कापूसकोंडा : श्वानप्रेमाची अनोखी गाथा

Kapuskonda: माणूस आणि प्राणी यांच्यातील नात्याच्या माध्यमातून कौटुंबिक भावविश्व उलगडण्याचा प्रयत्न करणारी भावनिक, हृदयस्पर्शी गोष्ट आहे..

Kapuskonda

Kapuskonda

Kapuskonda Review : एखाद्या गोष्टीचा तिटकारा येत असेल…भीती वाटत असेल वा तरी नकोशी असेल आणि अपरिहार्यतेमुळे कालांतराने तीच गोष्ट आवडू लागते आणि जगण्याचा अविभाज्य घटक बनते… असं कधी तुमच्या बाबतीत झालंय का एखाद्या व्यक्तीबाबत किंवा प्राण्याबाबत… अशीच गोष्ट मांडण्याचा प्रयत्न सचिन मोहिते या लेखक दिग्दर्शकाने केलेला आहे.

कुत्र्यांबाबत तितकाराने भीती असलेल्या हमीदभाईंच्या आयुष्यात होणारा आमुलाग्र बदल… हा सिनेमाचा गाभा असला तरीही त्या भोवती विणलेली नाती, भावनांचे पदर … तितकारा, भीती ते आपुलकी, प्रेम जिव्हाळा वाटेपर्यंतचा हा प्रवास ज्या टप्प्याने होतो ती आहे खरी कापूसकोंड्याची गोष्ट…सत्यघटनेपासून प्रेरित असलेली ही कथा कौटुंबिक मनोरंजनासोबतच नात्यांकडे बघण्याचा एक नवा दृष्टिकोन देते.

नेमकी काय आहे कथा?

हमीद भाई (सचिन पिळगांवकर) हे निवृत्त पोस्ट कर्मचारी आहेत. कुत्र्याची भीती वाटणाऱ्या हमीद भाई यांच्या आयुष्यात एका कुत्र्याचा प्रवेश होतो आणि या नव्या पाहुण्याचे आगमन आनंदासोबत अनेक प्रश्न घेऊन येते…त्यानंतर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यासह कौटुंबिक समीकरणांमध्येही बदल घडू लागतात…हमीद भाई, नुसरत (मधुराणी गोखले), हिना (अक्षता पाडगांवकर) आणि शोना (जान्हवी तांबट) यांच्या चौकोनी कुटुंबाला लाभलेला पाचवा कोन हा त्यांच्या आयुष्याची भूमिती आणि समीकरणे सारं काही बदलून टाकतो…

ही गोष्ट छोटी तितकीच निरागस आणि भाबडी आहे… हमीद भाईंच्या आयुष्यात असलेला चार्ली चॅप्लीन एक बहारदार प्रकरण आहे. मूकपट आणि मुका प्राणी यामधील नेमकं रूपक टिपण्याचा दिग्दर्शकांनी केलेला प्रयत्न हा वाखाणण्याजोग आहे… जगण्याला मारी दुःखाची आणि कारुण्याची किनार अन् त्याला असलेली प्रेमाची झालर यामुळे या गोष्टीचा जीव छोटा असला तरी छोट्या जीवाची ही रंजक कहाणी आहे. या घडामोडींतून स्वभावाचे अनेक पैलू उलगडतात… तसेच नात्यांमधील अपेक्षा आणि प्रेमाची खरी कसोटी अधोरेखित होते.

चित्रपटाची सर्वांत महत्त्वाची बाजू म्हणजे सचिन पिळगांवकर यांची मध्यवर्ती भूमिका. हमीद भाई यांच्या स्वभावातील चिडचिड, भीती आणि हळूहळू बदलणारी भावनिक अवस्था त्यांनी सहजतेनं साकारली आहे. त्यांच्या देहबोलीतूनही या व्यक्तिरेखेतील बदल जाणवतात. त्यांच्या आयुष्यातला चार्ली हा ज्या पद्धतीने आपल्यासमोर साकारला जातो… त्याला एक भावनिक किनार आहे… सचिन पिळगावकरांसारख्या अनुभवी कसलेल्या अभिनेत्यांनी दाखवलेले भावनांचे निरनिराळे आविष्कार हे या सिनेमाची शक्तीस्थान आहे.

