मधू कांबीकर : पारंपरिक लावणीतील ‘बावनकशी सोनं’

Madhu Kambikar Death: मधु कांबीकर यांनी 'सखी माझी लावणी' चे अनेक प्रयोग करून पारंपारिक लावणीला नवसंजीवनी प्राप्त करून दिली.

Madu Ambikar

Madu Ambikar

Madhu Kambikar Death : ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी आणि चतुरस्त्र अभिनेत्री मधू कांबीकर यांचे दीर्घ आजाराने सोमवारी 12 रोजी पुण्यात निधन झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने 65 व्या वर्धापन दिनानिमित्त ऑगस्ट 2023 मध्ये ज्येष्ठ अभिनेत्री आणि लावणीसम्राज्ञी, ज्येष्ठ सिनेअभिनेत्री मधु कांबीकर यांना ‘जीवन साधना’ पुरस्कार प्रदान केला होता. प्रकृतीच्या कारणास्तव मधुबाईंच्या अनुपस्थितीत त्यांचे गुरू ढोलकीसम्राट पांडुरंग घोटकर यांनी पुरस्कार स्वीकारला. मधु कांबीकर यांनी ‘सखी माझी लावणी’ चे अनेक प्रयोग करून पारंपारिक लावणीला नवसंजीवनी प्राप्त करून दिली. मधु कांबीकर या पारंपारिक लावणीतील बावन्नकशी सोनं होत्या. पारंपरिक जुनी अस्सल शाहिरी लोककलेचे जतन आणि संवर्धन व्हावे आणि शाहिरी कलेला अभिजात दर्जा मिळावा, अशी मधुबाईंनी व्यक्त केली होती.

वयाच्या 13-14 व्या वर्षी मधु कांबीकर यांनी पांडुरंग घोटकर व लावणीसम्राज्ञी लक्ष्मीबाई कोल्हापूरकर यांच्याकडून लावणीचे धडे घेतले. इथून सुरू झालेला लोककला, नाटक, चित्रपटातील त्यांचा प्रवास थक्क करणारा ठरला. मधू कांबीकर यांचे गाजलेले चित्रपट आणि मिळालेल्या पुरस्कारांची भली मोठी जंत्रीच सांगता येईल. त्या केवळ नर्तिकाच नसून, उत्कृष्ट अभिनेत्री असल्याचा अभिप्राय स्व. ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांनी नोंदविला आहे. यावरून मधु कांबीकर यांच्या कलेच्या ताकदीची कल्पना येते. बहुआयामी मधुबाई मुळात अस्सल आणि बहुआयामी लोककलावंत तद्ववंतच चतुरस्त्र अभिनेत्री होत्या. अस्सल पारंपरिक लावणी जगली पाहिजे, यासाठी ‘सखी माझी लावणी’ चा कार्यक्रम सादर करण्याचे त्यांचे धाडस निश्चितंच कौतुकास्पद म्हणावे लागेल.

लीला गांधी, गडकरांचा प्रभाव

प्रख्यात लावणीसम्राज्ञी आणि जेष्ठ अभिनेत्री लीला गांधी, जयश्री गडकर या जुन्या काळातील नायिकांचा मधू कांबीकर यांच्यावर प्रभाव आहे. त्यांची शैली, लावणीतील भावार्थानुसार अभिनय आणि एकूणच अदाकारीतून त्या जे काही सादर करतात ते मला कुठेतरी भावतं, नकळतपणे माझ्यातही ते कुठेतरी उतरत असेल. पण, मी माझी स्वतंत्र शैली निर्माण करण्यावर भर देते, असे मधुबाई सांगत.

जुनं ते सोनं
कुणाची नक्कल मला आवडत नाही, असे मधूबाई सांगत. पारंपरिक लावणीत मधू कांबीकर यांना विशेष रुची होती. लावणीसाठी जे शब्द पेरले जातात, ते अर्थपूर्ण असावेत. अभिरुची संपन्न आणि दर्जेदार अशा लावण्यांची हल्ली कमतरता आहे. काहीतरी थातूरमातूर शब्दरचना करून लावणी रचली जाते. काय तर म्हणे प्रेक्षकांच्या मागणीनुसार आम्ही अशा प्रकारची लावणी सादर करतो, हे मला मुळीच आवडत नाही, असे मधूबाई पोटतिडकीने सांगत. ‘सखी माझी लावणी’ या प्रयोगातील लावण्या पाहून प्रेक्षकांचा लावणीकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन होता, तो बदलण्यास आम्ही हातभार लावला. नव्या प्रेक्षकांची अभिरुची बदलण्यास भाग पाडले. अस्सल पारंपरिक लावणी म्हणजे ‘जुनं ते सोन’ आहे, ते रसिकांना भावतं, मनोमन आवडतं, असे कांबीकर म्हणत.

