Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam Film Review : मराठी शाळामधील पटसंख्या रोडावत चालल्याने त्या जागांवर इंटरनॅशनल स्कूल उभारण्याच्या शिक्षण सम्राटांच्या व्यापारी वृत्तीवर एक्स-रे टाकणारा क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम हा सिनेमा आहे. मराठी भाषा ‘अभिजात’ झाल्याचा अभिमान आज महाराष्ट्रभर मिरवला जातो. मात्र त्याच वेळी राज्यातील मराठी माध्यमाच्या शाळा एकामागोमाग एक बंद पडत आहेत. राज्यकर्त्यांचा या गोष्टीकडे किंवा शिक्षण सम्राटांची केलेली हात मिळवणे या गोष्टीवर हा सिनेमा परखडपणे भाष्य करतो.
मराठी मनाला अस्वस्थ करणाऱ्या या वास्तवावर थेट प्रश्न विचारणारा आणि प्रेक्षकाला अंतर्मुख करणारा सिनेमा म्हणजे ‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’. लेखक-दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी हा सिनेमा केवळ मनोरंजनापुरता मर्यादित राहत नाही तो आजच्या शैक्षणिक व्यवस्थेचा बुरखा फाडतो. ( Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam Film Review by Amit Bhandari)
मराठी शाळांवर चाललेला बुलडोझर –सिनेमाचा केंद्रबिंदू
“शिक्षण बाजारू झालं आहे”, “मराठी शाळांवर चाललेला बुलडोझर थांबणार कधी?”, “मराठी भाषा अभिजात झाली; पण मराठी शाळा अभिजात कधी होणार?” हे संवाद सिनेमातील असले तरी ते आजच्या महाराष्ट्राच्या मराठी भाषिक शिक्षण पद्धतीवर केलेली थेट टिप्पणी आहे.
सिनेमाची कथा अलिबागजवळील नागांवमधील ९० वर्षे जुन्या मराठी माध्यमाच्या क्रांतिज्योती विद्यालय या मराठी माध्यमाच्या शाळेभोवती फिरते. ही शाळा पाडून तिथे ‘इंटरनॅशनल स्कूल’ उभारण्याचा निर्णय घेतला जातो.
वानगी दाखल ही मराठी माध्यमाची सिनेमातील शाळा असली तरी राज्यातील भागांमध्ये प्रामुख्याने मेट्रो सिटीज, उपनगर आणि नव्याने मेट्रो आणि स्मार्ट सिटीज होऊ पाळणाऱ्या राज्यातील अनेक भागातील भयाण वास्तव आहे. त्यामुळे व्यथा सामूहिक असली तरी याबद्दल कोणीच बोलायला तयार होत नाही आणि त्यामुळेच या सिनेमाचे महत्त्व वेगळे आहे आणि हेमंत ढोमे याचे कौतुक करायला पाहिजे.
संवादातून घडणारा संघर्ष…
हेमंत ढोमे यांची पटकथा संघर्ष आरडाओरडीतून नाही, तर सुसंवादातून उभी राहते. प्रशासन, राज्य सरकार, पालक आणि समाज…सगळेच एकमेकांकडे बोट दाखवत असताना “मराठी शाळा संपणार की पुन्हा भरणार?” हा प्रश्न प्रेक्षकाच्या मनात ठसतो. कारण या प्रश्नाचं उत्तर केवळ सरकारकडे नाही, तर आपल्या प्रत्येकाच्या निवडींमध्ये आहे.
मराठीतून शिक्षण घेतलेली पिढी किती सक्षम, बुद्धिमान आणि विविध क्षेत्रांत यशस्वी होऊ शकते, हे लेखकाने व्यक्तिरेखांच्या माध्यमातून प्रभावीपणे दाखवून दिलं आहे.
लेखन आणि संवाद – सिनेमाचं खऱ्या अर्थानं बळ
लेखन, पटकथा आणि संवाद हे ‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’चं सर्वात मोठं सामर्थ्य आहे. संवाद कुठेही कृत्रिम वाटत नाहीत. मराठी भाषा, बोलीभाषा आणि पोटभाषांचा सन्मान राखत केलेलं लेखन सिनेमाला प्रामाणिकपणा देतं.
‘पोस्टर गर्ल’, ‘बघतोस काय मुजरा कर’, ‘झिम्मा’ आणि ‘फसक्लास दाभाडे’नंतर हेमंत ढोमे यांची ही लेखणी अधिक धारदार, थेट आणि मुद्देसूद झाल्याचं जाणवतं. ते प्रश्न मांडतात, व्यवस्था उघडी पाडतात आणि उपदेश न करता विचार करायला भाग पाडतात.