मधुराणी गोखले यांनी नुसरतची भूमिका समर्थपणे निभावली आहे. अक्षता पाडगांवकर आणि जान्हवी तांबट यांनीही आपापल्या व्यक्तिरेखांना साजेसा अभिनय केला आहे. इतर कलाकारांची साथ कथेला पूरक ठरते. विशेष म्हणजे, चित्रपटातील कुत्र्याची उपस्थिती ही केवळ मनोरंजनापुरती मर्यादित राहत नाही; कथानकाच्या भावनिक प्रवासात तो महत्त्वाची भूमिका बजावतो.

दिग्दर्शन आणि तांत्रिक बाजू
लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळणाऱ्या सचिन मोहिते यांनी कौटुंबिक नाट्य, विनोद आणि भावनिक प्रसंग यांची सांगड घालण्याचा प्रयत्न उत्तम केला आहे. काही ठिकाणी कथानक अपेक्षित वर्ण घेत त्यावेळी थोडासा हिरमोड होतो. काही प्रसंगांमध्ये विनोद… नाट्यमयता आणि भावनिक संघर्ष यामध्ये समतोल अधिक प्रभावीपणे सांधला जाणं अपेक्षित होतं. सचिन मोहितेचा हा मराठीतील पहिला प्रयत्न असला तरी निश्चितच तो वाखाणण्याजोगा आहे. हिंदीतील टेलिव्हिजन आणि ओटीटी यामध्ये महत्त्वाचे योगदान देणाऱ्या सचिन मोहितेला मराठी सिनेमा करावासा वाटणं, ही जमेची बाजू आहे. त्याने या प्रयत्नांतून अधिक अपेक्षा उंचावल्या आहेत… संगीतकार ए वी प्रफुल्लचंद्र हा पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत संगीता इतकाच प्रभावी भासला आहे.

सचिन पाटेकर यांचं छायांकन चित्रपटाच्या जमेच्या बाजूंपैकी एक आहे. सिनेमातील रंगसंगतीचे राखलेले भान, छाया प्रकाशाचा खेळ आणि शूटिंग पॅटर्न निश्चितच प्रभावी आहे. लातूर जिल्ह्यातील ग्रामीण परिसरामुळे कथेला स्थानिक वातावरणाचा स्पर्श मिळतो. अफजल शेख यांचं संकलन आणि ए. वी. प्रफुल्लचंद्र यांचं संगीत गोष्ट प्रवाही राखण्यात यशस्वी झालं आहे… थोडीशी जाागा दे… या काळातील चाल आणि आर्जवी सूर राखण्यात ए व्ही प्रफुल्लचंद्र यशस्वी झाला आहे. एकूणच, तांत्रिक बाजू समाधानकारक असली, तरी अधिक घट्ट पटकथा चित्रपटाला वेगळ्या उंचीवर घेऊन जाऊ शकली असती, ही बाब नाकारता येत नाही. माणूस आणि प्राणी यांच्यातील नात्याच्या माध्यमातून कौटुंबिक भावविश्व उलगडण्याचा प्रयत्न करणारी भावनिक, हृदयस्पर्शी गोष्ट आहे..


रेटिंग: 3.5/5
अमित भंडारी, चित्रपट समीक्षक

चित्रपट का पाहावा?
प्रेम, स्वीकार, अपेक्षा आणि नात्यांमधील संघर्ष यांवर विचार करायला लावणारी हृदयस्पर्शी कथा

चित्रपट का टाळावा ?
संकल्पना प्रभावी असली तरीही विनोद… नाट्यमयता आणि भावनिक संघर्ष यामधील असमतोल

थोडक्यात काय ?
भावस्पर्शी विषय, सचिन पिळगांवकर यांचा दमदार अभिनय असलेली श्वान प्रेमाची ही अनोखी गाथा.

चित्रपट: कापूसकोंडा
निर्मिती: जास्वंद एंटरटेनमेंट्स, पॅनोरमा स्टुडिओज
लेखन व दिग्दर्शन: सचिन मोहिते
पटकथा व संवाद: सचिन मोहिते, गणेश पंडित, ऋषिकेश तुरई
कलाकार: सचिन पिळगांवकर, मधुराणी गोखले, अक्षता पाडगांवकर, जान्हवी तांबट, भूषण पाटील
छायांकन: सचिन पाटेकर
संकलन: अफजल शेख
संगीत: ए. वी. प्रफुल्लचंद्र

Exit mobile version