जुना बाज.. जुना साज
जुना बाज, जुना साज असा सरताज म्हणजे ‘सखी माझी लावणी’ होय. लावणी ला उच्छृंकल रूप न देता तिचा बाज जपणं आवश्यक आहे म्हणजेच भावकाम या लावणीच्या जमेच्या बाजू आहेत. अशाच लावण्यांचे दर्शन आम्ही ‘सखी’ तून घडविले, असे मधूभाई सांगत. पेशवेकालीन लावण्यांंचे दर्शन मधू कांबीकर यांनी 1996 मध्ये मधु प्रीतम नावाची संस्था स्थापन करून त्याद्वारे अभिजात पारंपरिक लावणी-लोककलांचे जतन आणि संवर्धन करणारा ‘सखी माझी लावणी’ हा कार्यक्रम सातत्याने सादर केला. या माध्यमातून पेशवेकालीन पारंपरिक लावण्यांचे दर्शन घडविण्याचे मोठे काम मधू कांबीकर यांनी केले.

विविधांगी, विविधरंगी भूमिका
ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त, निर्माता-दिग्दर्शक जब्बार पटेल, निर्माते महेश कोठारे, विनोदसम्राट शाहीर दादा कोंडके आदींच्या दिग्दर्शनाखाली मधू कांबीकर यांनी चित्रपटांतून विविधांगी, विविधरंगी तसेच वैशिष्ट्यपूर्ण भूमिका केल्या, त्या कलारसिक विसरू शकणार नाहीत. ज्येष्ठ-श्रेष्ठ दिग्दर्शकांची, प्रत्येकाची विशिष्ट शैली त्यांना भावली. त्यातल्या त्यात शाहीर दादा कोंडके यांना लावणीची ‘नस’ किंवा दादांच्या भाषेत सांगायचे झाल्यास ‘नाडी’ गवसली होती, म्हणून ते लोकप्रिय झाले, असे कांबीकर सांगत.

भावकाम लावणीचा ‘आत्मा’

पारंपरिक लावणीला खरा रसिक मनापासून दात देतो, लावणीचा अर्थ थेट काळजापर्यंत पोहोचविण्यासाठी तशाच प्रकारची नृत्य अदाकारी आणि भावकाम प्रभावी ठरते. मी तर म्हणेन की, शब्दांनुरूप भावकाम लावणीचा ‘आत्मा’ आहे. हल्ली उडत्या चालीच्या आणि भडक उत्तान शृंगाराच्या लावण्या आणि गाण्यांची चलती आहे. पारंपरिक लावण्यांचा अस्सल ठेवा मात्र दुर्लक्षित झाल्याची खंत मधू कांबीकर यांना सलत असे.


शाहिरीकलेचे जतन व्हावे

डिसेंबर २०१६ मध्ये लावणी कार्यक्रमाच्या वेळी त्या रंगमंचावर बेशुद्ध झाल्या. त्यांना अर्धांगवायुचा झटका आला होता. मेंदूमध्ये रक्ताच्या गाठी झाल्याच्या निदानानंतर त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रियाही करण्यात आली होती, तेव्हापासून मधूबाई पुण्याच्या शास्त्रीनगरमध्ये अंथरुणाला खिळून होत्या. पारंपरिक लावण्यांचा समृद्ध ठेवा जतन करण्यासाठी लोककलावंतांना, लावणीकार-शाहिरांना शासनाने प्रोत्साहन द्यायला हवे. लोककलेच्या संवर्धनासाठी विशेष गुरुकुल स्थापन करून विद्यापीठ, शाळा-महाविद्यालयांतून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिल्यास महाराष्ट्राचे समृद्ध लोकसंचित पुढील पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल. समृद्ध आणि संपन्न अशा जुन्या शाहिरीचे जतन होईल, यासाठी शासन स्तरावरून प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे मधू कांबीकर यांनी मला संशोधन प्रकल्पासाठी दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितले होते. अभिनयाच्या जोरावर डॉ. श्रीराम लागू यांच्यासारख्या ज्येष्ठ अभिनेत्यांकडून कौतुकाची थाप मिळविलेल्या मधु कांबीकर उर्फ मधु वामन जाधव या एक बहुरंगी असे व्यक्तिमत्व मराठवाड्यासाठी भूषणावह होते.

मराठवाड्यातील गेवराई तालुक्यातील मालेगाव येथे त्यांनी तिसरीपर्यंत शिक्षण घेतले. पुढचे सातवीपर्यंत शिक्षण त्यांनी कांबी या गावी पूर्ण केले. एकीकडे लोककला प्रकारात नाव गाजत असताना दुसरीकडे लोककलाकार म्हणून त्यांना समाजाच्या अवहेलनेचा विषय व्हावे लागले होते. पण, त्याने खचून न जाता मधू कांबीकर यांनी चित्रपटसृष्टीत कोणाच्या मदतीशिवाय केलेल्या प्रवेश त्यांच्या धडपड्या वृत्तीचा द्योतक मानला पाहिजे.

डॉ. शेषराव पठाडे, शाहीर व साहित्यिक

Exit mobile version