Mohammed Rafi death anniversary : आज ऑटोमध्ये, रेडिओवर, एखाद्या जुन्या चहाच्या टपरीवर, मैफिलीत किंवा रात्री एकांतात हेडफोन लावून “तुम मुझे यूँ भुला ना पाओगे…” ऐकताना पुन्हा एकदा जाणवतं… काही आवाज हे काळाच्या चौकटीत बंदिस्त होत नाहीत. ते पिढ्यान् पिढ्या माणसांच्या आठवणींमध्ये, प्रेमात, विरहात आणि आयुष्यात जिवंत राहतात. मोहम्मद रफी हे त्यापैकीच एक. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त स्वरांच्या त्या सम्राटाला विनम्र अभिवादन!
एका फकिराच्या सुरातून जन्माला आला स्वरांचा सम्राट…२४ डिसेंबर १९२४. पंजाबमधील कोटला सुलतानसिंग हे छोटंसं गाव. लहानगा रफी रोज गावातून जाणाऱ्या एका फकिराची सुरेल हाक ऐकत असे. त्या फकिराच्या आवाजाची नक्कल करताना त्याला स्वतःलाही कल्पना नव्हती की एक दिवस संपूर्ण देश त्याच्या आवाजाची नक्कल करण्याचा प्रयत्न करेल. घरच्यांनी त्याची सुरांची जाण ओळखली. शास्त्रीय संगीताचे धडे सुरू झाले. वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी लाहोरमध्ये पहिली सार्वजनिक मैफल गाजली आणि काही वर्षांतच स्वप्नांची नागरी मुंबईने त्याला आपलेसे केले, संघर्ष होता. भेंडीबाजारातील एका छोट्याशा खोलीत राहून, स्टुडिओचे उंबरठे झिजवत, संधीची वाट पाहणारा हा तरुण पुढे हिंदी चित्रपटसृष्टीचा सर्वाधिक प्रिय आवाज बनेल, याची कल्पनाही तेव्हा कुणाला नव्हती… भारतीय चित्रपटसृष्टीत अनेक उत्तम गायक झाले. पण रफी हे असे एकमेव गायक होते, जे गाण्याआधी अभिनेता बनत.
रेकॉर्डिंगपूर्वी ते विचारायचे—
“हे गाणं कोणावर चित्रित होणार आहे?” तो अभिनेता कसा चालतो… कसा हसतो… कसा प्रेम व्यक्त करतो… कसा रागावतो… हे सगळं ते समजून घ्यायचे. म्हणूनच… दिलीप कुमारसाठी त्यांचा आवाज गंभीर व्हायचा… देव आनंदसाठी खट्याळ… शम्मी कपूरसाठी बेभान… धर्मेंद्रसाठी रांगडा… राजेंद्र कुमारसाठी हळवा… आणि जॉनी वॉकरसाठी खोडकर… त्यांचे गाणे डोळे मिटून ऐकताना ते कोणावर चित्रित झाले आहे, याची कल्पना आपल्याला पुरेपूर येते… आणि हीच त्यांची खासियत बनली… शम्मी कपूर म्हणाले होते… “माझ्या यशाचा अर्धा वाटा रफींचा आहे!” शम्मी कपूरची प्रतिमा म्हणजे उत्साह, नृत्य, उड्या आणि भन्नाट ऊर्जा. “Yahoo…” म्हणत डोंगरावर धावणारा शम्मी कपूर आजही लोकांच्या डोळ्यांसमोर उभा राहतो. पण त्या दृश्याला आत्मा दिला तो रफींच्या आवाजाने.
“चाहे कोई मुझे जंगली कहे”, “आजा आजा मैं हूँ प्यार तेरा”, “एहसान तेरा होगा मुझ पर”…
ही गाणी ऐकताना पडद्यावरचा अभिनेता आणि पडद्यामागचा गायक यांच्यातील सीमारेषाच मिटून जायची. शम्मी कपूर एकदा म्हणाले होते-“जर रफी नसते, तर शम्मी कपूरही नसता.” इतकं मोठं कौतुक एखाद्या अभिनेत्याने गायकासाठी करणं, हीच रफींच्या महानतेला दिलेली दिलखुलास दाद आहे… ‘मन तडपत हरि दर्शन को आज’… संगीत धर्मापेक्षा मोठं असतं! बैजू बावरा चित्रपटातील हे गाणं रेकॉर्ड होत होतं. संगीतकार नौशाद यांनी रफींना सांगितलं…”हे गाणं गाऊ नका… प्रार्थना करा.” रफींनी डोळे मिटले…आणि पुढची काही मिनिटं स्टुडिओत उपस्थित प्रत्येकाच्या अंगावर काटा आला…
एक मुस्लिम गायक…
हिंदू भक्तिगीत…पण गाणं संपेपर्यंत तिथे धर्म नव्हता…फक्त भक्ती होती… सुरांवरची अपर श्रध्दा आणि अढळ निष्ठा…आजही हे भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम भक्तिगीतांपैकी एक मानलं जातं…
फक्त एका रुपयासाठी गायलं गाणं…!
आजच्या काळात कोट्यवधींची मानधनं ऐकायला मिळतात. पण रफींसाठी पैसा कधीच मोठा नव्हता. संगीतकार लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्या सुरुवातीच्या काळात त्यांच्याकडे मानधन देण्याइतके पैसे नव्हते. रफींनी गाणं रेकॉर्ड केलं. मानधन? फक्त एक रुपया! कारण त्यांना त्या तरुण संगीतकारांवर विश्वास होता. पुढे हेच लक्ष्मीकांत-प्यारेलाल हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात यशस्वी संगीतकार ठरले आणि रफींनी त्यांच्यासोबत शेकडो अजरामर गाणी गायली.
