Super Duper : मराठी ZEE 5 वर “सुपर डुपर” चित्रपट ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Super Duper : दिग्दर्शक समीर आशा पाटील यांच्या ‘सुपर डुपर’या खुसखुशीत कॉमेडी-ड्रामा शैलीतील चित्रपटाच्या डिजिटल प्रीमियरची घोषणा मराठी

Super Duper

Super Duper

Super Duper : दिग्दर्शक समीर आशा पाटील यांच्या ‘सुपर डुपर’या खुसखुशीत कॉमेडी-ड्रामा शैलीतील चित्रपटाच्या डिजिटल प्रीमियरची घोषणा मराठी ZEE5 ने केली आहे. चित्रपटगृहांमध्ये यशस्वी प्रदर्शन आणि प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्यानंतर हा चित्रपट आता 29 मे 2026 रोजी मराठी ZEE5 वर डिजिटल माध्यमातून प्रदर्शित होणार आहे. 99 प्रॉडक्शन्स आणि सिद्धिविनायक प्रॉडक्शन्स यांनी झी स्टुडिओजच्या सहकार्याने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटात ललित प्रभाकर, विदुला चौगुले, निर्मिती सावंत, हृषीकेश जोशी, शशांक शेंडे, कुशल बद्रिके आणि नम्रता संभेराव यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

सुपर डुपर’ ने चित्रपटगृहात प्रेक्षकांची मन जिंकल्या नंतर आता घरबसल्या हा चित्रपट बघता येणार आहे. कौटुंबिक कथा आणि खळखळून हसत खेळत घराच्या सोबत हा चित्रपट बघावा अशी याची कथा आहे.

रोहित आणि त्याची प्रेयसी ईशा या मुंबईत स्वतःची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी धडपडणाऱ्या दोन तरुण व्यावसायिकांभोवती ‘सुपर डुपर’ ही कथा फिरते. एका दलालामार्फत ते एक फ्लॅट खरेदी करतात. मात्र, त्यानंतर त्यांना धक्का बसतो, कारण तोच फ्लॅट नुकतेच गावाहून मुंबईत आलेल्या जाधव कुटुंबालाही विकण्यात आलेला असतो. कायदेशीर वाद सुटेपर्यंत दोन्ही कुटुंबांनी एकाच घरात राहावे, असा आदेश न्यायालयाकडून देण्यात येतो आणि त्यानंतर गोंधळ, विनोद आणि भावनिक प्रसंगांनी भरलेला प्रवास सुरू होतो. परस्परविरोधी जीवनशैलीमुळे निर्माण होणारे संघर्ष, पिढ्यांमधील मतभेद, भावनिक नाती आणि शहरातील दैनंदिन संघर्ष यांची रंगतदार मांडणी या कथेमध्ये पाहायला मिळते.

‘सुपर डुपर’ची वैशिष्ट्ये- विनोद आणि कौटुंबिक नाट्य यांचा भावनिक स्पर्श असलेला सुरेख मिलाफ. शहरी स्वप्ने आणि पारंपरिक मूल्यांमधील संघर्षाचे वास्तवदर्शी चित्रण यातून बघायला मिळत. उत्कृष्ट विनोदी टायमिंगसाठी ओळखल्या जाणाऱ्या अनुभवी कलाकारांचा उत्कृष्ट अभिनय. दैनंदिन आयुष्यातील प्रसंगांना विनोदाची जोड देणारी सहजसुंदर कथा.

झी मराठीच्या चीफ चॅनल ऑफिसर आणि मराठी ZEE5च्या बिझनेस हेड हेमा व्ही. आर. म्हणाल्या, “यंदा ZEE5वर विविध प्रकारचे उत्कृष्ट मराठी चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहेत. ‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’, ‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ आणि ‘तिघी’ यांसारख्या गाजलेल्या आणि समीक्षकांची पसंती मिळालेल्या चित्रपटांच्या यशानंतर आता ‘सुपर डुपर’सारखा खुसखुशित विनोदाची पखरण असलेला कौटुंबिक चित्रपट प्रेक्षकांसमोर आणताना आम्हाला आनंद होत आहे.

