Maitreya Trailer : काही नाती मैत्रीच्या चौकटीत सहज सामावतात, तर काही नाती नकळत त्या चौकटीच्या पलीकडे जातात. मात्र, त्या नात्याला प्रेम म्हणावं की मैत्री, हेच कळेनासं झालं तर? अशाच एका नात्यातील भावनांचा गुंता उलगडणाऱ्या ‘मैत्रेया’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आला. या सोहळ्याला समीर वानखेडे, सुदेश भोसले, उर्मिला कानेटकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या सर्वांनी चित्रपटाला भरभरून शुभेच्छा दिल्या. संगीत, नृत्य, उत्साह आणि कलाकारांच्या उपस्थितीने रंगलेल्या या भव्य ट्रेलर लाँच सोहळ्याला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी संपूर्ण वातावरण जल्लोषमय झाले होते.
या सोहळ्याचे खास आकर्षण ठरले ते चित्रपटातील कलाकारांचे धमाकेदार डान्स परफॉर्मन्स! समर, आयुषी, स्काय आणि रूची यांनी आपल्या नृत्याविष्कारातून उपस्थितांची मने जिंकली. त्याचबरोबर प्रसिद्ध गायिका वैशाली सामंत, सायली पंकज, शिवम सिंह, अपूर्वा निषाद, राणी कोहिनूर आणि सिद्धांत भोसले यांच्या दमदार लाइव्ह म्युझिक परफॉर्मन्सने सोहळ्याची रंगत अधिकच वाढवली. चित्रपटातील लोकप्रिय गाण्यांवर उपस्थितांनीही ठेका धरत या सोहळ्याचा मनमुराद आनंद लुटला. संगीत आणि नृत्याच्या या बहारदार मेजवानीनंतर चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच उपस्थितांनी टाळ्या आणि शिट्ट्यांच्या कडकडाटात त्याचे स्वागत केले. कलाकार, संगीत आणि मनोरंजनाचा सुरेख संगम असलेल्या या सोहळ्याने ‘मैत्रेया’च्या प्रदर्शनापूर्वीच चित्रपटाबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचवली.
जय, साजिरी, आर्जोयी आणि निर्वाण यांच्या आयुष्यातील नाती, त्यांच्यातील जवळीक आणि एकमेकांबद्दलच्या बदलत्या भावना ट्रेलरमधून समोर येतात. मैत्रीच्या नात्यात दडलेलं प्रेम, प्रेमात निर्माण होणारा संभ्रम आणि या सगळ्यातून तयार होणारा भावनिक गुंता यामुळे ट्रेलरची उत्सुकता अधिकच वाढते. जय आणि आर्जोयी यांची घट्ट मैत्री, जय आणि साजिरी यांच्यातील जवळीक, तर आर्जोयी आणि निर्वाण यांचं नातं या सगळ्यांमधून एक वेगळंच भावविश्व तयार होतं. कधी मैत्रीच्या नात्यात प्रेमाची चाहूल लागते, तर कधी प्रेमाच्या भावनांनाच मैत्रीचा आधार मिळतो. एकमेकांसोबतचे सहज क्षण, मनात निर्माण होणारी ओढ आणि नात्यांमधील नकळत वाढणारा गुंता या चौघांच्या आयुष्यात नेमकं काय घडतंय? मैत्री आणि प्रेमाच्या या गुंत्यात काही नाती अपूर्णच राहाणार का? या प्रश्नांची उत्तरं आता चित्रपटातूनच मिळणार आहेत. ‘मैत्रेया’मधील गाण्यांनाही प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत असून, चित्रपटातील प्रत्येक गाणे संगीतप्रेमींच्या मनाचा ठाव घेत आहे.
लेखिका-दिग्दर्शिका क्रांती रेडकर वानखेडे म्हणतात, “मैत्री आणि प्रेम या भावना जितक्या सुंदर आहेत, तितक्याच गुंतागुंतीच्याही आहेत. अनेकदा आपल्या मनात नेमकं काय आहे, हे आपल्यालाच समजत नाही. जय, साजिरी, आर्जोयी आणि निर्वाण यांच्या नात्यांमधून याच भावनांचे वेगवेगळे पैलू मांडले आहेत. प्रत्येक पात्राचा स्वतःचा भावनिक प्रवास आहे. या चौघांच्या गोष्टीत प्रेक्षकांना कुठेतरी स्वतःचं प्रतिबिंब नक्कीच दिसेल.”
संगीतकार पंकज पडघण म्हणतात, “ ‘मैत्रेया’मधील गाणी ही केवळ चित्रपटाचा भाग नसून, त्यातील पात्रांच्या भावना आणि नात्यांचा प्रवास उलगडणारा महत्त्वाचा दुवा आहेत. प्रत्येक गाण्यातून मैत्री, प्रेम, आनंद आणि भावनांचे वेगवेगळे रंग मांडण्याचा प्रयत्न केला आहे. क्रांती रेडकर यांची गाण्यांमागची संकल्पना समजून घेत त्याला संगीताच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे साकारता आले. या चित्रपटातील गाण्यांना प्रेक्षकांकडून मिळणारा प्रतिसाद निश्चितच आनंद देणारा आहे.”
निर्माते मनोज खळतकर म्हणतात, “तरुणाईच्या नात्यांमधील गंमत, त्यांचा सहजपणा आणि भावनिक चढ-उतार यांचा अनुभव प्रेक्षकांना ‘मैत्रेया’मधून घेता येईल. एकीकडे मनोरंजन आणि दुसरीकडे नात्यांशी जोडणाऱ्या भावना असा समतोल साधण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. तरुणाईसोबतच संपूर्ण कुटुंबाला एकत्र बसून पाहता येईल असा हा चित्रपट आहे.”
अहिल्यानगर जिल्हा बँक आता शेतकऱ्यांची बँक म्हणून काम करणार; विजयानंतर निलेश लंके स्पष्टच बोलले
यात समर, आयुषी, स्काय आणि रूची यांच्या प्रमुख भूमिका आहेत. समर टाईम्स प्रॉडक्शन निर्मित आणि क्रांती रेडकर वानखेडे लिखित-दिग्दर्शित ‘मैत्रेया’ या चित्रपटाची निर्मिती मनोज खळतकर यांनी केली असून अमन खळतकर हे सहनिर्माते आहेत. येत्या २० नोव्हेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
