आज हनुमान जयंतीच्या निमित्ताने ‘आदिपुरुष’ (Adipurush) या चित्रपटाचं नवा पोस्टर लुक प्रदर्शित झाला आहे. रामायणावर आधारित हा एक पौराणिक चित्रपट आहे. बाहुबली स्टार – दाक्षिणात्य अभिनेता प्रभासच्या या चित्रपटाची प्रेक्षकांना मोठी उत्सुकता लागलेली आहे. ओम राऊत दिग्दर्शित हा चित्रपट येत्या 16 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे (Devdutt Nage) याने देखील या बहुचर्चि चित्रपटात हनुमानाची भूमिका साकारली आहे.
मराठी प्रेक्षकांना देवदत्त नागे हे नाव आता नवं नाही. अनेक मराठी मालिकांत देवदत्न याने काम करून प्रेक्षकांची पसंती मिळवलेली आहे. दरम्यान, आता हनुमान जयंतीच्या निमित्ताने आदिपुरुष या चित्रपटातील देवदत्त साकारत असलेल्या हनुमानाच्या लुकमधील पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहेत. ज्यात देवदत्तचा हनुमान रुपातील लुक अचंबित करणारा आहे. देवदत्तला या लुकमध्ये ओळखणं ही कठीण जात आहे. देवदत्तने आजवर मराठी मनोरंजन विश्वात अतिशय उत्तम काम केलं आहे. जय मल्हार या मालिकेत त्याने देवा खंडोबाची भूमिका साकारली होती. या भूमिकेतील त्याचं काम प्रचंड लोकप्रिय ठरलं होतं. मात्र आदिपुरुष या चित्रपटातील त्याने साकारलेली हनुमानाची भूमिका पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या चित्रपटासाठी देवदत्तने खास तयारी केली आहे. शिवाय शरीरयष्ठी आणि फिटनेसवरही त्याने काम केलं आहे. देवदत्त त्याच्या फिटनेस आणि पिळदार शरीयष्ठीसाठी देखील तितकाच ओळखला जातो. तेव्हा या भूमिकेसाठी त्याने केलेली तयारी आणि फिटनेस नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरवरूनही पाहायला मिळत आहे.
Gunaratna Sadaverte : खोड काही जाईना! सनद रद्द होऊनही सदावर्ते जैसे थेच
ओम राऊतच्याच ‘तान्हाजी’ या बॉलीवुड चित्रपटातही देवदत्तने सुर्याजी मालुसरेंची भूमिका साकारली होती. देवदत्तची अभिनय क्षेत्रातील सुरुवात मालिका विश्वातूनच झाली होती. कलर्स टीव्हीवरील ‘वीर शिवाजी’ मालिकेत त्याने तान्हाजी मालुसरेंची भूमिका साकारली होती. शिवाय ‘लागी तुझसे लगन’ या हिंदी मालिकेतही तो झळकला होता. ‘देवयानी’ या प्रसिद्ध मराठी मालिकेत त्याने सम्राटराव हे पात्र साकारलं होतं. याशिवाय ‘मृत्यूंजय’, ‘कालाय तस्मेय नम:’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘डॉक्टर डॉन’ या मालिकांमध्येही तो झळकला आहे. 2014 मध्ये ‘संघर्ष’ या चित्रपटातून त्याने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. ‘वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई दोबारा’, ‘सत्यमेव जयते’ या सारख्या बॉलीवुड चित्रपटातही देवदत्तने भूमिका साकारल्या आहेत.
आता ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष चित्रपटातही देवदत्त प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याची भूमिका लक्षात राहिल अशीच आशा चाहत्यांना आहे. आदिपुरुष या चित्रपटात देवदत्त नागे हनुमानाची भूमिका साकारत असल्याने प्रेक्षकांची आणि त्याच्या चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. आदिपुरुषच्या टिझरमध्येही त्याचा लुक पाहायला मिळाला होता. मात्र टिझर प्रदर्शनानंतर हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यातही अडकला होता. हिंदूच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला होता. या चित्रपटात अभिनेत प्रभास हा रामाची तर अभिनेता सनी सिंह लक्ष्मणाच्या, क्रिती सनॉन सीता, सैफ अली खान रावण तर देवदत्त नागे हनुमानाची भूमिका साकारत आहे.