अभिनय : विचारांना ठामपणे साकारणारे कलावंत
सिनेमातील कलाकार आपापल्या भूमिकांमध्ये ठाम उभे राहतात. अमेय वाघचा बबन – आगरी बोलीत बोलणारा प्रामाणिक कंत्राटदार – मराठीच्या पोटभाषांचं महत्त्व अधोरेखित करतो. खट्याळ अन लक्षवेधी पण जग्गू ज्युलिएटमधल्या जग्गू पेक्षा वेगळा नाही. सिद्धार्थ चांदेकर कुलदीप नागांवकरच्या भूमिकेत प्रसिद्धीच्या झगमगाटापलीकडे जाऊन मूळ ओळख शोधण्याचा प्रयत्न करताना अधिक प्रामाणिक प्रयत्न करताना दिसतो…
प्राजक्ता कोळी संशोधक अंजली म्हणून शांत, विचारशील आणि समाजाशी जोडलेला आवाज बनते. प्राजक्ता अधिक प्रभावी ठरू शकली असती, पण इमोशनल सीन्समध्ये between the lines मिस होऊन जातात. क्षिती जोग केंद्र सरकारी अधिकारी सलमा हसीना अंतुलेच्या भूमिकेत जबाबदारी आणि मनातील भावनिक द्वंद्व यामधील समतोल साधताना यशस्वी ठरते.
हरीश दुधाडे वकील-शेतकरी राकेशच्या भूमिकेत जमिनीशी जोडलेली मूल्यं ठामपणे मांडतो. कादंबरी कदम आणि पुष्कराज चिरपुटकर परदेशात स्थायिक असूनही आपल्या शाळेशी असलेली नाळ प्रभावीपणे दाखवतात. या सगळ्यांच्या केंद्रस्थानी आहेत सचिन खेडेकर. मुख्याध्यापक दिनकर शिर्के यांच्या भूमिकेत त्यांचा संयमित, भारदस्त अभिनय सिनेमाची ‘क्रांतिज्योती’ तेजाळून ठेवतो. निर्मिती सावंत नार्वेकर बाई म्हणून नेहमीप्रमाणे सहजसुंदर वाटतात.
तांत्रिक बाजू: वास्तवदर्शी आणि संयमित
हर्ष-विजय यांचं संगीत आणि ईश्वर अंधारे यांचं गीतलेखन कथेला पूरक आहे. पार्श्वसंगीत अतिरेकी होत नाही. सत्यजीत शोभा श्रीराम यांचं छायांकन वास्तवाशी प्रामाणिक आहे. शाळेचे वर्ग, मैदान आणि परिसर आपलेसे वाटतात. भावेश तोडणकर यांचं संकलन विषयाच्या गांभीर्याला धरून संतुलित आहे.
का बघावा ?
‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ हा सिनेमा मराठी सिनेमांच्या सामाजिक परंपरेत महत्त्वाची भर घालतो. तो केवळ मनोरंजन करत नाही, तर थेट प्रश्न विचारतो, अस्वस्थ करतो आणि आत्मपरीक्षण करायला भाग पाडतो.
का टाळावा ?
काही ठिकाणी संदेश सूचकतेपेक्षा स्पष्टता जास्त करताना काही ठिकाणी बटबटीत होतो.
थोडक्यात काय ?
थिएटरमधून बाहेर पडताना सिनेमा संपत नाही—तो मनात सुरू राहतो. आपण कोणत्या शाळेत शिकलो? त्या शाळेनं आपल्याला काय दिलं? आणि आज आपण मराठी माध्यमाच्या शाळांसाठी नेमकं काय करतोय? हा प्रश्न विचारायला लावणं, हेच या सिनेमाचं सर्वात मोठं यश आहे.
मी या चित्रपटाला देतोय साडेतीन स्टार
अमित भंडारी, सीईओ-डिजिटल, सोहम ग्रुप
नाव : क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम
लेखक – दिग्दर्शक: हेमंत ढोमे
निर्माती : क्षिती जोग
कलाकार : सचिन खेडेकर, अमेय वाघ, प्राजक्ता कोळी, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, कादंबरी कदम, पुष्कराज चिरपुटकर, हरिश दुधाडे
सिनेमॅटोग्राफर : सत्यजीत शोभा श्रीराम
संकलन : भावेश तोडणकर
