भारतीय सिनेसृष्टीतील दोन प्रभावशाली आणि सर्जनशील दिग्दर्शक – संजय लीला भन्साळी आणि केतन मेहता – आता एका भव्य ऐतिहासिक चित्रपटासाठी एकत्र येत आहेत. ‘जय सोमनाथ’ या चित्रपटाच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीतील अत्यंत महत्त्वाचा आणि भावनिक अध्याय मोठ्या पडद्यावर साकारला जाणार आहे.
‘जय सोमनाथ’ची कथा प्रेक्षकांना इ.स. 1025–1026 या कालखंडात घेऊन जाणार आहे. त्या वेळी गझनीच्या महमूदने गुजरातमधील सोमनाथ मंदिरावर आक्रमण करून त्याची लूट केली होती. भारतीय इतिहासातील हा प्रसंग विनाशानंतर पुन्हा उभे राहण्याच्या जिद्दीचे प्रतीक मानला जातो. विशेष म्हणजे या घटनेला यंदा 1000 वर्षे पूर्ण होत आहेत. अशा महत्त्वपूर्ण ऐतिहासिक पार्श्वभूमीवर आधारित चित्रपट प्रथमच मोठ्या पडद्यावर साकारला जात आहे.
या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे भन्साळी आणि मेहता यांची सर्जनशील भागीदारी. भव्य सेट्स, नेत्रदीपक दृश्यरचना आणि भावनिक कथनशैलीसाठी ओळखले जाणारे भन्साळी, तर ऐतिहासिक दृष्टिकोन आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेले केतन मेहता – या दोघांची सांगड ‘जय सोमनाथ’मध्ये पाहायला मिळणार आहे. दोन्ही दिग्दर्शकांचा गुजरातशी असलेला संबंध लक्षात घेता, या कथेत वास्तव आणि भावनांचा प्रभावी संगम दिसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
‘जय सोमनाथ’ची निर्मिती भन्साळी प्रोडक्शन्स आणि केतन मेहता यांच्या माया मूव्हीज या बॅनरखाली होत आहे. चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारी केतन मेहता स्वतः सांभाळणार आहेत. हा भव्य ऐतिहासिक चित्रपट 2027 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
