IFFI Bazaar : देशविदेशातील चित्रपटकर्मी, भारतीय प्रादेशिक चित्रपट आणि कलाकार, तंत्रज्ञ अशा मान्यवरांच्या उपस्थितीने 56 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गजबजून निघाला आहे. या महोत्सवात सगळ्यांचे लक्ष वेधून घेणाऱ्या वेव्हज फिल्म बाजार विभागात शनिवारी दादासाहेब फाळके चित्रनगरीने उभारलेल्या आकर्षक स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले.
महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांनी या स्टॉलचे उद्घाटन केले. मराठी चित्रपटांबरोबरच हिंदी चित्रपट, मालिका आणि विविध माध्यमांसाठी चित्रिकरणाच्या सोयीसुविधांबरोबरच चित्रपट उद्योगाच्या विकासाच्या दृष्टीने कार्यरत असलेल्या महामंडळाच्या योजना, त्यांचे उपक्रम या महोत्सवात उपस्थित असलेल्या जगभरातील चित्रपटकर्मींपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या स्टॉलच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ गेली काही वर्ष सातत्याने कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासह देशातील आणि देशाबाहेरील निवडक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभागी होते आहे. या महोत्सवांमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या फिल्म बाजारमध्ये महामंडळाने आपले ठळक अस्तित्व नोंदवले असून मराठी चित्रपटांना या बाजार विभागात व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा, विविध चित्रपट निर्माते, निर्मितीसंस्था यांच्याबरोबर संवाद साधण्यास मदत करण्याचा प्रयत्न केला आहे.
गोव्यात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या बाजार विभागातही दरवर्षी चांगल्या मराठी चित्रपटांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी महामंडळ प्रयत्नशील असते. यंदा या महोत्सवातील सहभागाचे महामंडळाचे 10 वे वर्ष आहे. फिल्म बाजारमध्ये महामंडळाचा आकर्षक स्टॉल उभारत चित्रपट उद्योग विस्ताराच्या दृष्टीने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. 21 ते 24 नोव्हेंबर या दरम्यान बाजार विभागात हा स्टॉल पाहता येणार असून महामंडळातर्फे राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती स्टॉलच्या माध्यमातून देण्यात येत आहे.
पहिल्याच दिवशी या स्टॉलला विविध आंतरराष्ट्रीय प्रेक्षक, चित्रपटकर्मींनी मोठ्या संख्येने भेट दिली. या स्टॉलच्या उद्घाटनानंतर महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांनी येथे उपस्थित असलेल्या माध्यमकर्मी आणि चित्रपटकर्मींबरोबरही खास संवाद साधला. महामंडळ चित्रकर्मींसाठी विविध योजना राबवत असते.
व्यवसायात मिळणार यश अन्…, जाणून घ्या मेषपासून मीनपर्यंत आजचा दिवस कसा राहणार?
या महोत्सवात त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधता यावा, याकरिता संवाद सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या सत्रात विविध भाषिक माध्यमकर्मी व चित्रकर्मीनी सहभाग घेतला.
