स्वातंत्र्य दिनाच्या खास मुहूर्तावर अभिनेता अक्षय कुमारने त्याच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. अक्षय कुमार अखेर भारताचा नागरिक झाला आहे. यापूर्वी त्याचाकडे कॅनडाचे नागरिकत्व होते. मात्र नुकतेच भारताच्या गृह मंत्रालयाने त्याला नागरिकत्वाचे प्रमाणपत्र बहाल केले आहे. त्याने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून चाहत्यांना ही माहिती दिली आहे. (Akshay Kumar has finally become a citizen of India. He previously held Canadian citizenship)
भारतात नागरिकत्व कायदा, 1955 च्या अन्वये नागरिकत्व मिळते. यात पाच तरतुदींनुसार कोणाला भारतीय नागरिकत्व मिळू शकते याबाबतचा स्पष्ट उल्लेख आढळून येतो. पहिल्या तरतुदीनुसार जन्मानं भारताचं नागरिकत्व मिळतं. दुसऱ्या तरतुदीअन्वये वंश किंवा रक्त संबंधांवर नागरिकत्व मिळतं. म्हणजेच आई-वडिलांपैकी कोणीही एक व्यक्ती भारताचे नागरिक असणं आवश्यक आहे.
तिसऱ्या तरतुदीनुसार, नोंदणीद्वारे जगभरातील कोणत्याही देशाच्या व्यक्तीला काही अटी आणि शर्तींसह नागरिकत्व देण्यात येते. तर चौथ्या तरतुदीमध्ये नवीन भूभाग भारतात सामील झाल्यास तिथल्या लोकांना भारताचे नागरिकत्व बहाल केले जाते. पाचव्या तरतुदीनुसार, भारतात राहणाऱ्या इतर देशाचे नागरिक असलेल्या व्यक्तीला भारतीय नागरिकत्व मिळते. मात्र त्यासाठी तिसऱ्या तरतुदीमधील अटी आणि शर्तींची पूर्तता करावी लागते.
अक्षय कुमारला यातील तिसऱ्या आणि पाचव्या तरतुदीनुसार म्हणजे, कलम 5 (1) (जी) अंतर्गत भारतीय नागरिकत्व बहाल करण्यात आले आहे. तिसऱ्या तरतुदीमध्ये भारतीय नागरिक होण्यासाठी अटी शर्ती टाकण्यात आल्या आहेत.
1. नागरिकत्वासाठी अर्ज करण्यापूर्वी किमान सात वर्षं भारतात राहिलेली भारतीय वंशाची व्यक्ती.
2. पाकिस्तान आणि बांगलादेश सोडून जगभरातील इतर देशाची नागरिक असणारी आणि त्या देशाचे नागरिकत्व सोडून भारताचे नागरिक होण्याची इच्छा असणारी.
3. भारतीय व्यक्तीशी विवाह झालेली आणि नागरिकत्वासाठी अर्ज करण्यापूर्वी किमान सात वर्ष भरतात वास्वव्य केलेली.
4. राष्ट्रकुल सदस्य देशांचे भारतात राहाणारे नागरिक
परदेशातील भारतीयांना नागरिकत्व मिळवण्यासाठी काही महत्त्वाची कागदपत्रे द्यावी लागतात. यात वैध परदेशी पासपोर्ट आणि कलम 7A अंतर्गत भारताचे परदेशी नागरिक म्हणून नोंदणी प्रमाणपत्राची प्रत आहे.
2003 मध्ये नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर करून, देशाच्या संसदेने परदेशात स्थायिक झालेल्या भारतीय वंशाच्या लोकांना भारताचे नागरिकत्व देण्याची तरतूद केली आहे. त्याला ओव्हरसीज सिटीझनशिप ऑफ इंडिया असे नाव देण्यात आले आहे.
यानुसार, भारतीय वंशाची कोणतीही व्यक्ती जी संविधान लागू झाल्यानंतर भारताचा नागरिक आहे आणि ज्याने पाकिस्तान आणि बांगलादेश व्यतिरिक्त इतर देशाचे नागरिकत्व घेतले आहे. जर त्याच्या देशात दुहेरी नागरिकत्वाची तरतूद असेल तर, तो नागरिकत्व कायदा, 1955 अंतर्गत नोंदणी करू शकतो.
नोंदणीनंतर, जर एखादी व्यक्ती पाच वर्षांपैकी एक वर्ष भारतात राहिली तर त्याला भारताचे नागरिकत्व मिळू शकते. सध्या अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, फ्रान्स, ऑस्ट्रेलियासह 16 देशांमध्ये स्थायिक झालेल्या भारतीय वंशाच्या लोकांना दुहेरी नागरिकत्व दिले जाऊ शकते. कारण, या देशांचे नागरिक दुहेरी नागरिकत्व घेऊ शकतात.
2019 मध्ये अक्षय कुमारने कॅनेडियन नागरिकत्व रद्द करुन भारतीय नागरिकत्व परत मिळवण्याची प्रक्रिया सुरू केली होती. या वर्षी फेब्रुवारीमध्ये एका मुलाखतीदरम्यान, नागरिकत्वाबद्दल बोलताना अक्षय कुमार म्हणाला होता की, भारतच त्याच्यासाठी सर्वस्व आहे. मी जे काही साध्य केले आहे ते इथूनच केले आहे. देशासाठी काही करण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य आहे.
एका वेळी माझे १५ हून अधिक चित्रपट फ्लॉप झाले होते, यामुळेच मला कॅनडाचे नागरिकत्व घ्यावे लागले. तो म्हणाला, ‘मला वाटले की माझे चित्रपट चालत नाहीत आणि मला काही तरी करायचे आहे. मी तिथे कामासाठी गेलो होतो. माझा मित्र कॅनडामध्ये होता आणि तो म्हणाला इकडे ये. त्यानंतर मी अर्ज केला आणि नागरिकत्व मिळाले. त्यापूर्वीच माझे फक्त दोन चित्रपट रिलीज व्हायचे होते. सुदैवाने दोन्ही सुपरहिट झाले.
त्यानंतर माझा मित्र म्हणाला परत जा आणि पुन्हा कामाला लाग. त्यानंतर मला काम मिळू लागले. नंतरच्या काळात माझ्याकडे कॅनेडियन पासपोर्ट आहे हे मी विसरलो होतो. हा पासपोर्ट बदलून घेण्याचा विचार कधीच आला नव्हता, असेही त्याने मान्य केले होते.