रॉयल्टीवरून मतभेद… पण मनात कटुता नाही…
स्वर सम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर आणि सुरांचा बेताज बादशाह मोहम्मद रफी… हा काळ म्हणजे भारतीय संगीताचा सुवर्ण अध्याय.पण एका काळात रॉयल्टीच्या प्रश्नावर दोघांमध्ये मतभेद झाले. काही वर्षे दोघांनी एकत्र गाणी गायली नाहीत. पण कलाकाराचं मन मोठं असतं…
ख्यातनाम अभिनेत्री नर्गिस यांच्या पुढाकाराने दोघे पुन्हा एकत्र आले. आणि त्यानंतर पुन्हा जन्माला आली अनेक अजरामर युगुलगीते…
कारण संगीताला अहंकार मान्य नसतो… आणि काळापुढे असणाऱ्या आणि गाण्याबाबतीत कायदेशीर सजगता बाळगणाऱ्या लता दीदींच्या रॉयल्टी च्या मुद्याकडे त्यांनी नंतर फार डोळसपणे पाहिले.
नव्या कलाकारांसाठी सदैव दरवाजे खुले…
रफींच्या नम्रतेच्या कथा आजही चित्रपटसृष्टीत सांगितल्या जातात. कोणताही नवोदित संगीतकार आला…कोणताही संघर्ष करणारा निर्माता भेटला… रफींनी शक्यतो कधीच “नाही” म्हटलं नाही. अनेक वेळा अत्यल्प मानधनात… तर काही वेळा विनामूल्यही त्यांनी गाणी गायली.
म्हणूनच लोक म्हणायचे—”रफी मोठे गायक नव्हते… ते मोठे माणूस होते.”
गाण्यांचा महासागर… ज्याला किनाराच नाही
प्रेम म्हणाल तर…”अभी ना जाओ छोड़कर…” विरह म्हणाल तर…”दिन ढल जाए…”भक्ती म्हणाल तर…”मन तडपत हरि दर्शन को आज…”
देशभक्ती म्हणाल तर…”कर चले हम फ़िदा…”कव्वाली म्हणाल तर…”पर्दा है पर्दा…”मस्ती म्हणाल तर…”सर जो तेरा चकराए…”
आणि आयुष्यभराचं वचन?
“क्या हुआ तेरा वादा…” आणि त्यांनी गायलेल गीत… त्यांच्या कव्वालीमध्ये असलेला पारंपरिकतेला असलेला नवतेचा साज हा तितकाच महत्त्वाचा…एकाच गायकाने प्रत्येक भावना इतक्या सहजतेने गायली, हेच त्यांच्या आवाजाचं गूढ होतं…
शेवटच्या दिवसापर्यंत संगीताची साधना…
३१ जुलै १९८०.त्या दिवशीही रफी संगीतापासून दूर नव्हते. निधनाच्या काही तासांपूर्वी त्यांनी रेकॉर्डिंग पूर्ण केल्याचं अनेक सहकाऱ्यांनी सांगितलं आहे. संध्याकाळी मात्र हा स्वर कायमचा शांत झाला. बातमी वाऱ्यासारखी पसरली. मुंबईच्या रस्त्यांवर जनसागर उसळला.
मुसळधार पाऊस पडत होता. पण हजारो चाहते आपल्या लाडक्या गायकाला अखेरचा निरोप देण्यासाठी उभे होते. त्या दिवशी भारताने केवळ एक गायक गमावला नव्हता…तर आपल्या भावनांना आवाज देणारा मित्र गमावला होता. या आवाजाचा दरवळ आजही कायम…
कारण त्यांनी गाणी गायली नाहीत…त्यांनी भावना स्वरांच्या कोंदणात खुलवल्या…त्यांच्या आवाजात प्रेम होतं…विरह होता…भक्ती होती…
विनोद होता…देशप्रेम होतं…आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माणुसकी होती…
तुम मुझे यूँ भुला ना पाओगे…”
ही केवळ एका गाण्याची ओळ नाही, तर ती मोहम्मद रफी यांच्या संपूर्ण आयुष्याचे सार आहे. कारण रफीसाहेब आपल्यातून जाऊन चार दशकांहून अधिक काळ उलटला, तरी भारतीय संगीतप्रेमींना रफी साहेबांच्या आवाजाचे गरुड भारतीय नव्हे तर जागतिक पातळीवर आजही कायम आहे… हीच त्यांच्या सुरांची जादू आहे… ३१ जुलै. भारतीय चित्रपटसंगीताच्या सुवर्णयुगातील सर्वात मधुर, सर्वात बहुरंगी आणि सर्वात भावस्पर्शी आवाजाला निरोप देण्याचा दिवस… १९८० मध्ये आजच्याच दिवशी हृदयविकाराच्या झटक्याने रफी साहेब या जगाचा निरोप घेऊन गेले. पण काही कलाकार शरीराने जातात, त्यांचा आवाज मात्र काळाच्या प्रत्येक पिढीसोबत नव्याने जन्म घेत राहतो…. मोहम्मद रफी हे त्यापैकीच एक…
-अमित भंडारी
