‘Made In India: A Titan Story’ Review : घड्याळाच्या काट्यांपलीकडची स्वप्नांची आणि जिद्दीची प्रेरणादायी कहाणी

‘Made In India: A Titan Story’ नव्या कल्पनांवर विश्वास ठेवणाऱ्या नेतृत्वाची आणि भारतीय उद्योगविश्वात नवा अध्याय लिहिण्याच्या धाडसाची कथा आहे.

‘Made In India: A Titan Story’

‘Made In India: A Titan Story’

‘Made In India: A Titan Story’ Review : व्यावसायिक यशोगाथांवर आधारित वेब सीरिज किंवा चित्रपट अनेकदा ब्रँडची प्रतिमा उंचावण्याचे माध्यम ठरतात. त्यामुळे अशा कथांकडे प्रेक्षक संशयाने पाहतात. Made In India: A Titan Story बाबतही सुरुवातीला तसाच प्रश्न पडतो – ही मालिका एका कंपनीची जाहिरात आहे की खरोखरच सांगण्यासारखी कथा? मात्र सहा भागांचा हा प्रवास पाहिल्यानंतर लक्षात येते की ही केवळ टायटनची गोष्ट नाही; तर एका कल्पनेवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांच्या धाडसाची आणि भारतात जागतिक दर्जाचा ब्रँड उभा करण्याच्या स्वप्नाची कहाणी आहे.

विनय कामत यांच्या पुस्तकावर आधारित ही मालिका झेरक्सेस देसाई (Xerxes Desai) यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूहाने टायटन ब्रँड कसा उभा केला, याचा मागोवा घेते. त्या काळात भारतातील उद्योगविश्वावर सरकारी नियम, निधीची कमतरता आणि परदेशी स्पर्धेचे मोठे आव्हान होते. अशा परिस्थितीत जागतिक दर्जाची घड्याळ कंपनी उभारण्याचा निर्णय हा धाडसीच म्हणावा लागेल. मालिका या संघर्षाला अतिनाट्यमय न बनवता वास्तववादी पद्धतीने मांडते.

कथानकाची ताकद

या मालिकेची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे तिची पटकथा. प्रत्येक टप्प्यावर येणाऱ्या अडचणी, अपयश, नव्या कल्पना आणि त्यातून मिळणारे यश यांची मांडणी अत्यंत संतुलित आहे. टायटन या नावाची निवड असो, पहिल्या मोठ्या गुंतवणुकीसाठीची धडपड असो किंवा भारतीय उत्पादनावर जागतिक विश्वास निर्माण करण्याची मोहीम – प्रत्येक प्रसंगाला योग्य भावनिक आणि नाट्यमय बांधणी दिली आहे.

विशेष म्हणजे, मालिका माहितीचा भडीमार करत नाही. ती आकडेवारी किंवा कॉर्पोरेट इतिहास सांगण्याऐवजी त्या इतिहासामागची माणसं आणि त्यांची स्वप्नं समोर आणते. त्यामुळे कथा अधिक जिवंत वाटते.

अभिनय: मालिकेचा खरा आत्मा

झेरक्सेस देसाई यांच्या भूमिकेत जिम सर्भ (Jim Sarbh) प्रभावी ठरतात. त्यांच्या अभिनयातून महत्त्वाकांक्षा, आत्मविश्वास आणि अंतर्मनातील असुरक्षितता सहजपणे जाणवते. ते पात्राला केवळ यशस्वी उद्योगपती म्हणून न दाखवता सतत प्रयोग करणारा, जोखीम स्वीकारणारा आणि कधीकधी हट्टी निर्णय घेणारा माणूस म्हणून साकारतात.

नसीरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) यांनी साकारलेली जे.आर.डी. टाटा यांची भूमिका मालिकेचे आणखी एक आकर्षण आहे. कमी संवादांतही त्यांनी व्यक्त केलेली शालीनता, दूरदृष्टी आणि नेतृत्वगुण प्रभाव टाकतात. त्यांच्या प्रत्येक दृश्यात अनुभवाची आणि प्रेरणेची छाप दिसते.

वैभव तत्त्ववादी याची समज आणि उमज त्याच्या अभिनयातून उमटते. तो केवळ एक सहकलाकार म्हणून न राहता त्याचा स्वतःची छाप पडतो. जिमसोबतचे सिक्वेन्सेस फार इंटरेस्टिंग झाले आहेत. सुट्टीनंतर जॉईन झाल्यानंतरच्या सिक्वेन्स उत्तम जमला आहे.

कावेरी सेठ आणि इतर कलाकारांनीही आपापल्या भूमिका विश्वासार्ह पद्धतीने साकारल्या आहेत. विशेषतः टीममधील परस्पर नातेसंबंध आणि मतभेद मालिकेला मानवी स्पर्श देतात.

‘वेळ’ या संकल्पनेचा सुंदर वापर

घड्याळ बनवणाऱ्या कंपनीची कथा असल्याने ‘वेळ’ हा विषय केवळ उत्पादनापुरता मर्यादित राहत नाही. पात्रांच्या आयुष्यातील बदल, कुटुंबासाठी न मिळालेला वेळ, करिअर आणि वैयक्तिक आयुष्यातील संघर्ष यांचा उपयोग कथानक अधिक अर्थपूर्ण बनवण्यासाठी केला आहे. अनेक संवाद आणि प्रसंग या प्रतीकात्मकतेला अधोरेखित करतात.

दिग्दर्शन आणि तांत्रिक बाजू

मालिकेचे दिग्दर्शन संयमी आणि अभ्यासपूर्ण वाटते. 1980 च्या दशकातील भारत, त्या काळातील कार्यालयीन वातावरण, वेशभूषा आणि सामाजिक बदल यांचे चित्रण विश्वासार्ह आहे. छायाचित्रण आणि पार्श्वसंगीत कथानकाला पूरक ठरते. विशेष म्हणजे, प्रेरणादायी प्रसंगांमध्येही अनावश्यक भावनिक अतिरेक टाळण्यात यश आले आहे.

मालिकेतील काही प्रसंग थोडे साचेबद्ध वाटतात. परदेशी प्रतिस्पर्ध्यांना जास्त नकारात्मक दाखवण्याचा प्रयत्न सर्वांनाच पटेल असे नाही. काही ठिकाणी कथानक अधिक धारदार होऊ शकले असते. तरीही या त्रुटी एकूण अनुभवावर फारसा परिणाम करत नाहीत, हे देखील तितकेच महत्वाचे!

Made In India: A Titan Story ही फक्त एका घड्याळ कंपनीच्या यशाची कहाणी नाही. ती स्वप्न पाहणाऱ्या लोकांची, नव्या कल्पनांवर विश्वास ठेवणाऱ्या नेतृत्वाची आणि भारतीय उद्योगविश्वात नवा अध्याय लिहिण्याच्या धाडसाची कथा आहे. व्यवसाय, इतिहास आणि मानवी भावना यांचा सुंदर मिलाफ साधणारी ही मालिका प्रेरणादायी आणि मनोरंजक अशा दोन्ही पातळ्यांवर यशस्वी ठरते.
समीक्षक, अमित भंडारी

‘Made In India: A Titan Story’

का पाहाल ?

वास्तव घटनांवर आधारित कथा, उद्योजकतेचा प्रवास आणि दमदार अभिनय

का टाळाल ?
खूपच कमी कारणे आहेत

थोडक्यात काय ?
Made In India: A Titan Story आवर्जून पाहण्याजोगी series आहे.

कुठे पाहाल-Amazon, MX player

रेटिंग: ⭐⭐⭐⭐☆ (4/5)

Exit mobile version