्रिया पिळगावकर, शरिब हाश्मी आणि राजेश शर्मा आपापल्या भूमिका चोख बजावतात. दिवंगत असरानी यांचा सिक्युरिटी गार्ड हुसेन हा छोटासा रोल मात्र लक्षात राहतो.
काही प्रसंग खिळवून ठेवतात
चित्रपट पूर्णपणे निराश करणारा नाही. शाम आणि परशुराम यांच्यातील काही प्रसंग खरोखरच उत्सुकता वाढवतात. पोलिस स्टेशनमधील शामचा प्रसंग विशेष उल्लेख करण्यासारखा आहे. हा प्रसंग उशिरा येतो, पण पडद्यावर चांगलीच दाद मिळवतो. फोन बूथचा सीक्वेन्सही अनपेक्षित वळण देतो. अशा काही प्रसंगांमुळे ‘हैवान’मध्ये दडलेली क्षमता जाणवते. मात्र, चित्रपटाचा क्लायमॅक्स हा त्याचा सर्वात मोठा कमजोर दुवा ठरतो. ज्या अंतिम लढतीतून प्रेक्षकांना नखं खाणारा थरार अपेक्षित असतो, ती लढत अपेक्षित परिणाम साधत नाही. उलट काही क्षण अनावधानाने विनोदी वाटतात.
तांत्रिक बाजू मजबूत
चित्रपटाची तांत्रिक बाजू मात्र उल्लेखनीय आहे. दिवाकर मणी यांची सिनेमॅटोग्राफी प्रभावी आहे. विशेषतः सिल्वेट शॉट्स दृश्यांना वेगळी उंची देतात. स्टंट सिल्वा आणि रवी त्यागराजन यांची अॅक्शन वास्तववादी वाटते. साबू सिरिल यांचं प्रॉडक्शन डिझाइन आणि कॉस्च्युम डिझाइनही कथेला अनुरूप आहे. रॉनी राफेल यांचा बॅकग्राउंड स्कोअर मात्र चित्रपटातील थरार वाढवण्यात अधिक यशस्वी ठरतो. त्याउलट प्रीतमचं संगीत फारसं लक्षात राहत नाही. ‘रंगियारा’, ‘मेरे हिरो है वो’ आणि लग्नाचं गाणं कथानकाच्या प्रवाहात अडथळा आणतात.
एडिटिंग हा आणखी एक कमजोर भाग. कथा अधिक घट्ट आणि वेगवान ठेवण्यासाठी चित्रपटाची लांबी कमी करणं गरजेचं होतं.
‘हैवान’कडे एक चांगली थरारक कथा आहे. सैफ अली खानचा प्रभावी अभिनय, अक्षय कुमारचा धोकादायक अंदाज, दोघांमधील काही दमदार फेस-ऑफ आणि मजबूत तांत्रिक बाजू चित्रपटाला उभं करण्याचा प्रयत्न करतात. पण विस्कळीत पटकथा, अनेक अनावश्यक उपकथानकं, कमजोर गाणी, संथ पूर्वार्ध आणि अपेक्षाभंग करणारा क्लायमॅक्स यामुळे हा प्रयत्न पूर्णपणे यशस्वी ठरत नाही.
अमित भंडारी, चित्रपट समीक्षक
हैवाना
हा चित्रपट का पाहावा ?
थरार… कलाकारांचा दमदार परफॉर्मन्स
का टाळावा ?
विस्कळीत पटकथा, अनेक अनावश्यक उपकथानकं, कमजोर गाणी, संथ पूर्वार्ध अन् अपेक्षाभंग करणारा क्लायमॅक्स
थोडक्यात काय :
प्रियदर्शन – सैफ- अक्षयच्या चाहत्यांसाठी एकदा पर्वणी; पण जबरदस्त थ्रिलरची अपेक्षा ठेवून गेलात तर निराशा होण्याची शक्यता अधिक.
रेटिंग: ⭐⭐½/5
