महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाकडून मराठी सिनेमांची ‘इफ्फी’वारी

मराठी सिनेमांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सन 2015 पासून महामंडळ दरवर्षी निवडक मराठी चित्रपट प्रदर्शित करते.

Untitled Design   2026 11 22T183029.036

Untitled Design 2026 11 22T183029.036

Marathi Cinema’s Journey to IFFI : भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात ‘इफ्फी’मध्ये रविवारी ‘सिनेमॅन’ या मराठी चित्रपटाचे प्रदर्शन झाले. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांपर्यंत अर्थपूर्ण सिनेमा पोहोचवण्याचा ध्यास आणि त्यातून शिक्षणाच्या प्रक्रियेत घडणारे परिवर्तन हा मध्यवर्ती विषय असलेल्या या चित्रपटाची महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाकडून 57 व्या ‘इफ्फी’ महोत्सवासाठी निवड करण्यात आली होती. ‘इफ्फी’तील वेव्हज् फिल्म बझार विभागात रविवारी आयोजित ‘सिनेमॅन’च्या प्रदर्शनास देश-विदेशांतील सिनेरसिकांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

मराठी सिनेमांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सन 2015 पासून महामंडळ ‘इफ्फी’मध्ये दरवर्षी निवडक मराठी चित्रपट प्रदर्शित करते. यंदा ‘सिनेमॅन’ आणि ‘तिघी’ या मराठी चित्रपटांची महामंडळाने महोत्सवासाठी निवड केली असून रविवारी त्यातील ‘सिनेमॅन’चे प्रदर्शन करण्यात आले. या प्रदर्शनाला महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर, चित्रपटाचे दिग्दर्शक उमेश बागडे, निर्माता सुमित पाटील आदींसह देश-विदेशांतील सिनेरसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दुर्गम भागातील विद्यार्थ्यांपर्यंत अर्थपूर्ण सिनेमा पोहोचवण्याचा ध्यास घेतलेला आनंद या निवृत्त शिक्षकाच्या प्रवासाभोवती ‘सिनेमॅन’ हा सिनेमा गुंफलेला आहे. सिनेमा हे केवळ मनोरंजनाचे माध्यम नसून विद्यार्थ्यांची संवेदनशीलता, कल्पनाशक्ती आणि विचारविश्व समृद्ध करण्याचे प्रभावी साधन ठरू शकते, हा विचार चित्रपटातून मांडण्यात आला आहे. त्यामुळे हा चित्रपट केवळ एका व्यक्तीच्या ध्येयाचा प्रवास न राहता, शिक्षणाच्या प्रक्रियेत कलामाध्यमांचे महत्त्व अधोरेखित करतो.

अग्निवीरांना दोन वर्षांची अतिरिक्त सेवा आणि विवाहाची परवानगी, चार आठवड्यांचे प्रशिक्षण पूर्ण करणे अनिवार्य!

मराठी चित्रपटांची, त्यांतील सर्जनशीलतेची ओळख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर करून देण्याच्या उद्देशाने महामंडळ ‘इफ्फी’मध्ये सहभागी होत असते. यंदा महामंडळाच्या वतीने ‘सिनेमॅन’ आणि ‘तिघी’ या दोन चित्रपटांची ‘इफ्फी’साठी निवड करण्यात आली आहे. या सहभागातून मराठी चित्रपटांचे वैविध्यपूर्ण विषय, आशय आणि सर्जनशीलता देश-विदेशातील चित्रपटप्रेमींपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे प्रतिपादन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील यांनी यानिमित्ताने केले.

सोमवारी ‘तिघी’चे ‘इफ्फी’त प्रदर्शन

महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाकडून ‘इफ्फी’मध्ये सोमवारी, 23 नोव्हेंबर रोजी ‘तिघी’ या मराठी चित्रपटाचे प्रदर्शन होणार आहे. गोवा येथील हॉटेल ताज होरिझॉन येथे क्यूब 3 मध्ये सायंकाळी 4 वाजता हा सिनेमा सिनेरसिकांना पाहता येणार आहे. जिजीविषा काळे दिग्दर्शित या चित्रपटात भारती आचरेकर, नेहा पेंडसे आणि सोनाली कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. आई आणि तिच्या दोन मुली यांच्यातील नातेसंबंध, त्यांच्यातील भावनिक गुंतागुंत आणि परस्परांमधील दुरावा यांची संवेदनशील मांडणी या चित्रपटातून करण्यात आली आहे. कौटुंबिक नात्यांचे विविध पदर उलगडणारा हा चित्रपट ‘इफ्फी’च्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मराठी चित्रपटांचे प्रतिनिधित्व करणार आहे.

Exit mobile version