Kiran Khoje News : ‘हिंदी मिडीयम’, ‘सुपर ३०’, ‘लव्ह सोनिया’, ‘ज्यूस’, ‘तलवार’, ‘हंटर’, ‘तेरवं’, ‘ताजमहाल’, ‘उ उषाचा’, ‘पांढऱ्या’, ‘रुद्रम’, आणि ‘इमली’ या चित्रपट व मालिकांमधून आपल्या ठाम आणि संवेदनशील अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे किरण खोजे. ‘आता थांबायचं नाय’मध्ये ‘अप्सरा’च्या भूमिकेतून पुन्हा लक्ष वेधून घेत आहे. याच चित्रपटाने तिच्या प्रवासात एक नवा महत्त्वाचा टप्पा जोडला. खरंतर किरणचा हा अभिनयाचा हा प्रवास शाळेच्या गॅदरिंगमधून सुरू झाला होता.
त्यावेळी भूमिका उरलेली नव्हती, पण रोज प्रॅक्टिसला जाणाऱ्या एका संधीसाठी वाट पाहणाऱ्या त्या मुलीच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास बाईंनी पाहिला आणि एका छोट्याशा पार्टमध्ये तिला घेतलं. त्या क्षणाने एका झपाटलेल्या अभिनेत्रीचा जन्म झाला. हीच मुलगी आज अभिनय क्षेत्रात आज अगदी सहजतेने वावरत आहे. एव्हाना तुमच्या लक्षात आलं असेलच ही मुलगी म्हणजे अभिनेत्री किरण खोजे.
पुण्यातील नाट्यशिबिरं, सहा अभिनय पारितोषिकं, एकपात्री सादरीकरण, राज्य नाट्य स्पर्धा हे सगळं करताना तिचं मन एकाच गोष्टीकडे झुकलेलं होतं. दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश मिळवून अभिनय केवळ तंत्र नाही तर तत्व आहे हे तिनं शिकलं. साडेतीन वर्षं तिनं स्वतःला, समाजाला आणि कलाकृतीला नव्यानं समजून घेतलं.
‘सैयारा’चा जलवा कायम; स्पॉटिफाय ग्लोबल ५० चार्टवर टॉप ७ मध्ये पोहोचणारं पहिलं बॉलिवूड गाणं
‘Kingdom of Dreams’ मध्ये दीड वर्षाच्या कामानंतर एरियल परफॉर्मन्स शिकून ती मुंबईत आली. इथे मात्र पहिलं वर्ष अत्यंत संघर्षाचं ठरलं. काम नव्हतं. आर्थिक अडचणी होत्या. पण वडिलांनी सांगितलेली स्थिर नोकरीची वाट सोडून किरणनं निवडलं स्वतःचं स्टेज.‘मायलेकी’पासून सुरू झालेला व्यावसायिक प्रवास नंतर झपाट्यानं वाढत गेला. हिंदी-मराठी चित्रपट, टीव्ही मालिका, वर्कशॉप्स आणि आता एक बर्लिन इंडो–को-प्रॉडक्शन आंतरराष्ट्रीय चित्रपट पूर्ण करणे ही तिच्या कारकिर्दीतील नवी भर आहे.
‘आता थांबायचं नाय’मधील ‘अप्सरा’सारख्या भूमिकेला ती स्वतःचं बालपण मानते. “लहानपणी मी सुद्धा अप्सरेसारखीच होते, चंचल, तडफदार आणि आतून खूप भावूक,” असं ती सांगते. दिग्दर्शक शिवराज वायचळ यांच्या या चित्रपटात ओंकार गोखले, भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, पर्ण पेठे, रोहिणी हट्टंगडी आणि आशुतोष गोवारीकर यांसारख्या प्रतिभावान कलाकारांसोबत तिनं काम केलं आहे. BMC कर्मचाऱ्यांच्या सत्यकथेवर आधारित ही कथा माणूसपणाचा, गरिमेचा आणि लढ्याचा विजयी आवाज आहे.
चित्रपटाने चित्रपटगृहात सात आठवडे प्रेक्षकांची पसंती मिळवली असून आता हा चित्रपट झी टॉकीज टेलिव्हिजनवर प्रसारित होणार आहे. किरणचा आता थांबायचं नाय हा चित्रपट रविवार 27 जुलै दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता झी टॉकीज वर पाहायला मिळेल. ‘तेरवं’ चित्रपटासाठी तिला महाराष्ट्र शासनाच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या नामांकनात स्थान मिळालं असून तिचा अभिनयकौशल्याचा प्रवास कोणत्याही दिखाव्याशिवाय पुढे चालू आहे. ती थांबली नाही. आजही ती शोधते आहे, रंगवते आहे, शिकते आहे… कारण खरंच‘आता थांबायचं नाय.’
सातासमुद्रापार अमृताच्या नृत्याविष्काराचा डंका! सुंदरी ऑन ग्लोबल स्टेज…