दैनंदिन आयुष्यातील वास्तवाशी जोडलेली ही कथा आधुनिक शहरी जीवनशैली आणि खोलवर रुजलेल्या पारंपरिक मूल्यांमधील संघर्ष हलक्याफुलक्या शैलीत मांडते. दोन कुटुंबे, दोन विचारसरणी आणि दोन वेगवेगळ्या जीवनशैलींमधील संघर्षातून निर्माण होणारे प्रसंग विनोदी आहेतच, तितकेच ते मनाला साद घालणारेही आहेत. मुंबईतील घरांच्या समस्येच्या पार्श्वभूमीवर विनोद, भावना आणि कौटुंबिक नातेसंबंधांची रंगतदार मांडणी या चित्रपटात करण्यात आली आहे. ‘सुपर डुपर’ला चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिल्यानंतर आता या चित्रपटाच्या डिजिटल प्रीमियरच्या माध्यमातून हा चित्रपट मराठी ZEE5वरून अधिक व्यापक प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार असल्याचा आम्हाला आनंद आहे.”

दिग्दर्शक समीर आशा पाटील म्हणाले, “‘सुपर डुपर’ ही मूळात मतभेद असूनही एकत्र राहायला शिकणाऱ्या माणसांची कथा आहे. चित्रपटाची संकल्पना विनोदी आणि गोंधळाने भरलेली असली तरी त्यामधील भावना अत्यंत जवळच्या वाटतात, कारण प्रत्येक कुटुंबाच्या स्वतःच्या सवयी, श्रद्धा आणि असुरक्षितता असतात आणि त्यातूनच विनोदनिर्मिती होते. अनपेक्षित परिस्थितीमुळे माणसे कशा प्रकारे एकमेकांच्या जवळ येऊ शकतात, हे या चित्रपटात विनोदाच्या माध्यमातून दाखवण्यात आले आहे. मराठी ZEE5च्या माध्यमातून ही कथा आता विविध भागांतील प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार असून प्रत्येक कुटुंबाशी नाते जोडेल, याचा मला आनंद आहे.”

अभिनेत्री निर्मिती सावंत म्हणाल्या, “‘सुपर डुपर’ची खासियत म्हणजे या चित्रपटातील प्रत्येक व्यक्तिरेखा खरी आणि आपल्याच आसपासची वाटते. विशेषतः, पूर्णपणे वेगवेगळ्या जगातील लोकांना एकाच घरात राहावे लागते, तेव्हा भारतीय कुटुंबांमध्ये निर्माण होणारा गोंधळ, प्रेम आणि धमाल या चित्रपटात पाहायला मिळते. मराठी ZEE5ने नेहमीच मातीतल्या कथा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्या आहेत. त्यामुळे हा चित्रपटही या प्लॅटफॉर्मवरून अधिक व्यापक प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार असल्याचा मला आनंद आहे.”

अभिनेता ललित प्रभाकर म्हणाला, “रोहित ही व्यक्तिरेखा अनेक तरुणांना आपलीशी वाटेल. तो महत्त्वाकांक्षी आहे, स्वतंत्र आहे आणि स्वतःच्या अटींवर आयुष्य घडवण्याचा प्रयत्न करतो. मात्र, अचानक त्याच्या वैयक्तिक आयुष्यात मोठा गोंधळ निर्माण होतो आणि त्यानंतर सगळेच बदलून जाते. ‘सुपर डुपर’मध्ये मला सर्वांत आवडलेली गोष्ट म्हणजे विनोद, दैनंदिन भावना आणि वास्तवातील संघर्ष यांची अतिशय सहज सांगड घालण्यात आली आहे. आता मराठी ZEE5वरील प्रेक्षकांना घरबसल्या हा मनोरंजक प्रवास अनुभवता येणार असल्याचा मला खूप आनंद आहे.”

अभिनेत्री नम्रता संभेराव म्हणाल्या, “या चित्रपटामध्ये एक प्रकारची आपुलकी आणि साधेपणा आहे, ज्यामुळे ही कथा प्रेक्षकांना लगेचच आपलीशी वाटते. गोंधळ आणि विनोदाच्या वातावरणामध्ये स्वीकार, जुळवून घेणे आणि नातेसंबंध यांची सुंदर कथा देखील दडलेली आहे. अशा मनोरंजक आणि खुसखुशीत चित्रपटाचा भाग होणे माझ्यासाठी खूप खास अनुभव राहिला आहे. ZEE5वरील प्रेक्षकांनाही हा चित्रपट नक्कीच भावेल, याची मला खात्री आहे” मराठी ZEE5वर 29 मे रोजी ‘सुपर डुपर’ बघायला विसरू नका.

Exit mobile version