Shubh Mangalam Jodi Dangalam : कधीकाळी छोट्या पडद्यावर आपल्या सहजसुंदर केमिस्ट्रीने प्रेक्षकांची मनं जिंकणारी ललित प्रभाकर आणि प्राजक्ता माळी ही जोडी आता एका नव्या प्रेमकहाणीसह मोठ्या पडद्यावर लवकरच झळकणार आहे. ‘जुळून येती रेशीमगाठी’नंतर तब्बल १३ वर्षांनी ही जोडी पुन्हा एकत्र दिसणार असून ‘शुभ मंगलम जोडी दंगलम’ या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांच्या चाहत्यांना एक खास भेट मिळणार आहे. नुकतीच या चित्रपटाची सोशल मीडियावर घोषणा करण्यात आली असून या चित्रपटाची पहिलीच झलक या कथेबद्दल कुतूहल निर्माण करत आहे.
ललित आणि प्राजक्ता यांना एकत्र पाहाण्याची इच्छा त्यांच्या चाहत्यांकडून अनेकदा व्यक्त झाली होती. त्यामुळे इतक्या वर्षांनंतर त्यांची झालेली ही ऑनस्क्रीन भेट निश्चितच खास ठरणार आहे. विशेष म्हणजे ‘शुभ मंगलम जोडी दंगलम’चा फर्स्ट लूक पाहिल्यानंतर ही जोडी यावेळी नेमकी कोणती प्रेमकहाणी घेऊन येतेय, याची उत्सुकता अधिकच वाढली आहे.
ज्युबिलंट फिल्म्स स्टुडिओ निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रतीक पाटील करत आहेत. ललित प्रभाकर, प्रतीक पाटील आणि इरावती कर्णिक यांनी पटकथा लिहिली असून, संवाद इरावती कर्णिक यांचे आहेत. नितीन प्रकाश वैद्य आणि अश्विनी ब्रह्मनाथकर या चित्रपटाचे निर्माते आहेत.
चित्रपटाबद्दल दिग्दर्शक प्रतीक पाटील म्हणतात, ‘’ललित आणि प्राजक्ता यांची जोडी प्रेक्षकांच्या मनात आधीपासूनच आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा एकत्र आणताना त्या जुन्या ओळखीपलीकडे जाऊन त्यांना एका नव्या विश्वात सादर करण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. ‘शुभ मंगलम जोडी दंगलम’मधील त्यांचा प्रवास प्रेम, गंमतीजंमती आणि काही अनपेक्षित वळणांनी भरलेला आहे. ही कथा आणि त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना नक्कीच भावेल.’’
निर्माते नितीन प्रकाश वैद्य म्हणतात, ‘’ललित आणि प्राजक्ता यांना पुन्हा एकत्र आणण्याचा विचारच खूप उत्साह देणारा होता. त्यांची जोडी प्रेक्षकांना आवडते आणि त्यांना पुन्हा एकत्र पाहाण्याची इच्छा होती. मात्र या चित्रपटात केवळ त्या लोकप्रिय जोडीची पुनरावृत्ती नाही, तर त्यांच्यासाठी एक नवी कथा आणि नवं विश्व आहे. त्यामुळे हा अनुभव प्रेक्षकांसाठी खास असेल.’’
पंकजा मुंडेंची बदनामी करण्यासाठी भाजपमधूनच कारस्थान पण…, प्रकाश महाजन असं का म्हणाले? –
निर्मात्या अश्विनी ब्रह्मनाथकर म्हणतात, ‘’या चित्रपटाची घोषणा करताना आम्हाला विशेष आनंद होतोय. ललित- प्राजक्ताची पडद्यावरील केमिस्ट्री आणि सहजता या कथेच्या भावविश्वाला अगदी योग्य आहे. टीझरला मिळणारा प्रतिसाद पाहाता प्रेक्षकांमध्येही या भेटीबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.” आता १३ वर्षांनंतर ललित–प्राजक्ता यांच्यातील ही नवी ‘रेशमी’ केमिस्ट्री नेमकी कोणतं वळण घेते, हे पाहाणं गउत्सुकतेचं ठरणार आहे.
