Download App

एका मखमली प्रेमकथेची अखेर! कवयित्री अमृता प्रीतमच्या निस्वार्थ ‘इमरोज’चं निधन

कभी-कभी
खूबसूरत खयाल
खूबसूरत बदन भी
अख़्तियार कर लेते हैं।

असे म्हणत आपल्या निस्वार्थ प्रेमाने प्रेयसी अमृता प्रीतमला साद घालणाऱ्या इमरोजचे निधन झाले. ते 97 वर्षांचे होते. प्रसिद्ध लेखिका आणि कवयित्री अमृता प्रीतम (Amrita Pritam) यांच्या निस्वार्थ प्रेमकथेतील नायक, प्रसिद्ध चित्रकार आणि कवी म्हणून इमरोज (Imroj) यांना ओळखले जात होते. मुंबईतील कांदिवली येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने साहित्य जगतावर शोककळा पसरली आहे. (Imroj, the hero of poet Amrita Pritam’s love story died of old age)

इमरोज यांचे खरे नाव इंद्रजीत सिंग होते. ते आणि अमृता जवळपास 40 वर्षे एकत्र होते. अमृता प्रीतम त्यांना ‘जीत’ म्हणून संबोधायच्या. इंद्रजीत सिंग यांना इमरोज हे नावही त्यांनीच दिले होते. ‘अमृता के लिए नझम जरी है’ हे इमरोज यांनी अमृता प्रीतम यांच्यासाठी कवितेचे पुस्तकही लिहिले होते. द हिंद पॉकेट बुक्सने 2008 साली हे पुस्तक प्रकाशित केले होते.

अमृता प्रीतम आणि इमरोज यांच्या प्रेमाने या जगाला अनेक सुरस प्रेमकथा दिल्या. प्रेमाच्या नव्या व्याख्या तयार झाल्या. इमरोज हे अमृता यांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. ते इतके की अमृता यांच्या निधनाला 18 वर्ष उलटल्यानंतरही त्यांना आजपर्यंत अमृता या जगात नाही, या गोष्टीवर विश्वास बसला नव्हता. इमरोज नित्यनियमाने अमृताबद्दल म्हणायचे – ‘‘वो यही है, घर पर ही है, कहीं नहीं गई’.

इमरोज यांच्या शेवटच्या काळात त्यांच्यासोबत राहिलेल्या मित्रांनी सांगितले की, “त्यांची प्रकृती काही दिवसांपासून खालावली होती आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना नळीतून जेवण दिले जात आहे. एवढी गंभीर स्थिती असतानाही इमरोज अमृता यांना एक क्षणही विसरु शकले नव्हते.”

मखमली प्रेमकथेची अखेर :

अमृता त्यांच्या ‘नागमानी’ या कवितासंग्रहाच्या मुखपृष्ठ डिझाइनसाठी कलाकाराच्या शोधात होत्या. या शोधात असतानाच 1957 मध्ये त्यांची इंद्रजित यांच्याशी भेट झाली. या भेटीचे रुपांतर आधी मैत्रीत आणि मग प्रेमात झाले. मात्र अमृता प्रीतम यांचे कवी साहिर लुधियानवी यांच्यावर प्रेम होते. पण या प्रेमाचा आदर दोघांनीही राखला. प्रेमाचा मान, सन्माम म्हणजे काय याचा या दोघांनीही आदर्श जागापुढे ठेवला होता. आज याच मखमली प्रेमकथेची अखेर झाली आहे.

Tags

follow us