Marathi cinema is once again in trouble at the national level : मराठी चित्रपटसृष्टीसाठी अभिमानाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. प्रतिष्ठेच्या FIPRESCI-India अर्थात ‘फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल फिल्म क्रिटिक्स इंडिया’ने जाहीर केलेल्या 2025 मधील सर्वोत्तम भारतीय चित्रपटांच्या टॉप-10 यादीत दोन मराठी चित्रपटांनी दमदार स्थान मिळवलं आहे. दिग्दर्शक संतोष दावखर यांचा ‘गोंधळ’ आणि दिग्दर्शक रोहन परशुराम कनावडे यांचा ‘साबर बोंड कॅक्टस पिअर्स’ या चित्रपटांची निवड झाल्याने मराठी चित्रपटसृष्टीत आनंदाचं वातावरण आहे.
देशभरातील विविध भाषांमधील आशयघन, प्रयोगशील आणि कलात्मक चित्रपटांमधून ही निवड करण्यात आली आहे. FIPRESCI-India ही देशातील चित्रपट समीक्षकांची प्रतिष्ठित संस्था मानली जाते. दरवर्षी भारतीय सिनेमातील उत्कृष्ट कलाकृतींचा गौरव करण्यासाठी ही संस्था सर्वोत्तम चित्रपटांची यादी जाहीर करत असते. त्यामुळे या यादीत स्थान मिळणं हे कोणत्याही चित्रपटासाठी मोठं यश मानलं जातं.
‘गोंधळ’ या चित्रपटाने आपल्या वेगळ्या कथानक, ग्रामीण वास्तव आणि प्रभावी मांडणीमुळे समीक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. दिग्दर्शक संतोष दावखर यांनी सामाजिक आणि मानवी भावविश्वाला भिडणारा विषय हाताळत प्रेक्षकांसमोर एक वेगळा सिनेमॅटिक अनुभव उभा केला आहे. जवळपास 1 तास 56 मिनिटांचा हा चित्रपट याआधीही विविध चित्रपट महोत्सवांमध्ये चर्चेत राहिला होता.
14 मृत्यूंनी राज्य हादरलं; पुणे विषारी दारू प्रकरणात मुख्य आरोपी कर्नल विरखा सिंहला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
तर ‘साबर बोंड कॅक्टस पिअर्स’ या चित्रपटानेही संवेदनशील विषय, कलात्मक दृश्यभाषा आणि प्रभावी अभिनयामुळे विशेष दाद मिळवली आहे. दिग्दर्शक रोहन परशुराम कनावडे यांच्या या चित्रपटाचा कालावधी 1 तास 53 मिनिटांचा असून, मराठी चित्रपटांमध्ये वेगळ्या धाटणीचं कथन करण्याचा प्रयत्न या सिनेमातून दिसून येतो. या चित्रपटाची निवड झाल्याने नव्या पिढीतील मराठी दिग्दर्शकांच्या प्रयोगशीलतेलाही मोठी दाद मिळाल्याचं मानलं जात आहे.
FIPRESCI-India ने जाहीर केलेल्या या यादीत बंगाली, मल्याळम, हिंदी, नेपाळी आणि खासी भाषांमधील चित्रपटांचाही समावेश आहे. ‘बक्षो बंदी’, ‘डिजाअर’, ‘होमबाउंड’, ‘इफ व या विंटर्स नाईट’, ‘लाईफ ऑफ अ फालुस’, ‘शेप ऑफ मोमो’, ‘सॉंग्स ऑफ फॉरगॉटन ट्रीज’ आणि ‘द एलिसिअन फिल्ड’ या चित्रपटांनाही टॉप-10 मध्ये स्थान मिळालं आहे.
विशेष म्हणजे, या टॉप-10 चित्रपटांमधून आता ग्रँड प्रिक्स-2025 या सर्वोच्च पुरस्काराच्या विजेत्याची घोषणा लवकरच केली जाणार आहे. त्यामुळे ‘गोंधळ’ आणि ‘साबर बोंड’ या दोन्ही मराठी चित्रपटांकडून आता अधिक अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. गेल्या काही वर्षांत मराठी चित्रपटसृष्टीने आशयप्रधान आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतले जाणारे चित्रपट देत आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. ‘कोर्ट’, ‘सैराट’, ‘द डिसायपल’, ‘वालवी’ यांसारख्या चित्रपटांनंतर आता ‘गोंधळ’ आणि ‘साबर बोंड’ या चित्रपटांनीही मराठी सिनेमाचा दर्जा पुन्हा एकदा अधोरेखित केला आहे. त्यामुळे मराठी सिनेमाचा झेंडा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अधिक उंचावल्याची भावना चित्रपटप्रेमींमधून व्यक्त होत आहे.
