Hrithik Roshan : ‘सपने व्हर्सेस एव्हरीवन 2’मधील दमदार अभिनयामुळे प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारा अभिनेता परमवीर सिंह चीमा पुन्हा चर्चेत आला आहे. ओटीटी शो ‘स्टॉर्म’मधील त्याच्या छोट्याशा भूमिकेने थेट अभिनेता हृतिक रोशनला प्रभावित केलं आहे. हृतिक रोशन आणि ईशान रोशन यांच्या HRX Films या निर्मिती संस्थेअंतर्गत तयार झालेल्या आणि अजितपाल सिंह यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘स्टॉर्म’मध्ये परमवीर पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसला. त्याचा अभिनय पाहिल्यानंतर हृतिकने स्वतः त्याच्याशी संपर्क साधून कौतुक केलं. या अनपेक्षित प्रतिक्रियेमुळे परमवीरच्या अभिनयाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
हृतिक रोशनने परमवीरला पाठवलेल्या व्हॉइस नोटमध्ये त्याच्या अभिनयाचं विशेष कौतुक केलं. या शोमधील इतर कलाकारांना आपण अद्याप अशा प्रकारे फोन केलेला नसल्याचं सांगत, परमवीरच्या डोळ्यांतील भाव आणि चेहऱ्यावरील हावभावांनी आपल्याला प्रभावित केल्याचं हृतिकने म्हटलं. त्याच्या अभिनयामुळे व्यक्तिरेखेच्या मनातील भावना आणि विचार समजून घेणं अधिक प्रभावी ठरल्याचंही त्याने सांगितलं. परमवीरचं काम अतिशय ताकदीचं आणि मनाला भिडणारं असल्याचं नमूद करत, ‘स्टॉर्म’चा भाग होण्यासाठी त्याने होकार दिल्याबद्दल हृतिकने आभार मानले.
कापूसकोंडा : श्वानप्रेमाची अनोखी गाथा
हृतिकचं कौतुक इथेच थांबलं नाही. पुढील संदेशात त्याने परमवीरची प्रत्यक्ष भेट घेऊन त्याच्या कामाचं कौतुक करायला आवडेल, असं सांगितलं. ‘तू किती अप्रतिम अभिनेता आहेस, मी तुझा चाहता आहे,’ अशा शब्दांत हृतिकने आपल्या भावना व्यक्त केल्या. बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्याकडून मिळालेली ही दाद परमवीरसाठी महत्त्वाची मानली जात आहे. ‘सपने व्हर्सेस एव्हरीवन 2’मधील यशानंतर ‘स्टॉर्म’मधील त्याच्या भूमिकेनेही लक्ष वेधलं आहे. भूमिका छोटी असली तरी अभिनयातून प्रेक्षकांवर आणि सहकलाकारांवर प्रभाव टाकण्याची क्षमता परमवीरने दाखवून दिली आहे.
परमवीरच्या पुढील कारकिर्दीबाबतही उत्सुकता वाढू लागली आहे. त्याच्या आगामी प्रोजेक्ट्सबाबत चर्चा सुरू असून, त्याला प्रमुख भूमिकांसाठी विचारात घेतलं जात असल्याचं वृत्त आहे. ‘स्टॉर्म’मधील कामाला मिळालेल्या प्रतिसादामुळे त्याच्या अभिनयप्रवासाला नवी दिशा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, त्याच्या पुढील प्रोजेक्ट्सबाबत अद्याप ठोस माहिती समोर आलेली नाही. हृतिक रोशनसारख्या अभिनेत्याने केलेलं कौतुक आणि अलीकडील कामगिरी यामुळे परमवीर सिंह चीमा पुढे कोणत्या भूमिकेत दिसणार, याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.
